मुंबईतील ‘या’ मतदारसंघात ठाकरे विरुद्ध ठाकरे होणार लढत, मनसेचा उमेदवार निश्चित, उद्धव ठाकरेंकडून चाचपणी सुरु
महाराष्ट्रातील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मनसेकडून अमित ठाकरे यांना माहिम मतदारसंघातून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्यांची उमेदवारी जाहीर होण्याची तयारी सुरू आहे. ठाकरे गट देखील दादर-माहिम मतदारसंघासाठी उमेदवार देण्याचा प्रयत्न करत आहे.
Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत राज्यातील निवडणुकांची घोषणा केली. येत्या २० नोव्हेंबर २०२४ ला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर तीन दिवसांनी २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच आता सर्वत्र राजकीय पक्षांकडून उमेदवारी यादी घोषित केल्या जात आहेत. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनसे नेते अमित ठाकरे यांना रिंगणात उतरवण्याची जबरदस्त तयारी केली जात आहे. अमित ठाकरे यांच्यासाठी मनसेकडून मतदारसंघही निश्चित करण्यात आला आहे.
अमित ठाकरेंसाठी मतदारसंघांची चाचपणी
गेल्या काही दिवसांपासून मनसेच्या पक्षांतर्गत बैठका सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका बैठकीत मनसे नेते अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. अमित ठाकरे यांच्या या मागणीला कार्यकर्त्यांनीही चांगला प्रतिसाद दिला होता. यानंतर अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, याची चाचपणी केली जात होती. अमित ठाकरे यांच्यासाठी भांडुप, मागठाणे आणि माहिम या तीन मतदारसंघांची निवड करण्यात आली होती. या तिन्ही मतदारसंघात मराठी मतांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अमित ठाकरे जर या तिघांपैकी एका मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले तर सहज जिंकून येऊ शकतात, असे म्हटलं जात आहे.
संदीप देशपांडे आणि अमित ठाकरेंची उमेदवारी आज जाहीर होणार
त्यातच आता सूत्रांच्या माहितीनुसार, मनसेकडून अमित ठाकरे यांना निवडणूक लढवण्यासाठी माहिम विधानसभा मतदारसंघ योग्य असल्याचे बोललं जात आहे. माहिम विधानसभा मतदारसंघात सध्या शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर हे सक्रीय आहेत. जर अमित ठाकरे यांनी माहिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, तर सदा सरवणकर यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे मनसे संदीप देशपांडे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोललं जात आहे. लवकरच मनसेकडून अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे यांची उमेदवारी जाहीर केली जाणार आहे.
ठाकरे विरुद्ध ठाकरे लढत होणार?
तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे दादर-माहिम विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहेत. उद्धव ठाकरे यांनी दादर माहिम विधानसभेत चांगला चेहरा द्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. दादर माहिम विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून महेश सावंत आणि प्रकाश पाटणकर हे दोघेही इच्छुक आहेत. या दोघांसोबतच उद्धव ठाकरेंनी वेगवेगळी चर्चा केली. या चर्चेनंतर आता ठाकरे गटाकडून दादर-माहिम विधानसभा मतदारसंघावर कोणाला उमेदवारी द्यायची, याची चाचपणी केली जात आहे. त्यामुळे दादर-माहिम मतदारसंघात अमित ठाकरे विरुद्ध कोण लढणार याकडे सर्वांचेच लक्ष झालं आहे.