महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांचे वारे? भाजपचं आज राज्यस्तरीय अधिवेशन, रणनिती ठरणार
आज शिर्डीत भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडणार आहे. या राज्यस्तरीय अधिवेशनाला भाजपचे सर्व मंत्री, आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनादरम्यान आगामी निवडणुकांची रणनिती ठरणार असल्याचे बोललं जात आहे.
BJP Shirdi Convention : राज्यातील लोकसभा, विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काही महिन्यात महाराष्ट्रात महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपरिषद या निवडणुका पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. त्यातच आज शिर्डीत भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडणार आहे. या राज्यस्तरीय अधिवेशनाला भाजपचे सर्व मंत्री, आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनादरम्यान आगामी निवडणुकांची रणनिती ठरणार असल्याचे बोललं जात आहे.
आज रविवारी १२ जानेवारी रोजी भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डीत आयोजित करण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह , पक्षाध्यक्ष जे.पी नड्डा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्यासपीठावर संविधान पूजन करण्यात येणार आहे. या अधिवेशनानिमित्त शिर्डीत १ हजार व्हीआयपी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिर्डीतील मुख्य रस्त्यावर स्वागताचे शेकडो फलक, ५० कमानी, २५०० भाजपचे झेंडे लावण्यात आले आहेत. यावेळी भाजपच्या १५ हजार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहेत.
केन्द्रीय गृह एवं सहकारिता मंत्री श्री @AmitShah के 12 जनवरी, 2025 को महाराष्ट्र में कार्यक्रम।
लाइव देखें: 📺https://t.co/OaPd6HRrq3 📺https://t.co/vpP0MIos7C 📺https://t.co/lcXkSnOnsV 📺https://t.co/4XQ2GzrhRl pic.twitter.com/h4bZcNxdva
— BJP (@BJP4India) January 11, 2025
मंत्री, आमदार, खासदार उपस्थित राहणार
भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशनाला भाजप पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांसह सर्व निमंत्रितांसह बैठकीला हजर असणार आहेत. भाजपचे अधिवेशन आणि आज रविवारची सुट्टी यामुळे शिर्डीत साईदर्शनासाठी भाजप पदाधिकाऱ्यांसह भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. भाजपच्या अधिवेशनास उपस्थित असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची देखील साई दर्शनासाठी गर्दी दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे वरिष्ठ नेते यावेळी अधिवेशनात मार्गदर्शन करणार आहेत.
काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष
काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, आमदार राम कदम, रविंद्र चव्हाण यांसह अनेकांनी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही महिन्यात पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या अधिवेशनात नेते काय मार्गदर्शन करणार याकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.