Maharashtra Breaking News LIVE : पाथरीतून अपक्ष निवडणूक लढविणारच – बाबजानी दुर्राणी
Maharashtra Election News LIVE : आज 2 नोव्हेंबर 2024. दापोली विधानसभा मतदार संघात राजकीय आरोप-प्रत्यारोप. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
आज दिवाळी पाडवा आहे. त्यानिमित्त सगळीकडे उत्साहाचं वातावारण आहे. बारामतीमध्ये दरवर्षीप्रमाणे पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी कार्यकर्ते येत आहेत. मात्र पहिल्यांदाच बारामतीत दोन दिवाळी पाडवा साजरे केले जात आहेत. शरद पवारांना भेटण्यासाठी गोविंदबागेत कार्यकर्यांनी गर्दी केली आहे. तसंच अजित पवार देखील काटेवाडीत दिवाळी पाडवा साजरा करत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अपात्रता प्रकरणात सुप्रीम कोर्टात पुन्हा नव्या तारखा देण्यात आल्या आहेत. 5 नोव्हेंबरला सुनावणीची तारीख आहे. या सोबतच क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
राहुल गांधी 6 नोव्हेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी सांगितले की, लोकसभेचे नेते राहुल गांधी 6 नोव्हेंबरला महाराष्ट्रात येत आहेत. त्यांचा पहिला कार्यक्रम नागपुरात होणार आहे. भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी ही परिषद आहे. त्यानंतर ते संध्याकाळपर्यंत बीकेसीला पोहोचतील, तिथे आम्ही एक मोठी रॅली काढणार आहोत. या रॅलीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार आणि उद्धव ठाकरेही सहभागी होणार आहेत.
-
श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 4 सुरक्षा जवान जखमी
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर भागात लपलेल्या दहशतवाद्यांसोबत सुरू असलेल्या चकमकीत चार सुरक्षा कर्मचारी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी बीबी कँट रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. बशारत रसूल, सुनील शर्मा, फिदा हुसेन आणि संजय तिवारी अशी जखमींची नावे आहेत.
-
-
पंतप्रधानांचे काँग्रेसवरील आरोप सत्याच्या पलीकडे : प्रियंका गांधी
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी म्हणाल्या की, पंतप्रधानांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवर केलेले आरोप सत्याच्या पलीकडे आहेत. काँग्रेस पक्षाने पुढील निवडणुकीची वाट न पाहता राज्यातील जनतेला दिलेली आश्वासने सरकार स्थापन होताच पूर्ण करण्याचे काम सुरू केले आहे. कर्नाटक असो, तेलंगणा असो की हिमाचल प्रदेश, काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये हमीभावाच्या माध्यमातून जनतेचा पैसा दररोज जनतेच्या खिशात घातला जात आहे.
-
पोटनिवडणुकांच्या घोषणेने भाजप आणि सपाची झोप उडाली: मायावती
बसपा प्रमुख मायावती म्हणाल्या की, उत्तर प्रदेशातील नऊ जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून भाजप आणि सपा युतीची झोप उडाली आहे. या जागांवर बसपा एकटाच लढत आहे. बसपाने बऱ्याच दिवसांपासून येथील बहुतांश पोटनिवडणुका लढवलेल्या नाहीत.
-
पाथरीतून अपक्ष निवडणूक लढविणारच – बाबजानी दुर्राणी
पाथरी विधानसभेत मला चांगला प्रतिसाद आहे, मी अपक्ष उमेदवारी भरलेली आहे, आणि मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार यावेळी माघार नाहीच, मला लढायचं आहे असे बाबाजानी दुर्राणी यांनी म्हटले आहे.
-
-
प्रहारच्या उमेदवाराचा नालासोपारात ऐन दिवाळीत घरोघरी प्रचार
नालासोपारा विधानसभेत तिसरी आघाडीतील प्रहारचे उमेदवार धनंजय गावडे यांची दिवाळीच्या मुहूर्तावर घरोघरी भेट
-
राजू शेट्टी यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. सोबत पंढरपूरचे काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके देखील होते.
