Maha Vitran : वीज ग्राहकांकडून अतिरेकी थकबाकी वसुली, वीज तज्ञ्जांनी केला हा आरोप
राज्यात महावितरण कंपनी थडक वीज थकबाकी वसुली मोहीम सुरु केली आहे. अशा चुकीच्या वसुली कारवाईला कोणी दाद देऊ नये असे आवाहन वीज तज्ञ्जांनी केले आहे.
मुंबई :राज्यात महावितरण ( MSEDCL ) कंपनीने थडक वीज थकबाकी वसुली मोहीम सुरु केली आहे. साल 2004-05 अथवा त्यापूर्वी ज्यांचा वीजपुरवठा ( Electricity ) कायम स्वरुपी खंडीत करण्यात आला आहे, त्यांच्याकडून महावितरण कंपनीने सध्या थकीत वीज वसुली सुरु केली आहे. काही वीज ग्राहकांना ( Electricity consumers ) थकबाकी नसतानाही वसुलीच्या नोटीसी आल्या आहेत. काहींना त्यांच्या बिलात 15-20 वर्षांच्या मागील थकबाकी ? टाकून वाढीव वीज बिलं पाठविली आहेत अशा नियमबाह्य वसुली विरोधात महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने दंड थोपटले आहेत.
राज्यात महावितरण कंपनी थडक वीज थकबाकी वसुली मोहीम सुरु केली आहे. त्यात अनेक जुन्या प्रकरणातील वसुली आताच्या बिलात पाठविली आहे. काहींना पंधरा ते वीस वर्षांच्या मागील थकबाकी टाकून वाढीव बिलं पाठवण्यात आली आहेत. तर काही वीज ग्राहकांना कंपनीचे कर्मचारी भेटून त्यांना तुमच्या जागेतील मागील थकबाकी भरावी अन्यथा तुमच्या बिलामध्ये टाकण्यात येईल अशा धमकीवजा सूचना देत आहेत. महावितरणची ही वीज थकबाकी संपूर्णपणे बेकायदा आहे. अशा चुकीच्या वसुली कारवाईला कोणी दाद देऊ नये यासाठी कायदेशीर सल्ला, माहीती आणि मदतीसाठी वीज ग्राहक संघटनेच्या इचलकरंजी कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष आणि वीज तज्ञ्ज प्रताप होगाडे यांनी केले आहे.
पुराव्यासह बिल पाठवायला हवे
पंधरा ते वीस वर्षांपूर्वी इतक्या जुन्या थकबाकी वसुलीसाठी खरेतर नोटीस द्यायची असेल तर ती नोटीस संपूर्ण तपशिलासह, माहितीसह आणि पुराव्यासह द्यायला हवी होती. तसेच या नोटीसीला उत्तर देण्यासाठी ग्राहकांना पुरेसा अवधी द्यायला हवा होता. गरज वाटल्यास त्या संबंधी सुनावणी घ्यायला हवी होती. नोटीसीला उत्तर द्यायला ग्राहकांना पुरेसा वेळ द्यायला हवा होता. त्याऊपर ग्राहकांकडून खरेच जर येणे असेल अशी खात्री झाल्यास ग्राहकाची मागणी कारण देऊन फेटाळण्याचा पर्याय होता.
थकबाकीचे पुरावे नाहीत
हे सर्व सोपस्कार केल्यानंतरच त्या ग्राहकावर दिवाणी दावा दाखल करून वसुलीची कारवाई करायला हवी होती असे होगाडे यांनी म्हटले आहे. परंतू कोणत्याही नियम आणि तरतूदीचे पालन न करता कंपनीने बेकायदेशीर आणि अतिरेकी मोहीम सुरु केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. प्रत्यक्षात बहुतांशी प्रकरणात थकबाकी नसल्याने कंपनीकडे थकबाकीचे पुरावे नाहीत आणि तपासणीसाठी देखील ग्राहकांचे तत्कालिन खातेही उरलेले नाही असे निदर्शनास आले असल्याचे प्रताप होगाडे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.