मुंबई, दि. 11 जानेवारी 2024 | शिवसेना पक्ष कोणाचा आणि आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले तर उद्धव ठाकरे गटाकडून विरोध करण्यात आला. आता उद्धव ठाकरे गटाने निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस सुरु आहे. संक्रात जवळ येत असल्याने पंतगांची आणि मांज्याची मागणी वाढली आहे. परंतु बंदी असलेला नायलॅान मांजा फेसबुकवर ॲानलाईन पद्धतीने विक्री होत आहे. ही विक्री थांबवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
मुंबई : अटल सेतू या सागरी सेतूचे उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्घाटनपूर्व शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूची पाहणी केली.
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्वच्छ भारत पुरस्काराचे वितरण आज नवी दिल्ली येथे करण्यात आले. 2 मराठी सख्खे भाऊ या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. त्यातील 1 भाऊ आमदार तर दुसरा भाऊ IDES अधिकारी आहे. पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या मतदारसंघातील सासवड नगरपालिकेला पुरस्कार मिळाला आहे. तर, मध्यप्रदेशमधील महूला कंटेनमेंट बोर्डाला स्वच्छता पुरस्कार मिळाला आहे. या कंटेनमेंट बोर्डाचे IDES अधिकारी हे राजेंद्र जगताप आहेत. ते आमदार संजय जगताप यांचे सख्खे भाऊ आहेत.
मुंबई : कारसेवकांच्या बलिदानातून राम मंदिर उभे राहत आहे. अयोध्येतील आंदोलनावेळी उद्धव ठाकरे यांचे चेलेचपाटे कुठे होते? अयोध्येमध्ये झालेल्या आंदोलनाचा उद्धव ठाकरे यांचा काहीही संबंध नाही. उद्धव ठाकरे यांचे भाषण फक्त हिंदुत्व बोलण्यापुरते असते अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तर, बाळासाहेब ठाकरे हे खरोखर वाघ होते असेही ते म्हणाले.
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यात एकत्रित निदर्शन करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कांद्याच्या निर्यात बंदीविरोधात राज्यातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यांच्या नाशिक दौऱ्यादरम्यान कांदा निर्यात बंदी उठवावी यासाठी शेतकरी संघटना विरोध करणार होत्या. त्या पार्श्वभूमीवर जिल्हातील शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.
पुणे : विधानसभा अध्यक्ष यांनी दिलेल्या निकालावर काय प्रतिक्रिया द्यायची? सरकार तर सुरूच आहे. तुम्ही जसा तो निर्णय ऐकला तसाच मी ही ऐकला आहे. जे न्यायाधीश असतात त्यांना अधिकार असतात त्यांनी दिलेला निर्णय हा योग्यच समजतो. बाकीच्यांनी काय प्रतिक्रिया दिली त्याच्याशी मला देणं घेणं नाही. शिंदे यांचे अभिनंदन कधी करायचं हे माझं मी ठरवेल अशी रोखठोक प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
मुंबई : कालचा निकाल हा लोकशाहीला मारून टाकणारा आहे. ही लढाई आमची नाही आता लोकशाही वाचवण्यासाठीची झाली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान भाजपला मान्य नाही. अध्यक्ष यांनी कायदा दिल्लीवरून लिहून घेतला. राष्टवादीबद्दलही असचं होणार आहे. हा निकाल म्हणजे सुप्रीम कोर्टाचा अपमान आहे. आमच्यावर हक्कभंग आणला काय किंवा फासावर लटकावलं तरी चालेल पण लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी आम्ही लढत राहणार असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.
मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही इदगाह मशीद वादावर उच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. गुरुवारी अलाहाबाद उच्च न्यायालयात सुमारे तासभर या प्रकरणाची सुनावणी झाली. वादग्रस्त जागेचे सर्व्हेक्षण अधिवक्ता आयुक्तांकडून करून घेण्याबाबत सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान मुस्लीम पक्षाने न्यायालयाच्या आयुक्तांच्या नियुक्तीला विरोध केला.
लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय रोखण्यासाठी इंडिया आघाडीतील सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. जागावाटपाबाबत सर्वच पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. दरम्यान, बिहारमधील जागावाटपावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, सर्व काही ठीक आहे, सर्व काही वेळेवर होईल.
