मास्क, सोशल डिस्टन्सिंग गरजेचे; हार, फुले, ओटी आणण्यास मनाई, कोणत्या मंदिरांचे नियम काय?
मुंबईकरांचे आराध्य दैवत असणारे महालक्ष्मी मंदिर आणि सिद्धीविनायक मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत. (Maharashtra All Temple Reopen After 8 months)
मुंबई : कोरोना काळात तब्बल 9 महिन्यांनी राज्यातील मंदिरं खुली झाली आहेत. राज्यातील सर्वधर्मियांच्या प्रार्थनास्थळांचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत. मात्र मंदिरात किंवा कोणत्याही प्रार्थनास्थळांमध्ये दर्शन घेताना संबंधित प्रशासनाने काही नियमावली तयार केली आहे. आधी ऑनलाईन नोंदणी, मगच दर्शन हा नियम राज्यातील सर्वच मंदिरांनी केला आहे. त्यामुळे तुळजाभवानी, पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, अक्कलकोट, जेजुरी आणि शिर्डीत दर्शनासाठी ऑनलाईन पासची सोय करण्यात आली आहे. दुग्धाभिषेक, सिंहासन पूजेसह इतर पूजा करण्यास मनाई करण्यात आली आहे. (Maharashtra All Temple Reopen After 8 months)
मुंबईकरांचे आराध्य दैवत असणारे महालक्ष्मी मंदिर आणि सिद्धीविनायक मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने काही नियमावली तयार केली आहे. मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात मोबाईल अॅपवरील क्यूआर कोड दाखवून भाविकांना दर्शन देण्यात येत आहे. शरीराचं तापमान मोजून आणि मास्क घातला असेल तरच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.
प्रतितास 100 या प्रमाणे क्यूआर कोड तपासून भाविकांना दर्शनाची परवानगी देण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना या अॅपवरुन 24 तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. मात्र, पुढे परिस्थिती पाहून ज्येष्ठ नागरिकांसाठी निर्णय घेतला जाणार आहे, असे सिद्धीविनायक मंदिर प्रशासनाने सांगितले आहे.
Maharashtra: Devotees offer prayers at Shirdi Sai Baba temple; all religious places in the State have been allowed to reopen from today after remaining shut for months.#COVID19 pic.twitter.com/gdJuk3ugKc
— ANI (@ANI) November 16, 2020
मंदिरात दर्शनासाठी लहान मुलांना परवानगी नाही
तुळजाभवानी मातेचे मंदिर सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी 10 वर्षाखालील लहान बालके आणि 65 पेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक यांना प्रवेश नाकारण्यात आला. मास्क आणि इतर सर्व गोष्टी पूर्ण असल्यावरच त्यांना प्रवेश दिला जात आहे. लहान बालके आणि ज्येष्ठ नागरिक मंदिरात न जाता मुख्य महाद्वारातून कळस दर्शन घेत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 8 महिन्यापासून बंद असणारे मंदिर आजपासून उघडी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आज सकाळी 5 वाजल्यापासून विरारच्या जिवदानी मंदिर देवस्थानचे ट्रस्टी आणि कर्मचारी भाविकांसाठी सज्ज झाले होते. गडाच्या पायथ्याशी सोशल डिस्टन्स राखण्यासाठी स्टिकर लावण्यात आले आहेत. त्यानंतर गडावर जाणाऱ्या प्रत्येक भक्तांची थर्मल स्कॅनिंग करून आणि सॅनिटायझर लावूनच गडावर सोडण्यात येत आहे.
