मोठी बातमी! हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवार मैदानात, ‘त्या’ नेत्याच्या भेटीनं इंदापूरचं समीकरण बदलणार?
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी आता खुद्द शरद पवार मैदानात उतरले असून, इंदापुरात घडामोडींना वेग आला आहे.
विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आता अवघा एक दिवस शिल्लक आहे. उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारखी आहे. मात्र अजूनही अनेक बंडखोर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यानं या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. बंडखोरी मोडून काढत बंडखोर उमेदवारांना आपला अर्ज मागे घ्यायला लावनं हे आता सर्वच पक्षांसमोर मोठं आव्हान असणार आहे.
दरम्यान इंदापूरमध्ये देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना बंडखोरीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील यांनी ऐन विधानसभा निविडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना शरद पवार यांच्याकडून इंदापूरमधून विधानसभेचं तिकीट देण्यात आलं. हर्षवर्धन पाटील यांच्याविरोधात दत्तात्रय भरणे यांचं तगडं आव्हान असणार आहे. भरणे यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून इंदापुरातून उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान दुसरीकडे ऐनवेळी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानं पक्षातील अनेक पदाधिकारी नाराज आहेत, या नाराजीचा फटका हा हर्षवर्धन पराटील यांना निवडणुकीत बसू शकतो, त्यामुळे आता शरद पवार हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी आज इंदापूरमध्ये जाऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते भरत शहा यांची भेट घेतली आहे.
भरत शहा हे पाटील यांना उमेदवारी भेटल्यानं नाराज आहेत. यावेळी शरद पवार यांच्यासोबत हर्षवर्धन पाटील देखील होते. यावेळी शरद पवार आणि शहा यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. मात्र चर्चा नेमकी काय झाली? शरद पवार यांना भरत शाह यांची नाराजी दूर करण्यात यश आलं का? याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाहीये. दुसरीकडे प्रवीण माने यांनी तर थेट अपक्ष उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. त्यामुळे सध्या हर्षवर्धन पाटील यांना स्वपक्षातील नेत्यांच्याच रोषाचा सामना करावा लागत आहे.