बिजनौर जिल्ह्यातील धामपूर परिसरात भरधाव वेगात असलेल्या कार ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडकल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री उशिरा धामापूर-स्योहारा मार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडक बसली. या अपघातात कारस्वार उज्ज्वल (28), मिथुन (27) आणि चंद्रदीप (28) हे गंभीर जखमी झाले.
काँग्रेस नेते सचिन पायलट म्हणाले, राहुल गांधींचा प्रवास 14 जानेवारीला मणिपूरपासून सुरू होणार असून या न्याय यात्रेत आम्ही लोकांना न्याय मिळायला हवा, हा मुद्दा मांडणार आहोत. या प्रवासाचा फायदा आमच्या पक्षाला आणि जनतेला होणार आहे. इंडिया आघाडी आणि काँग्रेसला चांगले पर्याय मानतात.
सोलापूर | ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वरांच्या यात्रेच्या धार्मिक कार्यास रुढी परंपरेप्रमाणे 11 जानेवारी अर्थात आजपासून सुरुवात होते. सिध्दरामेश्वरांच्या हातातील योगदंड यात्रेचे मुख्य मानकरी हिरेहब्बू यांच्या वाड्यातून शेटे वाड्यात घेऊन जातात. त्याठिकाणी मानकरी हिरेहब्बू आल्यानंतर त्या योगदंडाची विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर होमहवन आणि पाद्यपूजा करतात. हे विधी झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होतो आणि तेव्हापासून यात्रेच्या धार्मिक विधींना सुरुवात होते.
बारामती | सरकारी नोकरी मिळवण्याच्या मागे आज मोठ्या संख्येने तरुण पिढी प्रयत्न करत आहे. पण सरकारी नोकरीच्या मागे न लागता खासगी नोकऱ्या आणि उद्योजकता याकडे देखील करिअर संधी म्हणून मुलांनी पहिलं पाहिजे, असं आमदार सत्यजीत तांबे म्हणाले.
महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र, शारदाबाई पवार महिला आर्टस्, कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेज, शारदानगर, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ‘करिअर कट्टा’ या उपक्रमांतर्गत करिअर संसद राज्यस्तरीय दोन दिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. बारामती येथील शारदानगरमध्ये करिअर संसद अधिवेशन पार पडले. यावेळी ते बोलत होते.
आमच्या सर्व्हेत जवळपास ४६ जागा या महाविकास आघाडीच्या बाजूने आहे असल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. कुणाला जास्त, कुणाला कमी, असा महायुती सारखा गोंधळ आमच्यात नाही.भाजपा निवडणुकीला घाबरत आहे.महाविकास आघाडीत सर्व काही सामंजस्याने होईल, असे ते म्हणाले.
सुप्रीम कोर्टाने यापूर्वी प्रतोत कोण हे जाहीर केलं असताना, गोगावले यांची नेमणूक ग्राह्य मानून विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिलेला आहे.त्याच्यावर पुन्हा सुप्रीम कोर्टात चर्चा होईल. मेरिटनुसार उद्धव ठाकरें यांच्याकडे पक्ष असायला हवा, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
मणिपूर ते मुंबई अशी ६६ दिवसांची यात्रा असेल आणि ती महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यातून जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.या न्याय यात्रेला जास्त प्रतिसाद मिळेल, या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. भाजपप्रणित सरकार ‘फोडा आणि राज्य करा’, ही नीती राबवत आहे. याविरोधात ‘भारत जोडो’ यात्रेतून ‘डरो मत’ असा संदेश देण्यात आला आहे. बेरोजगारी, शेतकरी, महागाई, आर्थिक विषमता, नागरिकांमधील भीती, असे अनेक मुद्दे आहेत. लोकशाही संपवण्याचे काम भाजपा करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
नायलॉन मांजाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने नागपूरमध्ये जनजागृती रॅली काढली. परिसरातील पतंग मार्केट मध्ये पतंग दुकानात जाऊन नायलॉन मांजा न विकण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी चक्री जाळून विरोध करण्यात आला. नायलॉन मांजा विक्री होत असल्याची माहिती देणाऱ्यांना पाच हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे.
