नागपूर : राज्यातील विविध भागात कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. काही ठिकाणी महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळताना दिसतय. कौल लक्षात घेता, शिंदे-फडणवीस सरकार पिछाडीवर पडल्याच दिसतय. या निवडणूक निकालांवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व्यक्त झाले आहेत. त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत भाजपा-शिवसेना युतीवर टीका केली.
“भाजप शेतकरी विरोधी आहे. महागाईच्या माध्यमातून जगणे मुश्किल करून ठेवले आहे. देशात भाजप विरोधी लाट आहे. भाजप विरोधातील चित्र पाहायला मिळत आहे. बाजार समितीत हेच चित्र दिसत आहे” अशी टीका नाना पटोले यांनी केली.
‘राज्यात भाजप विरोधी लाट’
“भंडाऱ्यात राष्ट्रवादी आणि भाजप सोबत होते. एक-दोन ठिकाणी असं होऊ शकतं. मात्र राज्यात भाजप विरोधी लाट आहे. बाजार समिती निवडणुकीत राज्यात भाजपा विरोधात राग पाहायला मिळत आहे” असं नाना पटोले म्हणाले.
बारसूबद्दल काय म्हणाले?
“मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याला काही अर्थ राहत नाही. बारसूमध्ये मी स्वतः जाऊन आलो होतो. कोकणातला माणूस निसर्गप्रेमी आहे. भले बाहेर नोकरी करत असतील तरी सणांना आपल्या घरी परत येतात, लोकांचा विरोध का आहे? स्थानिकांशी चर्चा करायला हवी, सरकारच्या बगलबच्चांनी जमिनी घेऊन ठेवल्या आहेत” अशी टीका नाना पटोले यांनी केली.
बारसूमधील लोकांच्या घरी जाऊन आलो आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांच्याशी चर्चा करावी. आमचा प्रकल्पाला विरोध नाही, पण पर्यावरण आणि नागरिकांचा विचार करावा असं पटोले म्हणाले.
जमिनीच्या जास्त भावासाठी प्रकल्प रेटला जातोय का?
“प्रकल्प कोकणात झाला पाहिजे त्याला कुणाचा विरोध नाही, पण आपल्या लोकांच्या जमिनीला जास्त भाव मिळावा म्हणून प्रकल्प रेटून धरणे उचित नाही. विदर्भातील प्रकल्प गुजरातला नेले, पण रिफायनरीचा प्रकल्प कोकणातच व्हावा, यासाठी हे सरकार आग्रही का आहे?” असा सवाल पेटोले यांनी केला.
‘जर तरमध्ये आम्हाला जायचे नाही’
“जर तर मध्ये आम्हाला जायचे नाही, अवकाळीमुळे शेतकरी उद्धवस्त झाला आहे. जनतेचे प्रश्न आज महत्वाचे आहेत. आजची स्थिती लक्षात घेऊन काम करावे. बेरोजगारीवर सरकार का बोलत नाही? महाराष्ट्राचा तमाशा चालवला आहे. काँग्रेसकडून सीएम बाबत कुठलेही वक्तव्य आलेले नाही, आता कुठलीही निवडणूक नाही, जनतेच्या प्रश्नावर काँग्रेस आवाज उठवत राहणार, असं नाना पटोले म्हणाले.