-
वाचाळवीरांनी थांबायला पाहिजे -अजित पवार
वाचाळवीरांनी थांबायला पाहिजे. पक्ष प्रमुखांनी त्याविषयीची दखल घेतली पाहिजे, नाहीतर पोलीस यंत्रणेने त्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे अशी प्रतिक्रिया अरविंद सावंत यांच्या प्रकरणात अजित पवार यांनी दिली.
-
संजय राऊत, जयंत पाटलांना फडणवीसांचा चिमटा
जयंत पाटलांचा चेहरा बघा ते कायम मस्करीच करत असतात. त्यांना सिरियसली घेत जाऊ नका. तर संजय राऊतांबद्दल बोलायला नको, असा चिमटा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढला.
-
माढ्यात माझाच विजय-अभिजीत पाटील
४० गद्दार आमदारांमध्ये बबन शिंदे होते. मात्र फक्त उसावर राजकारण करतात तालुक्यात प्रश्न सुटले नाहीत. लोक म्हणतात माढा तालुक्यात फक्त तुतारी पाहिजे. मला पवार साहेबांनी उमेदवारी दिली आहे त्याबद्दल आभार मानतो. माढा विधानसभेत मी विजयी होणार असा विश्वास अभिजित पाटली यांनी व्यक्त केला.
-
गोपाळ शेट्टीबाबत फडणवीस यांचे मोठे विधान
गोपाळ शेट्टी हे पक्षाची बाजू नेहमी राखतात. त्यांना पक्ष शिस्त माहिती आहे. त्यांची नाराजी असली तरी माझी पूर्ण अपेक्षा आहे की ते पक्षाच्या बाजूने निर्णय घेतली अशी प्रतिक्रिया गोपाळ शेट्टी यांच्याप्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
-
अंतर्गत विषयात बोलणे योग्य नाही
पवार कुटुंबीयांचे दोन ठिकाणी दिवाळी पाडवे होत आहेत. यावर प्रफुल पटेल यांना विचारले असता… पवार कुटुंबांचे जे काही आंतरिक विषय आहेत त्याच्यामध्ये मी भाष्य करू इच्छित नाही… गेल्या 40-50 वर्षांपासून पवार कुटुंबीयांसोबत माझे जवळचे संबंध राहिलेले आहेत. हे संबंध आजही आहेत आणि कायम राहतीलच पण त्यांच्या कुटुंबामध्ये जे काही आंतरिक विषय झाले असतील त्यात मला बोलणं योग्य वाटत नाही असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
-
प्रचाराचा ताफा आडवला, बीडमध्ये गुन्हा दाखल
बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारांचा ताफा अडविण्याचा प्रकार समोर आला होता. विधानसभा निवडणुकीत देखील असाच काहीसा प्रकार समोर आल्यानंतर बीड पोलिसांनी स्वतःहून फिर्यादी होत दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय.
-
नाशिकमध्ये कपडे विक्रेत्यांवर हल्ला
नाशिकच्या तिबेटीयन मार्केट येथील कपडे विक्रेत्याने कपडे फुकट दिले नाही म्हणून हल्ला करण्यात आला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. 10 – 12 जणांच्या टोळक्यांकडून हा हल्ला करण्यात आला.
-
जखमी तरुणाची मुख्यमंत्र्यांकडून चौकशी
मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावरील नियोजित बैठका आटोपून रात्री उशिरा ठाण्याकडे निघाले होती. त्यावेळी बिकेसी येथील ब्रिजवर त्यांना एक बाईकस्वार जखमी अवस्थेत पडून असल्याचे निदर्शनास आले. तत्काळ मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा थांबवून या तरुणाची विचारपूस केली. रस्त्यावर अचानक अपघात झाल्याने त्याच्या हाताला दुखापत झाल्याचे त्याना कळले. त्यानंतर तत्काळ त्यांनी आपल्या ताफ्यातील अम्ब्युलन्स मधील डॉक्टराना बोलावून या तरुणांच्या हातावर उपचार करायला सांगितले.