गोंदियात अंगणवाडी सेविकांनी कटोरा घेऊन भीक मांगो आंदोलन केले. गोंदियातील जयस्तंभ चौक आंबेडकर चौक दरम्यान भिक मांगो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविकांचा सहभाग होता. लोकांनी भिक दिलेला पैसे सरकारला देण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
आज मनोज जरांगे पाटील यांची विनोद पाटील यांनी भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत शुभेच्छा दिल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी सर्व समाज एकत्र केला आहे आणि मराठा समाजाला हक्काचे आरक्षण पाहिजे या साठी आम्ही चार ते पाच वेळेस सरकारला वेळ दिला आणि आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुंबईला जाणार आहोत.आता सरकारने ठरवायचे आहे, आम्ही मुंबईला यायचे की नाही, असे ते म्हणाले.
कायदेशीर लढाई तर नक्की होईल. आमदार अपात्र प्रकरण सुप्रीम कोर्टात ५ महिने चालल त्यात त्यांनी क्लिअर चौकट घालून दिली होती. कालचा निकाल बघता ती चौकट पायदळी तुडवला अस दिसत आहे. कोर्टाने गोगावले यांची निवड बेकायदेशीर आहे अस सांगितल होतं. काल निवडणूक आयोगाच जजमेंट वाचून दाखवलं आहे. 2019 च्या निवडणुकीत आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सहिने पाठिंबा दिला होता पण त्यावर आम्हाला नोटीस दिली नव्हती. कोर्ट आम्हाला योग्य न्याय देईल, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.
10 जानेवारीला घेण्यात आलेल्या सारथी, बार्टी आणि महाज्योतीच्या परीक्षेतील गोंधळाची पुणे विद्यापीठाकडून दखल घेतली गेली आहे. या परीक्षेचे पेपर तपासले जाणार नाहीत. पेपर तपासणीला दिली स्थगिती दिली आहे. मात्र परीक्षेचा पेपर फुटला नाही विद्यापीठाने स्पष्टीकरण दिलं आहे. वेगवेगळ्या छपाई यंत्रणांकडून छपाई करुन घेतल्याने प्रकार घडला आहे.
डीएड आणि बीएडचे विद्यार्था आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांनी भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांची शिक्षण आयुक्त कार्यालयात गाडी अडवली आहे. शिक्षक भरतीत इंग्रजी माध्यमांचं स्वतंत्र आरक्षण रद्द करा अशी मागणी या विद्यार्थ्यंनी केली आहे.
मेरिट प्रमाणे निकाल लागावा, लोकशाही मध्ये बहुमताच्या महत्त्व असते आमच्याकडे कडे विधानसभेत लोकसभेत बहुमत आहेत. भरत गोगावले हे मुख्य व्हीप, शिवसेना आमची आणि आमच्या विचारांची, यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. जो विश्वास दीड वर्षा पासून माझ्यावर दाखवला त्यासाठी मी धन्यवाद देतो, घराणेशाही हरल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.
काल पासुन जल्लोष सुरू आहे. एक आनंद झालं आहे, अखेर सत्याचा विजय झाला. सत्यमेव जयते हे काल या निर्णयाने दाखवून दिले. बाळासाहेब दिघे साहेब यांच्या विचारांचा विजय झालं हे दाखवून दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे विभागाची जिल्हा नियोजन बैठकीला सुरवात झाली आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्याची नियोजन बैठक सुरू आहे. विभागीय आयुक्त कार्यलयात ही बैठक सुरू आहे. साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराजे देसाई जिल्हा नियोजन बैठकीला पोहचले आहेत. छत्रपती उदयनराजे भोसले देखील या बैठकीला पोहोचले आहेत.
पुणे : जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा वाद अजितदादांनी मिटवला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या प्रत्येक सदस्याला 1 कोटी विकास निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या कामाची यादी स्वीकारत असल्याचं अजितदादांकडून स्पष्ट. शिवाय निधी वाटपात राज्यात जे सूत्र लागू केले आहे तेच सूत्र पुण्यासाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. कालच्या जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाइन बैठकीत निधीचा वाद संपुष्टात आला. जिल्हा नियोजन समितीच्या वाटपावरून अजितदादा आणि भाजप यांच्यात झाला होता वाद.
