पंकजा मुंडे उमेदवार नसतानाही अचानक रात्री अजितदादांच्या भेटीला, देवगिरी बंगल्यावर नेमकं काय घडलं?
महाराष्ट्रातील येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पंकजा मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बीड जिल्ह्यातील जागा वाटपावर चर्चा केली.
Pankaja Munde Meet Ajit Pawar : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सध्या सर्वच राजकीय पक्ष हे जोमाने कामाला लागले आहेत. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील २८८ मतदारासंघात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर केले जाणार आहेत. निवडणुकांचे बिगुल वाजताच आता विविध पक्षांकडून उमेदवारांच्या यादी जाहीर केल्या जात आहेत. तर दुसरीकडे सध्या पक्षांतर्गत बैठका सुरु आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. यावेळी बीड जिल्ह्यातील विधानसभा जागांवर चर्चा करण्यात आली.
धनजय मुंडे देखील उपस्थित
भाजपचा बालेकिल्ला अशी बीड जिल्ह्याची ओळख आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरी बंगल्यावर भेट घेतली. पंकजा मुंडे आणि अजित पवार यांची काल रात्री उशिरा ११.३० च्या दरम्यान भेट झाली. या भेटीवेळी दोन्ही नेत्यांमध्ये बीड जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांवर चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीला धनजय मुंडे देखील उपस्थित होते.
राष्ट्रवादीकडून जोरदार मोर्चेबांधणी
बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे सध्या बीडमधील वातावरण काय, परळी मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न काय याबद्दलही या बैठकीत चर्चा झाली. यावेळी धनंजय मुंडे यांच्याबद्दलही चर्चा करण्यात आली. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या वर्चस्वाला शह देऊन बीड जिल्ह्यात महायुतीच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील, याबद्दलही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.
राजेंद्र म्हस्केंचा राजीनामा
दरम्यान बीड जिल्ह्याला सध्या उतरती कळा लागली आहे. राजेंद्र म्हस्के यांनी काल बीड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय जाहीर केला. “गेल्या ६ वर्षांपासून मी भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतोय. बीड विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळेल, याच अनुषंगाने माझे काम सुरु आहे. मी पक्षाच्या अनुषंगाने मी आज एक बैठक घेतली. त्या बैठकीत मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. यापुढे मी पक्षाचे कोणतेही काम करणार नाही”, असे राजेंद्र म्हस्केंनी म्हटले.