-
बीएसपीच्या उमेदवारावर हल्ला
चिखली विधानसभाचे बीएसपीचे अधिकृत उमेदवार शंकर चव्हाण यांच्यावर हल्ला झाला आहे. रात्रीच्या सुमारास 40, 50 जणांकडून हल्ला झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले. -
पोलीस महासंचालकाबाबत प्रथमच चर्चा- पवार
राज्यात पहिल्यांदाच पोलीस महासंचालकाबाबत जाहीरपणाने लोक आणि राजकीय पक्ष मागण्या करत आहेत. ही स्थिती कधीच आली नव्हती. त्या व्यक्तीबाबत बोललं जातं. त्यांनी काय काय उद्योग केले, फोन टॅपिंग झाली त्याची चर्चा झाली, असे शरद पवार यांनी म्हटले.
-
अजित पवार काही कामामुळे दिवाळी पाडव्याला आले नसतील – शरद पवार
“अजित पवार काही कामामुळे दिवाळी पाडव्याला आले नसतील. अजित पवारांना वेळ मिळाला नसेल पण बाकी आलेत” असं शरद पवार म्हणाले. दिवाळी पाडव्याला शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी सर्व पवार एकत्र जमतात.
-
आर.आर.पाटलांचा स्वच्छ राजकारणी असा लौकीक- शरद पवार
“सत्ता हाती असली की काहीही बोलायला मोकळे असा काहींचा समज आहे. सिंचन घोटाळ्याचा उल्लेख आम्ही केला नव्हता. आर.आर.पाटलांचा स्वच्छ राजकारणी असा लौकीक” असं शरद पवार म्हणाले.
-
राज्यातील आणि देशातील आर्थिक स्थिती सिरीयस – शरद पवार
“राज्यातील आणि देशातील आर्थिक स्थिती सिरीयस आहे. परिस्थिती सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. महिना दोन महिन्यात चित्र दिसेल. सरकारने ज्या योजना आणल्यात त्याचे चित्र दिसेल” असं शरद पवार म्हणाले.
-
विकास करणाऱ्यांना लोकांनी सत्ता दिली पाहिजे – शरद पवार
“परिवर्तन आणण्याचा आजच्या दिवशी निर्धार करायचा आहे. एकत्र मिळून आपण परिवर्तन आणू शकतो. आपल्याला राज्य योग्य मार्गावर आणायच आहे. केवळ राजकारण केल्याने प्रश्न सुटत नाही. राज्यात सत्ता परिवर्तन करायचं आहे. विकास करणाऱ्यांना लोकांनी सत्ता दिली पाहिजे” असं शरद पवार म्हणाले.
-
भाजपा वाशिम जिल्हा कार्यकारी अध्यक्षपदी राजू पाटील
भाजपा वाशिम जिल्हा कार्यकारी अध्यक्षपदी राजू पाटील राजे यांची नियुक्ती. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली नियुक्ती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजू पाटील राजे यांच्यावर मोठी जबाबदारी. राजू पाटील राजे यांची कुशल संघटक म्हणून जिल्ह्यात ओळख. कारंजा विधानसभा मतदारसंघातून लडण्यास होते इच्छूक. मात्र तिथे सई डहाके यांना उमेदवारी दिल्यानंतर राजे यांच्यावर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी.
-
परिवर्तन झालं पाहिजे हे स्पष्ट आहे – खासदार शाहू महाराज छत्रपती
“जनतेच्या मनामध्ये शासनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे हे स्पष्ट आहे. गेल्या दोन अडीच वर्षाचा कारभार पाहिला तर जनतेच्या हिताचा कारभार झाला आहे असं वाटत नाही. महाराष्ट्राच्या निवडणूकीचा प्रचार शुभारंभ हा कोल्हापुरातून होतो, त्यामुळेच आपल्या जिल्ह्याचे महत्व महाराष्ट्राला कळाले” असं खासदार शाहू महाराज छत्रपती म्हणाले.
-
सुधाकर बडगुजर यांनी घेतली संजय राऊतांची भेट, विधानसभा निवडणुका संदर्भात केली चर्चा
नाशिक – सुधाकर बडगुजर यांनी घेतली मुंबईत संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नाशिक जिल्ह्यातील विधानसभा निवडणुका संदर्भात चर्चा केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नाशिकमधील सभेच्या नियोजनासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे नाशिकमध्ये जास्तीत जास्त सभा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात सुधाकर बडगुजर हे स्वतः उमेदवार आहेत.
