पंतप्रधानपदाची स्वप्न पाहणाऱ्या नेत्याच्या पक्षाला खिंडार; शरद पवार यांचा मोठा गेम
या राज्यात कोणी बोगस मतदान करण्याच्या संदर्भात प्रथा आणली असेल तर ती प्रथा कृषी मंत्र्याने आणली आहे. आमच्या गावात भगवान बाबाचा यांनी पुतळा बांधला नाही. या पालकमंत्र्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी या नेत्याने केली आहे.
विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला ( रासप ) मोठे खिंडार पडले आहे. महादेव जानकर हे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत.या पक्षाने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आसाम, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, तमिळनाडू मध्यप्रदेश विधानसभा निवडणूका लढविल्या आहेत. सध्या आठ राज्यात पक्ष कार्यरत आहे त्यामुळे महादेव जानकर यांनी पंतप्रधान व्हायचे आपले ध्येय असल्याचे म्हटले आहे. त्याच्या पक्षातील बीड – परळी येथील मोठे नेते राजाभाऊ फड यांचा शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होत आहे. शरद पवार यांच्याशी चर्चा सुरु ठेवत लोकसभेला महादेव जानकर महायुतीच्या मांडवात गेले होते. त्याचा हा बदला शरद पवार यांनी घेतल्याचे म्हटले जात आहे.
बीड -परळी मधील रासपचे नेते राजाभाऊ फड यांचा पक्षप्रवेश शरद पवार यांच्या उपस्थितीत होत आहे.या पक्षप्रवेश सोहळ्याला बजरंग बाप्पा सोनवणे,फौजिया खान देखील उपस्थित आहेत. राजेभाऊ फड यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की शरद पवार यांचे मी आभार मानतो त्यांनी मला पक्षात प्रवेश दिला. ते पुढे म्हणाले की पीक विमा हा आमच्या परळी तालुक्यात 25 टक्के शेतकऱ्यांना मिळतो आणि बाकीचे 75 टक्के पिक विम्याची रक्कम वाटली जाते, पण आपली सत्ता आली तर तुम्ही याची चौकशी लावा अशी मागणी त्यांनी शरद पवार यांना केली. पक्ष प्रवेशाला आम्ही जेव्हा परळीमधून मुंबईसाठी निघत होतो तेव्हा आम्हाला आणि आमच्या गाडीला अडवलं आहे आणि ते घाबरलेले आहेत असेही फड यांनी सांगितले.
पवाराचा नाद करु नका !
बराच निधी आमच्या परळीला मिळाला आहे, पण तो निधी कुठे गेला, या संदर्भातील माहिती माझ्याकडे आहे. त्यासंदर्भात मी लवकरच हायकोर्टात जाणार आहे. आताचे आमदार यांनी पवारांशी गद्दारी केली आहे आणि या आमदाराची परळीमध्ये अलीबाबा आणि 40 चोरची टीम आहे, त्यामुळे फक्त याच लोकांचा विकास झाला आहे. मी शरद पवार यांच्या पक्षात जाणार आहे, त्यामुळे पोलीस संरक्षण काढून घेतलं आणि माझ्यावर गुन्हा दाखल करून घेतला. पालकमंत्री तुम्ही बोलला होता ना? कुणाचाही नाद करा पण पवारांचा नाद करू नका म्हणून मग आत्ता तुम्ही निवडणुकीत बघाच आत्ता आगामी निवडणुकीत काय होत ते असे आव्हानच फड यांनी यावेळी दिले.