महाराष्ट्रात निवडणुकांची रणधुमाळी सुरु, 288 मतदारसंघांसाठी ‘इतके’ उमेदवार रिंगणात
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या धामधुम सुरु झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. यंदा महायुती विरुद्ध महाविकासआघाडीमध्ये अशी लढत पाहायला मिळणार आहे.
Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकांचा अर्ज दाखल करण्यासाठी काल शेवटचा दिवस होता. त्यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची आणि पक्षांची चांगलीच धांदल उडाली. राज्यातील 288 मतदारसंघांसाठी एकूण 7 हजार 995 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
7 हजार 995 उमेदवार रिंगणात
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. राज्यात अखेरच्या एका दिवसात 4 हजार 996 उमेदवारांचे एकूण 6 हजार 484 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे आता राज्यातील 288 मतदारसंघांत एकूण 7 हजार 995 उमेदवारांचे 10 हजार 905 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र विधानसभेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिली.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता 15 ऑक्टोबर 2024 पासून लागू झाली आहे. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 22 ऑक्टोबर 2024 रोजी जारी करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवार 29 ऑक्टोबर 2024 ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. यानंतर आज 30 ऑक्टोबर 2024 रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. यानंतर 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. यानंतर 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होईल आणि 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होईल.
रत्नागिरीत कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज?
रत्नागिरी जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत 63 उमेदवारांकडून 84 अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 31 उमेदवारांनी 36 अर्ज दाखल केले आहेत. रत्नागिरी विधानसभेत 21 उमेदवारांनी 37 अर्ज दाखल केले आहेत. तर राजापूर मतदारसंघात 12 उमेदवारांन 17 अर्ज दाखल केले आहेत. तसेच दापोली मतदारसंघात 13 उमेदवारांचे 14 अर्ज दाखल झाले आहेत. त्यापाठोपाठ गुहागरमध्ये 13 उमेदवारांचे 15 अर्ज दाखल झाले आहेत. तर चिपळूण मतदारसंघात 13 उमेदवारांचे 21 अर्ज दाखल झाले आहेत. राजापूर आणि रत्नागिरीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी पाहायला मिळत आहे. बंडखोरी केलेल्या उमेदवारांची समजूत घालण्यात पक्षांना यश येणार की बंडखोर रिंगणातच राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.