-
सांगलीत पाडव्याच्या मुहूर्तावर पार पडलेल्या हळद सौद्यात हळदीला 14 हजार 100 उच्चांकी दर
सांगली : जागतिक हळदीची बाजार पेठ म्हणून ओळख असणाऱ्या सांगलीच्या बाजार पेठेत दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर हळदीचे सौदे पार पडले आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पार पडलेल्या हळद सौद्यात राजापुरी हळदीला 14 हजार 100 इतका उंच्चांकी दर मिळाला आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर हळदीचे सौदे काढण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सांगलीच्या बाजारपेठेमध्ये जोपासण्यात येतेच. यंदा देखील पाडव्याच्या मुहूर्तावर हळदीचे सौदे पार पडले. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला
-
जळगावात नाकाबंदीदरम्यान चार लाखांची रोख जप्त, तपास सुरु
मुक्ताईनगर जळगाव :निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान साडे चार लाखांची रोख जप्त करण्यात आली आहे. मुक्ताईनगर कर्की फाट्याजवळ नाकाबंदीत ही रक्कम आढळून आले. मध्यप्रदेश महाराष्ट्र सीमेवर पोलिसांनी नाकाबंदी चालू केली आहे. पोलिसांनी ही कारवाई केली असून, सध्या या गोष्टीचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.
-
महाविकासआघाडीत बंडाचा झेंडा कायम, कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, अविनाश लाड यांचे वक्तव्य
रत्नागिरी- राजापूर विधानसभा मतदारसंघात महाविकासआघाडीत बंडाचा झेंडा कायम पाहायला मिळत आहे. सोशल मिडियावरून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी अपक्ष निवडणुक लढवण्याचे संकेत दिले होते. कुठल्याही परिस्थितीत आता माघार नाही, राजापूर विधानसभा मतदार संघात मी एकमेव स्थानिक उमेदवार आहे, बाकीचे उमेदवार बाहेरचे आहेत. त्यामुळे ही लढाई स्थानिकांसाठी खूप महत्त्वाची आहे, असे अविनाश लाड म्हणाले. तर दुसरीकडे महाविकासआघाडीचे उमेदवार राजन साळवी यांच्याकडून अविनाश लाड यांच्या बंडखोरीवर स्पष्टीकरण देण्यात आले. येत्या ४ तारखेला अविनाश लाड माघार घेतील, यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न सुरु आहे. ५ तारखेपासून अविनाश लाड माझ्या प्रचारात दिसतील, असेही राजन साळवी म्हणाले.
-
मी छातीवर दगड ठेवून निर्णय घेतला, मला साथ द्या, मधुकरराव चव्हाण यांचे आवाहन
धाराशिव- तुळजापूर मतदारसंघात बंडखोरी करत माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी प्रचाराला सुरुवात केलीय. धाराशिव येथे बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांना बोलताना मी छातीवर दगड ठेवून पक्षाच्या विरोधात निर्णय घेतलाय मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही. तुम्ही मला या वयात सहकार्य करा म्हणत मधुकरराव चव्हाण यांनी बैठकीत बसलेल्या कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली. यावेळी चव्हाण काहीशे भावनिक झालेले दिसले. एवढे दिवस पक्षाचे एक निष्ठेने काम करूनही पक्षाने डावल्याने मला दुःख झाले, असेही मधुकरराव चव्हाण यांनी सांगितलं.
-
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्र्नोईच्या प्रत्यार्पणासाठी मुंबई गुन्हे शाखेच्या हालचाली
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्र्नोईच्या प्रत्यार्पणासाठी मुंबई गुन्हे शाखेच्या हालचाली सुरू आहेत. अनमोल बिश्र्नोईच्या प्रत्यार्पणासाठी मुंबई गुन्हे शाखेने सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. अनमोल बिश्नोई सध्या कॅनडात लपून बसल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या तसेच अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारा प्रकरणी अनमोल बिश्र्नोई वॉन्टेड आहे.
