मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची विरोधी पक्षनेते म्हणून घोषणा केली. त्यानंतर सभागृहात सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी विजय वडेट्टीवार यांचं कौतुक केलं. विजय वडेट्टीवार यांची राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड होणार अशी मागच्या काही दिवसांपासून चर्चा होती. अखेर आज त्यांच्या नावाची घोषणा झाली.
विजय वडेट्टीवर यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं दिलखुलासपणे कौतुक केलं. “विजय वडेट्टीवार विदर्भातील नेते आहेत. विदर्भाच्या पाण्यााच वेगळा गुण आहे. विजयभाऊवर तसा थोडा अन्याय झाला. अधिवेशनाच्या सुरुवातीला त्यांना विरोधी पक्षनेतेपदी बसवायला पाहिजे होतं. पण विजयभाऊ कसर भरुन काढतील असे लढवय्ये नेते आहेत” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
विरोधी पक्षाने सभागृहात बोलणं काळाजी गरज
“सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकाच रथाची दोन चाकं असतात. राज्याच्या विकासासाठी समान वेगाने धावायचा प्रयत्न करतात. विरोधी पक्षनेता सक्षम लोकशाहीसाठी आवश्यक आहे. एखादी गोष्टी चुकीची झाली, पटली नाही, सरकार कमी पडलं, तर विरोधी पक्षाने जनतेच्या हितासाठी सभागृहात बोलणं काळाजी गरज आहे” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
बेधडक, झोकून देऊन काम करणारे नेते
“सरकारच्या चांगल्या कामाची दखल घेणं, हे चांगल्या विरोधी पक्षाच लक्षण असतं. विजय वडेट्टीवर पदाला न्याय देतील अशी अपेक्षा आहे” असं एकनाथ शिंदे कौतुक करताना म्हणाले. “विजय वडेट्टीवार मूळचे शिवसैनिक आहेत. आक्रमक, बेधडक, झोकून देऊन काम करणारे नेते आहेत” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
बाळासाहेबांच तत्व विजय वडेट्टीवार यांनी कायम ठेवलं
“गडचिरोली, चंद्रपूर जिल्हयात नगरपरिषद, पंचायत समिती निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली यश मिळालं. विदर्भात शिवसेना वाढवण्याच काम त्यांनी केलं. बाळासाहेबांचा मूलमंत्र होता, 80 टक्के समाजकारण, 20 टक्के राजकारण हे तत्व विजयभाऊंनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेल्यानंतरही कायम ठेवलं” असं शिंदे म्हणाले.
‘सहवास लाभला, पण बाळासाहेबांच्या विचारांचे संस्कार नाहीत’
“शेवटी बाळासाहेबांचा विचार मनात रुजला, कार्यकर्ता प्रभावित झाल्यानंतर तो जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेला तरी, तो विचार पुढे नेते असतो. परंतु काही लोकांना बाळासाहेबांचा सहवास लाभला, तरी त्यांच्यावर बाळासाहेबांच्या विचारांचे संस्कार दिसत नाहीत. ही वस्तिुतिथती आहे” असं शिंदे म्हणाले.