बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. 2019 च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील दोन प्रमुख राजकीय पक्षात मोठी फुट पडली होती, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे महाराष्ट्रासोबतच देशाचं लक्ष देखील या निवडणुकीकडे लागलं आहे. निकालाबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. येत्या 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान त्यापूर्वी एक्झिट पोल समोर आले आहेत, मात्र एक्झिट पोलनुसार कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आता राज्यात कोणाचं सरकार येणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शनिवारी विधानसभेचा निकाल आहे, मात्र त्यापूर्वीच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडून राज्यात आमचंच सरकार येणार असल्याचा दावा केला जात आहे. २३ तारखेचा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूनं असेल. आम्ही १६५ ते १७० जागा जिंकत आहोत, असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, या सरकार विरोधात मोठा आक्रोश होता. त्यामुळे लोकांना बदल हवा होता. असंवैधानिक सरकार होतं, तोडफोड केली होती. जातीचं वीष पेरलं होतं.
फडणवीस आणि शिंदे यांना यावेळी लोकं नाकारतील. एक नंबरचा महाराष्ट्र ११ व्या नंबरला नेला. आम्ही ग्राउंडवर काम करतो. त्यामुळे आम्ही एक्झिट पोल नाही तर 23 तारखेला एक्झॅक्ट पोल पाहू.
दरम्यान यावेळी बोलताना ते म्हणाले की महाविकास आघाडी म्हणून विचार केला पाहिजे. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा अद्याप निर्णय झालेला नाही. काँग्रेसला मुख्यमंत्रिपद गेलं तर राहुल गांधी आणि खर्गे त्याबाबत निर्णय घेतील. शरद पवार गटाकडे गेलं तर त्याबाबत शरद पवार हे निर्णय घेतील, ठाकरे गटाकडे गेलं तर त्याचा निर्णय उद्धव ठाकरे हे घेतील. ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं काहीही ठरलेलं नाहीये.
आम्ही अपक्षांच्या संपर्कात आहोत २३ तारखेला रात्री आणि २४ तारखेला आमदारांना मुंबईत पोहोचायला सांगीतलं आहे, २४ ला सकाळी रिपोर्टिगं करण्याच्या आमदारांना सूचना दिल्या आहेत. उद्या महाविका आघाडीच्या बैठकीत चर्चा करु असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.