Maharashtra Vidhan Sabha Election : मुंबईतील ‘हे’ नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात, कोणाला लागणार आमदारकीची लॉटरी?
विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले असून आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल लागेल. अनेक दिग्गजांचे भविष्य या निवडणुकीत पणाला लागलं आहे.
विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले असून आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल लागेल. अनेक दिग्गजांचे भविष्य या निवडणुकीत पणाला लागलं असून महायुती पुन्हा सत्तेवर येते का मविआला सत्ता स्थापनेची संधी मिळते याचे चित्र काही दिवसांतच स्पष्ट होईल. राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांसह, नव्या चेहऱ्यांनाही या निवडणुकीत संधी मिळाली आहे. दरम्यान या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात मुंबईत आठ नगरसेवकही त्यांचे नशीब आजमावणार असून आमदारकीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे अनेकांचे लक्ष लागलंय. 2017 च्या कार्यकाळातील 8 नगरसेवक तर त्याआधीच्या कार्यकाळातील 5 नगसेवकही यंदा विधासभा निवडणुकीच्या रणांगात उतरले आहेत.
या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार दिले असून अनेकांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्जही भरले आहेत. आज ( 29 ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान ही निवडणूक लढवणाऱ्यांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या 2017 च्या कार्यकाळातील आठ नगरसेवकांचाही समावेश आहे. एवढेच नव्हे तर आधीच्या कार्यकाळातील मिळून डझनभर माजी नगरसेवक या निवडणुकीत आपले नशीब आजमावणार आहेत.
कोण-कोण लढणार निवडणूक ?
यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्वाधिक माजी नगरसेवक आहेत. त्यामध्ये श्रद्धा जाधव (वडाळा), अनंत नर (जोगेश्वरी पूर्व), प्रविणा मोरजकर (कुर्ला), मनोज जामसुतकर (भायखळा), समीर देसाई (गोरेगाव), उदेश पाटेकर (मागाठाणे) यांच्या नावांचा समावेश आहे. तर ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी वर्सोवा येथून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या राखी जाधव या घाटकोपर पूर्व येथून निवडणूक लढवत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे वरळीतून, स्नेहल जाधव वडाळा मधून तसेच भाजपचे विनोद शेलार मालाड पश्चिम, काँग्रेसमधून आसिफ झकेरिया वांद्रे पश्चिम येथून निवडणूक लढवणार आहेत. तसेच शिवसेना शिंदे गटाचे मुरजी पटेल हे अंधेरी पूर्व मधून, सुवर्णा करंजे विक्रोळी येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
यंदा किती जणांच्या गळ्यात आमदारकीची माळ ?
गेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजेच 2019 साली चार नगरसेवक हे निवडणूक जिंकून आमदार बनले होते. त्यामध्ये यामिनी जाधव (भायखळा), दिलीप लांडे (चांदिवली), रमेश कोरगावकर (भांडूप), पराग शाह (घाटकोपर पूर्व) यांचा समावेश होता. यावेळी डझनभराहून अधिक नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, त्यामुळे सामना तुल्यबळ होईल हे निश्चितच. आता त्यांच्यापैकी किती जण निवडमूक जिंकतात, कोणाच्या गळ्याचा विजयाची माळ पडते आणि कोण आमदार बनतं हे 23 तारखेलाच स्पष्ट होील, त्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.