Maharashtra Assembly Election : मुंबई-विदर्भातील जागांवर पाणी सोडावं लागल्याने राहुल गांधी नाराज ? CEC मीटिंगमध्ये काय घडलं ?
महाविकास आघाडीतील जागावाटपाचा अंतिम फॉर्म्यूला अद्याप ठरलेला नाही. त्याचदरम्यान राजधानी दिल्लीत काँग्रेसची सीईसीची बैठक झाली. मात्र महाविकास आघाडी टिकवण्यासाठी काँग्रेसला काही जागांवर पाणी सोडावे लागल्याने राहुल गांधी नाराज असून ते मीटिंग मध्यातच सोडून बाहेर आल्याचे वृत्त आहे.
विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले असून राज्यात कोणाची सत्ता स्थापन होणार हे अवघ्या महिन्याभराच्या आतच स्पष्ट होईल. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राजधानी दिल्लीत काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) दुसरी बैठक पार पडली. या बैठकीत अनेक उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली. मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याचे समजते. विदर्भ, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला दिल्यामुळे राहुल गांधी नाराज आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी योग्यपद्धतीने वाटाघाटी केल्या नाहीत, अशा स्पष्ट शब्दांत राहुल गांधींनी बैठकीत मत व्यक्त केले. त्यानंतर राहुल गांधी हे बैठक मध्यातच सोडून बाहेर गेले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र त्यानंतरही सुमारे तासभर CEC मीटिंग सुरू होती.
मुंबई व विदर्भामधील काही जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आग्रहामुळे काँग्रेसला सोडून द्याव्या लागल्या आहेत. मविआ टिकवण्यासाठी काँग्रेसला काही जागांवर पाणी सोडावं लागल्याने राहुल गांधी नाराज आहेत. तसेच महाराष्ट्रातील काही उमेदवारांच्या नावांवर राहुल गांधी यांनी आक्षेप व्यक्त केला, ज्यांची नावे बड्या नेत्यांनी पुढे केली होती. या उमेदवारांच्या निवडीच्या निकषांवरही राहुल यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मोठ्या नेत्यांकडून जवळच्या व्यक्तींची नावं पुढे ?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र काँग्रेसमधील काही नेत्यांनी अनेक जागांवर उमेदवार म्हणून तिकीट मिळावे यासाठी आपले नातलग किंवा जवळच्या लोकांची नावं पुढे केली आहेत. अनेक नेते तर असेही आहेत ज्यांनी कुटुंबातील सदस्यांसाठीच तिकीट मागितलं. मात्र त्यावर राहुल गांधी यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
लवकरच आम्ही उमेदवारांच्या नावांची दुसरी आणि तिसरी लिस्ट जाहीर करू. महाराष्ट्र आमची उत्तम कामगिरी लवकरच दिसेल. राज्यात बहुमताने महाविकास आघाडीचंच सरकार येईल, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठठ नेते नाना पटोले यांनी व्यक्त केला. आम्ही काही जागांची मागणी करत आहोत. आम्हाला ज्या जागा (आत्तापर्यंत) मिळाल्या आहेत, तेथे आम्ही ओबीसींना ( उमेदवार) न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत, असेही ते म्हणाले.
मोदी-शहांच्या जेवढ्या सभा होतील, त्याचा आम्हालाच फायदा
या निवडणुकीत काँग्रेस लोकसभेपेक्षा चांगली कामगिरी करेल, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. बैठकीत आम्ही राहुल गांधींना जागावाटपाची संपूर्ण माहिती दिली. मोदी आणि शहा जेवढ्या सभा घेतील, तेवढा फायदा आम्हाला होईल, असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडीत सर्व काही ठीक आहे. आम्ही एकत्र निवडणूक लढवू. महाविकास आघाडीत कोणतीच अडचण नाही, ती तर महायुतीत आहे. आम्ही सगळे एकत्र आहोत. ही निवडणूक आम्ही एकदिलाने लढवू आणि महाराष्ट्रात सरकार स्थापन करू, असे काँग्रेसचे निवडणूक प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी नमूद केलं.