प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथात साडेतीन शक्तीपीठांचा समावेश, दिल्लीत अवतरणार वणीची सप्तश्रृंगी देवी
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नवी दिल्लीत होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाचा अखेर समावेश होणार आहे. यंदाच्या वर्षी महाराष्ट्राकडून साडेतीन शक्तीपीठ आणि स्री शक्तीचा जागर होणार आहे.
नाशिक : नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संचलनात चित्ररथात यंदाच्या वर्षी महाराष्ट्राचा खंड पडणार अशी स्थिती असतांना अखेरच्या क्षणी महाराष्ट्राला विशेष बाब म्हणून चित्ररथात संधी देण्यात आली आहे. दरवर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथाची जोरदार चर्चा होत असते, यंदाच्या वर्षी चित्ररथ नसल्याने राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या होत्या. पण, राज्याचा सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून पाठपुरावा करून चित्ररथाचे स्थान पुन्हा मिळाव्यात आले आहे. चित्ररथात दरवर्षी खास असा देखावा केला जातो त्यातून विशेष असा संदेश देण्याचा प्रयत्नही केला जातो. महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दिल्लीत प्रदर्शन होत असल्याने महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब असते. यंदाच्या वर्षी चित्ररथात साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर होणार आहे. याबाबतची माहिती राज्याचे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय. लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साडेतीन शक्तीपीठांचा समावेश असल्यानं हा चित्ररथ कसा असणार याची उत्सुकता लागली आहे. नाशिकमधील वणीच्या देवीचा समावेश असल्याने उत्तर महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनी संपूर्ण देशाचे लक्ष लागून असते. प्रजासत्ताक दिनाला असलेल्या संचलनात राज्याकडून कोणती संकल्पना आहे याची उत्सुकता सर्वांना असते.
विशेषतः महाराष्ट्र राज्याचा असलेला चित्ररथ संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरत असतो. कलाकुसरीसह हुबेहूब प्रत्येक गोष्टींची काळजी घेतली जाते, त्यामुळे महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांकही पटकावला आहे.
यंदाच्या वर्षी होणाऱ्या चित्ररथात साडेतीन शक्तिपीठे स्त्रीशक्ती जागर ही संकल्पना आहे. यामध्ये देवींच्या भव्य आणि तितक्याच सुंदर प्रतिमांचे दर्शन संपूर्ण देशाला होणार आहे. यातून स्त्री सामर्थ्याचा संदेश दिला जाणार आहे.
कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचं श्री क्षेत्र तुळजापूर, माहूर गडावरील रेणुका माता आणि वणीच्या गडावरील सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा चित्ररथात समावेश असणार आहे.
साडेतीन शक्तीपीठांचा चित्ररथात समावेश असल्याने स्री सामर्थ्य आणि स्री शक्तीचा जागर महाराष्ट्राच्या माध्यमातून होणार आहे, त्यामुळे दिल्लीतील प्रजासत्ताक दिन साजरा होत महाराष्ट्राच्या चित्ररथाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असणार आहे.