…म्हणून राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता, जवळच्या नेत्याने केला खुलासा
उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत.
Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांकडून उमेदवारांची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे उमेदवारी जाहीर झालेले अनेक दिग्गज आज अर्ज भरणार आहेत. यामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता ठाकरे कुटुंबातील दोन सदस्य निवडणुकांच्या रिंगणात उतरले आहे. उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत. त्यामुळे सध्या वरळी आणि माहीम या दोन्हीही मतदारसंघांकडे दिग्गजांचे लक्ष लागले आहे.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी नुकतंच ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीवर भाष्य केले. तसेच आदित्य ठाकरे पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहिलेले असताना राज ठाकरेंची प्रतिक्रिया काय होती, याबद्दल त्यांनी गौप्यस्फोटही केला आहे. यावेळी त्यांनी अमित ठाकरेंविरोधात उद्धव ठाकरेंनी दिलेल्या उमेदवारीबद्दलही भाष्य केले.
राज ठाकरेंना सर्वाधिक आनंद
“बाळासाहेबांची ही तरुण मुलं राजकारणात उतरत आहेत, याचा मला फारच आनंद आहे. आदित्य जेव्हा राजकारणात येत होता, तेव्हा सर्वात जास्त आनंद हा राज ठाकरेंना झाला होता. राज ठाकरेंनी त्यावेळी निर्णय घेतला होता की माझ्या कुटुंबातील माणूस जर राजकारणात येत असेल तर त्याला माझा पाठिंबा असेल. त्यामुळेच राज ठाकरेंनी तिथे उमेदवार दिला नव्हता. राज ठाकरे हा नावाने राज नाही तर मनाने देखील राजा आहे. म्हणूनच राज ठाकरे यांनी आदित्यच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता”, असेही बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
“उमेदवाराला शुभेच्छा देणं चुकीचं नाही”
“पण दादर माहीम मतदारसंघांबद्दल काय करायचं हा सर्वस्वी मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांचा निर्णय आहे. त्यात आम्ही काहीही बोलणार नाही. आदित्य ठाकरे यांना आजदेखील माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांच्या विरोधात संदीप देशपांडे आहेत, त्यांचा अर्ज भरायला मी जाणार आहे. कोणत्याही उमेदवाराला शुभेच्छा देणं चुकीचं नाही. राजकारण ही एक संस्कृती आहे. टीका ही सभागृहात होत असते, त्याबाहेर संस्कृती जपायला पाहिजे”, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले.
मनसेकडून 65 उमेदवारांच्या नावांची घोषणा
मनसे नेते राज ठाकरे हे सध्या अॅक्शन मोडमध्ये आहेत. राज ठाकरेंनी यंदाची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार मनसेकडून महाराष्ट्रात ठिकठिकाणी उमेदवार घोषित केले जात आहेत. मनसेकडून पहिल्यांदा 7 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर मनसेकडून 45 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. यानंतर काल मनसेनं 13 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यानुसार आतापर्यंत मनसेकडून 65 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.