मंदिरात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे
शिर्डीतील साईमंदिरात आज दिवसभरात केवळ सहा हजार भाविकांना दर्शन दिले जाणार आहे. भाविकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्क लावणे बंधनकारक असणार आहे. संस्थानकडून सर्व भाविकांची थर्मल स्कॅनिंग केली जात आहे. अनेक बंधने जरी असली तरी आज देवदर्शन घेता येत असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
तब्बल आठ महिन्यांच्या कालावधीनंतर राज्यातील धार्मिक स्थळं पाडव्याच्या शुभमुहूर्तावर खुली झाली आहेत. त्या निमित्तानं पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर सॅनिटाईज केलं आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात प्रवेश करताना मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवून दर्शन घेणे. त्याच बरोबर मंदिरात कुणालाही बसण्यासाठी परवानगी नसणार आहे. त्यामुळे भाविकांनी योग्य काळजी घेऊन बाप्पाचं दर्शन घ्यावं असं आवाहन करण्यात आलं आहे.(Maharashtra All Temple Reopen After 8 months)
Maharashtra: Devotees offer prayers at Shri Ganesh Tekdi temple in Nagpur as it reopened today following the state government’s permission to open religious places. pic.twitter.com/h6V3WuJPhz
— ANI (@ANI) November 16, 2020
हार, फुले, ओटी आणण्यास मनाई
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले जेजुरीचे खंडेरायाचे मंदिर देखील भाविकांसाठी आजपासून दर्शनाला खुले करण्यात आले आहे. आज सकाळी जेजुरी गडावर भंडारा उधळून येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात मंदिर उघडण्यात आले. यावेळी गडावर पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप आणि राजवर्धिनी जगताप यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
एका विशिष्ट वेळेत 100 भाविकांना टोकन देऊन मंदिरात प्रवेश देण्यात येत आहे. मंदिरात गर्दी होणार नाही याची पूर्ण खबरदारी मंदिर प्रशासनाने घेतली असून सॅनिटायझर, थर्मामीटरवर तापमान चेक करूनच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. अनेक महिन्यांनंतर मंदिर उघडले असल्याने आपल्या कुलदैवताच्या दर्शनासाठी भाविक गडावर दाखल होत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. शासनाने सर्व धार्मिकस्थळं सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 4 ते सायंकाळी 7 या कालावधीत भाविकांना देव दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. यावेळी लहान मुलांना, गरोदर स्त्री व वृद्ध नागरिकांना देवदर्शनासाठी बंदी घालण्यात आली आहे. देवीला हार, ओटी साहित्य आणण्यास बंदी घालण्यात आली आहे.
पूजा, अभिषेक करण्यास बंदी
रत्नागिरीतील प्रसिद्ध अशा स्वयंभू गणपतीपुळेचे मंदिर पहाटे 5 वाजता उघडण्यात आलं आहे. आजपासून श्रींच्या दर्शनासाठी स्थानिक ग्रामस्थांना पहाटे 5.30 ते सायंकाळी 7.30 वाजेपर्यत दर्शन मिळणार आहे. तर गावाबाहेरुन येणाऱ्या भाविकांना सकाळी 8 ते दुपारी 12 वाजता या वेळेत दर्शन घेता येणार आहे.
मंदिरात येताना दुर्वा , फुले इत्यादी ओले साहित्य न आणता नारळ आदी सुका मेवा हा प्रसाद बंद पिशवीमध्ये पॅक करुन आणण्यास परवानगी देण्यात आली आहे. श्रींच्या मंदिरामध्ये पूजा, अभिषेक करता येणार नाही. मंदिरात येताना मास्क बंधनकारक आहे. तसेच सुरक्षित अंतर ठेवून दर्शनासाठी रांगा लावा असे सांगण्यात आले आहे.
तसेच 10 वर्षाखालील मुले, 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, दीर्घकालीन आजारी व्यक्तींनी मंदिरात येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra All Temple Reopen After 8 months)
संबंधित बातम्या :
महाराष्ट्रातील प्रत्येक मंदिराचे दरवाजे 9 महिन्यांनी उघडले, भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण
‘या’ दोन मंदिरांचे दरवाजे भक्तांसाठी आजही बंद, जाणून घ्या कारण