महाराष्ट्राच्या कृषीमंत्र्यांकडून अवकाळी पावसाची गंभीरपणे दखल, तातडीने लागले कामाला
राज्यातील अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री अब्दुल सत्तार सतर्क झाले आहेत. त्यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. धुळे जिल्ह्यात तर खोरी टिटाने भागात गारपीट पडल्याची माहिती मिळत आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागांमध्येही पाऊस पडल्याची माहिती मिळत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला आहे. या अवकाळी पावसाचं नुकसान पाहता राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. याशिवाय त्यांनी या नुकसान भरपाईची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी तातडीने अधिकाऱ्यांना पंचनामा करुन नुकसान भरपाईबद्दलचे आदेश दिले आहेत.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश दिले आहेत. राज्यातील काही भागांमध्ये पाऊस पडलाय. संबंधित भागांमध्ये तातडीने पंचनामे करावे, असा आदेश अब्दुल सत्तार यांनी दिलाय. शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी कृषीमंत्र्यांनी याबाबतचे आदेश दिले असल्याची माहिती समोर आली आहे.
‘सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती…’
“महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, काही शेतकरी हवालदिल झाले आहेत, सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे, तुमचं जे नुकसान झालंय त्या सर्वांचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामा झाल्यानंतर सरकार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. पण मी पंचनामे करण्याचे आदेश तातडीने दिले आहेत. अधिकारी, जिल्हाधिकारी सर्व पंचनामे करुन आमच्याकडे माहिती पाठवतील”, असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.
धुळे जिल्ह्यात गारपीट
दरम्यान, धुळे जिल्ह्यातील खोरी टिटाने भागात गारपीट झाल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे तब्बेल एक तास इथे गारपीटचा पाऊस पडला. त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. दुसरीकडे नंदुरबारमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. पावसामुळे होळीच्या बाजारावर देखील मोठा परिणाम झालाय.
अहमदनगर जिल्ह्यातही पाऊस
विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पडला. त्यामुळे वातावरणात काही काळासाठी गारवा आला. पण या पावसामुळे शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालंय.
अवकाळी पावसाचा मुक्काम किती दिवस राहणार?
राज्यात अवकाळी पावसाचा कहर कालपासून सुरु झालाय. हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला धास हिरावून घेणारा असाच आहे. त्यामुळे हा अवकाळी पाऊस कधी जाणार? असा प्रश्न अनेकांना सतावतोय. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढचे तीन दिवस जास्त महत्त्वाचे आहेत. हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी याबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे.
एक द्रोणीय स्थिती द. कोकण ते मध्य छत्तीसगड पर्यंत आहे. त्या प्रभावाखाली 6-9 मार्च काळात महाराष्ट्रात गडगडाटी वादळासह हलका/मध्यम पाऊस पडण्याची शक्यता. 6-7 मार्चला गुजरात व मध्य महाराष्ट्रात, तर 7 मार्चला मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता असल्याची माहिती होसाळीकर यांनी दिली आहे.