Mahad Flood : चिपळूणपाठोपाठ महाडमध्ये पावसाचा हाहा:कार; बचावयार्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून हेलिकॉप्टरची मागणी
बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या टीम पाचारण करण्यात आल्या आहेत. पण सर्वच रस्ते बंद झाल्यामुळे एनडीआरएफच्या जवानांना शहरात जाण्यास अडचणी येत आहेत. अशावेळी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाकडे हेलिकॉप्टरची मागणी केली आहे.
रायगड : कोकणात पावसाचा कहर सुरुच आहे. चिपळूणपाठोपाठ आता रायगड जिल्ह्यातील महाडमध्येही महापुराचं थैमान पाहायला मिळत आहे. महाड शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. सावित्री नदीचं पाणी शिरल्यामुळे शहरातील सर्वच भागात 8 ते 10 फुटाच्या वर पाणी साचलं आहे. अशावेळी बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या टीम पाचारण करण्यात आल्या आहेत. पण सर्वच रस्ते बंद झाल्यामुळे एनडीआरएफच्या जवानांना शहरात जाण्यास अडचणी येत आहेत. अशावेळी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाकडे हेलिकॉप्टरची मागणी केली आहे. (Helicopter demand from District Collector for rescue operation in Mahad)
अतिवृष्टीमुळे महाड शहर आणि ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाड इथे पोहोचण्यासाठी रस्ते मार्ग बंद झाले आहे. महाड शहरास पूर्ण पाण्याचा वेढा बसलेला आहे. सध्यस्थितीत जोरात पाऊस सुरु आहे. त्यामुळे शहरातील पाणीपातळी वाढत आहे. एनडीआरएफच्या टीम पोहोचण्यासही अडचणी येत आहे. त्यामुळे रस्ते मार्गाने आवश्यक मदत तात्काळ पोहोचवणे शक्य होत नाही. तरी आपल्या स्तरावरुन तात्काळ इंडियन नेव्ही, कोस्ट गार्ड, हवाई दलाकडील 3 ते 4 हेलिकॉप्टर्स बचावकार्यासाठी रात्रीच उपलब्ध करुन देण्यात यावेत. जेणेकडून प्रभावीपणे बचावकार्य करता येईल, अशी विनंती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडे केली आहे.
महाडमध्ये दरड कोसळली, 30 घरे मातीखाली
महाडमध्ये दरड कोसळून 30 घरे मातीखाली दबल्याची माहिती मिळत आहे. महाड तालुक्यातील बिरवाडीपासून 14 km अतंरावर ही घटना घडली आहे. या घटनेत 30 घरे गाडली गेल्यामुळे यामध्ये एकूण 72 नागरिक बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. परंतु महाड शहरासह तालुक्यात विदारक परिस्थिती असून दुर्घटनेच्या ठिकाणचा सपंर्क तुटला आहे.
प्रवीण दरेकर घटनास्थळापासून अर्धा तास अंतरावर अडकले
दरम्यान विधान परिषेदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर महाडच्या पूराची पाहणी करण्यासाठी गेले आहेत. त्यावेळी त्यांनी दरड कोसळल्याची माहिती मिळाळी. मात्र, दुर्घटनास्थळापासून अर्धा किलोमीटर अंतरावर ते अडकले आहेत. “तळईपासून अर्धा तासाच्या अंतरावर मी, गिरीश महाजन, आमदार निरंजन डावखरे अडकून पडलो आहोत. तळईचे ग्रामस्थ तुळशीराम पोळ यांनी माहिती दिली आहे की, गावात 25 ते 30 घरं दरड कोसळून त्याखाली आलेली आहेत. यात कुणी जखमी किंवा मृत्यूमुखी पडल्याची माहिती मिळालेली नाही. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो. त्यांनी जवळच्या बिरवाडी पोलीस स्टेशनवरुन अधिकाऱ्यांना पाठवलं आहे. उपजिल्हाधिकारीही जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हीही एका ठिकाणी थांबलो आहोत. पाणी ओसरलं नाही तर एनडीआरएफच्या बोटीतून पुढे दासगावला जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुंबईहून बिस्किट, चटई आणि पांघरुन देण्याची व्यवस्था आम्ही करत आहोत, अशी माहिती विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिलीय.
संबंधित बातम्या :
Big Breaking | महाडमध्ये दरड कोसळली, 30 घरे मातीखाली दबल्याने 72 नागरिक बेपत्ता असल्याचा अंदाज
VIDEO | हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडले, रात्री पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता, सतर्कतेचा इशारा
Helicopter demand from District Collector for rescue operation in Mahad