Heat Wave : राज्यात आठवडाभर दिवसभर उष्णतेची लाट आणि सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार
मुंबई आणि परिसरात गेले काही दिवस उष्णतेची लाट येणार आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. बाहेर पडताना सोबत पाणी, डोक्यावर टोपी, गॉगल याचाही वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. सायंकाळी पावसाच्या सरी कोसळ्याचा अंदाज आहे.
मुंबई – गेल्या काही दिवसात वातावरणात उष्मा भयंकर वाढल्याने ठाणे आणि नवीमुंबईत जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तीन दिवसांपूर्वी मुंबईत वादळी वारे वाहून जोरदार पाऊस पडला होता. त्यामुळे काही काळ हवेत गारावा आला होता. परंतू काल रात्री मुंबईत प्रचंड आद्रता वाढून हवामानात उष्णता वाढली आहे. त्यात ठाणे आणि नवीमुंबईत येत्या काही तासांत पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यातील उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. कोकणात, मराठवाड्यात आणि ठाणे तसेच नवीमुंबईत वीजेच्या कडकडाटासह पाऊसाच्या सरी बरसण्याच्या शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पुणे, धुळे, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर, सातारा, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दहा जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह जोरदार वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. नाशिक आणि नगर मध्ये देखील पावसाच्या सरी कोसळण्याची अंदाज वर्तविण्यात आला आहे. मुंबईत तीन दिवसांपूर्वी वादळीवाऱ्याने घाटकोपरच्या छेडा नगरात होर्डिंग कोसळल्याने आतापर्यंत सोळा जणांचा मृत्यू झाला आहे. येत्या काही दिवसात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे या जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे. तर सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आला आहे. नगर, धुळे, परिसरात गारांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणि उद्या जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. तर दर ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मराठवाड्यात उष्णतेचा कहर
लातूर, धाराशिव, नांदेड, बीड या जिल्ह्यात 19 मे पर्यंत वीजाच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. वाशिम, यवतमाळ, गडचिरोली, अमरावती, अकोला, हिंगोली येथे देखील सोसाटयाच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आला आहे. मुंबईत आणि परिसरात आद्रता प्रचंड वाढल्याने उष्णता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे दुपारी उन्हात फिरु नये असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. सोबत पाण्याची बाटली, डोक्यावर टोपी, गॉगल असा बंदोबस्त करुन घराबाहेर पडा असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मुंबईकरांनी येत्या काही दिवस घामाच्या धारांचा त्रास सहन करावा लागणार असल्याचे म्हटले जात आहे.