-
सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांच्याविषयी भाजपचे नेते काय बोलले होते ? संजय राऊत यांचा सवाल
सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांच्याविषयी भाजपचे नेते काय बोलले होते ? भाजपावाले इम्पोर्टेड माल बोलले तेव्हा गप्प का होतात ? अरविंद सावंतांच्या वक्तव्यावरून माजलेल्या गदारोळानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया. सावंत यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे.
-
फडणवीसांना मुख्यमंत्र्यापासून धोका आहे का ? संजय राऊतांचा सवाल
देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्र्यापासून धोका आहे का ? राज्याचे गृहमंत्रीच सुरक्षित नाहीत असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.
-
मोदींनी नेमलेला सुभेदार महाराष्ट्र लुटतोय – संजय राऊत
शिंदेंची बेकायदेशीर नेमणूक नरेंद्र मोदी, अमित शाहांनी केली आहे. मोदींनी नेमलेला सुभेदार महाराष्ट्र लुटतोय अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
-
महाराष्ट्राची गेल्या दशकभरात आर्थिक आघाडीवर घसरण
महाराष्ट्राची गेल्या दशकभरात आर्थिक आघाडीवर घसरण, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा निष्कर्ष.
‘गेल्या दशकभरात महाराष्ट्राचा सकल राष्ट्रीय उत्पादनातील वाटा स्थिर असला तरी घटला आहे’ असा निष्कर्ष संजीव संन्याल आणि आकांक्षा अरोरा यांच्या अभ्यासात काढण्यात आला आहे.
1960-62 ते 2023-24 या कालावधीतील राज्याच्या तुलनात्मक आर्थिक प्रगतीचा आढावा पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार परिषदेने घेतला आहे. त्यानुसार भारताच्या जीडीपीतील महाराष्ट्राचा वाटा 2 टक्क्यांनी गेल्या दशकभरात घटला आहे. पश्चिम बंगाल राज्याचीही घसरण झाली आहे. तर तुलनेने आंध्र प्रदेश , कर्नाटक राज्याची प्रगती झाल्याचे निष्कर्षात नमूद करण्यात आलं आहे.
-
महाराष्ट्राची आर्थिक आघाडीवर घसरण
महाराष्ट्राची गेल्या दशकभरात आर्थिक आघाडीवर घसरण झाली आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने हा निष्कर्ष काढला आहे. गेल्या दशकभरात महाराष्ट्राचा सकल राष्ट्रीय उत्पादनातील वाटा स्थिर असला तरी घटला आहे, संजीव संन्याल आणि आकांक्षा अरोरा यांच्या अभ्यासातून हा निष्कर्ष समोर आला आहे. १९६० -६२ ते २०२३-२४ या कालावधीतील राज्याच्या तुलनात्मक आर्थिक प्रगतीचा आढावा पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार परिषदेने घेतला आहे. त्यानुसार भारताच्या जीडीपीतील महाराष्ट्राचा वाटा २ टक्क्यांनी गेल्या दशकभरात घटला आहे. पश्चिम बंगाल राज्याचीही घसरण झाली आहे. तसेच तुलनेने आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्याची प्रगती झाली आहे.
-
कोल्हापुरात गुळाचे सौदे
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापुरात गुळाचे सौदे होत आहेत. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाचे सौदे होत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत गुळाला अधिकचा दर मिळण्याची आशा आहे. दिवाळीच्या मुहूर्तासाठी गुळ उत्पादक शेतकऱ्यांची बाजार समितीमध्ये गर्दी झाली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते मुहूर्ताचे गुळ सौदा सुरु करण्यात आला आहे. आचारसंहिता असल्याने मुहूर्ताच्या गुळ सौद्याला जिल्ह्यातील नेत्यांची अनुपस्थिती आहेत.
-
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात पुन्हा नव्या तारखा
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात पुन्हा नव्या तारखा आल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अपात्रता प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. 5 नोव्हेंबरला सुनावणीची तारीख आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत पुन्हा सुनावणीची तारीख देण्यात आली आहे. 6 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणीची तारीख आहे. दोन्ही दिवशी सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे.
Published On - Nov 02,2024 9:04 AM