वंचितमधून बाहेर पडून प्रकाश आंबेडकरांना आव्हान, लक्ष्मण मानेंकडून नव्या पक्षाची घोषणा
विधानसभेच्या तोंडावर मानेंनी (Laxman Mane) नव्या पक्षाची स्थापना करून भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची गोची केली आहे. 29 तारखेला पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात आघाडीचा पहिला निर्धार मेळावा पार पडणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
पुणे : प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडलेल्या लक्ष्मण मानेंनी (Laxman Mane) नव्या पक्षाची घोषणा केली. महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी (Maharashtra bahujan vanchit aghadi) या नवीन पक्षाची घोषणा त्यांनी केली. विधानसभेच्या तोंडावर मानेंनी (Laxman Mane) नव्या पक्षाची स्थापना करून भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची गोची केली आहे. 29 तारखेला पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात आघाडीचा पहिला निर्धार मेळावा पार पडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. माजी न्यायमूर्ती पीबी सावंत यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन होईल.
पुण्यात पत्रकार परिषदेत लक्ष्मण मानेंनी नव्या पक्षाची घोषणा केली. यावेळी माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांच्यासह काही कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि डाव्या विचारांशी चर्चा करणार आहोत. विधानसभेला डाव्या आघाडी बरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचं लक्ष्मण मानेंनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीतील चूक आता करायची नाही. भाजपचा पराभव करण्याऐवजी त्यांच्याच 12-12 जागा निवडून आल्या. त्यामुळे मला अपराधीपणा वाटत होता. जातीयवादी आणि धार्मिक संघटना बरोबर आम्ही जाणार नाही. भाजप युतीला हरविण्याचा आमचा प्रयत्न आहे. मातंग, धनगर, रिपब्लिकन ओबीसी संघटनांबरोबर आमची चर्चा सुरु असल्याचं माने यांनी सांगितलं.
किरकोळ स्वार्थसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार विक्रीला काढणार नाही. बाबासाहेबांचे आम्ही सारेच वारसदार असल्याचं माने यांनी म्हटलंय.
मुस्लीम बांधवांना जय श्री राम म्हणून मारहाण केली जाते ही आराजकता आहे. उद्या तुमचीही घरं पेटल्याशिवाय राहणार नाही, उद्या ही वेळ तुमच्यावर येऊ शकते, असा इशारा मानेंनी दिलाय.
अब्दुल रहमान अंजरिया यांच्या अब्रूनुकसानीच्या दाव्यावर बोलताना, मानेंनी वकिलांशी बोलून नोटीसला उत्तर देणार असल्याचं म्हटलंय. माझं विधान राजकीय असून त्यांचा आणि माझा वैयक्तिक वाद नाही. ते काळे की गोरे हेही मला माहीत नाही. राजकीय आरोप होतात, मी वैयक्तिक टीका, चारित्र्यहनन केलं नाही. त्यांच्या फोटोवरुन मी विधान केलंय, वकिलांशी बोलून नोटीसला उत्तर देईल, असं मानेंनी म्हटलंय.
प्रकाश आंबेडकरांच्या काँग्रेससोबत जाण्याच्या भूमिकेवरही लक्ष्मण मानेंनी भाष्य केलं. हा बाळासाहेबांचा डावपेचाचा भाग आहे. शेवटी अशी मागणी करायची आणि काँग्रेस मागणी पूर्ण करणार नाही आणि बोलण्यात तोडून टाकायची, हा विचारसरणीचा नाहीतर डावपेचाचा भाग आहे, असं माने यांनी म्हटलंय.
वंचित आघाडी भाजपाची बी टीम असल्याचं त्यांच्या वर्तनाने सिद्ध केलंय. लोकसभेत आमची एकही जागा निवडून आली नाही, याउलट काँग्रेसलाही फायदा झाला नाही. फायदा हा भाजपचा झालाय. त्यामुळे लोक बी टीम म्हणाले तर राग यायचं कारण नाही. आकडे सांगतात की तुम्ही तिकडे मदत केली, असंही माने म्हणाले.