नवी दिल्ली : नवी दिल्ली आणि दिल्ली एनसीआर मध्ये जाणवले भूकंपाचे धक्के. 4.1 रिष्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता. अद्याप कुठेही जीवितहानी नाही.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीला टिळक भवन येथे सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत ही बैठक होत आहे. बैठकीला अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, भाई जगताप, वर्षा गायकवाड, सतेज पाटील, प्रणिती शिंदे हे देखील उपस्थित होते.
लातुरच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांच्या समोर एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्या. मराठा कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या समोर घोषणाबाजी केली. देवेंद्र फडणवीस रॅम्प वरून चालत येत असताना ही घोषणाबाजी करण्यात आली.
डॉक्टरसह ड्रग्ज तस्कराला अटक. मालवणी पोलिसांनी 1 कोटी 17 लाख 60 हजार रुपयांचे एमडी ड्रग्ज आणि केमिकल जप्त केले. मुंबईतील मालवणी पोलिसांनी ड्रग्जच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
मराठा आरक्षण व अजित पवार, जरांगे यांचा संघर्षच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचा सावध पवित्रा. धाराशिव व परभणी हा दौरा रद्द
गुजरातमधल्या बडगर समाजाने बनवला नगाडा. राम मंदिरात आरतीसाठी वाजला जाणार नगाडा. याला सोन्याची चकाकी देण्यात आली आहे. अयोध्येत काल गुजरातमधून नगाडा दाखल झाला आहे.
शरद मोहोळ खून प्रकरणात मोठे अपडेट पुढे आले आहे. गोळीबार करण्यापूर्वी आरोपींनी मुळशीत तीन वेळा केला होता गोळीबाराचा सराव. आरोपींच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड. धनंजय मारुती वटकर आणि सतीश संजय शेड या दोघांनी आरोपींना पुरवल्या होत्या पिस्टल. दोन्ही आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या नियोजनासाठी स्वतः मुख्यमंत्री नाशिकमध्ये दुसऱ्यांदा पाहणी करणार आहेत. उद्या नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आणि रोड शो काळाराम मंदिर दर्शन आणि गोदा पूजन असे भरगच्च कार्यक्रम आहेत.
अयोध्येच्या राम मंदिरात तब्बल २४०० किलोची घंटा बसविण्यात येणार आहे. आग्रा येथील जलसेरा या शहरामधून ही घंटा मागवण्यात आली आहे. या घंटेचा आवाज हा जवळपास ३ कि.मी. पर्यंत ऐकू येणार असं सांगितलं जात आहे. ही घंटा अयोध्येतल्या कारसेवकपुराम या ठिकाणी ठेवण्यात आली आहे
आमदार अपात्रतेचा हा निकाल कोणाच्या तरी सांगण्यावरून तयार करण्यात आला आहे. दोन-तीन वेळेस स्पीकर दिल्लीला गेले होते. तीन दिवसापूर्वी स्पीकर मुख्यमंत्र्याला जाऊन भेटतात चर्चा करतात म्हणून हा निर्णय आम्हाला अमान्य आहे अशी प्रतिक्रीया उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे.
केंद्र सरकारच्या नवीन मोटार कायदा विरोधात अमरावतीमध्ये अमरावती जिल्हा वाहन चालक संघटना आक्रमक झाली असून चालकांनी मुंडन आंदोलन सुरु केले आहे. केंद्र सरकारने नवीन मोटार कायदा मागे घेण्यासाठी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु आहे.
काही लोकांना फस्ट्रेशन आले आहे. काही लोकांना वेड लागले आहे. प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर न दिलेल बरं, अशी प्रतिक्रिया खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. कालचा निकाल लोकशाहीच्या बाजूने लागला. पार्टी ही काही कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नव्हे, असेही ते म्हणाले.
निकाला विरोधात गेल्यामुळे त्यांना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यत शिंदे साहेबच दिसतात, अशी टीकाही त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांवर केली. शिंदे साहेब ज्या पद्धतीने काम करतात, त्यामुळे प्रेरित होऊन कार्यकर्ते प्रवेश करतात हे उबाठाचे अपयश असल्याचेही ते म्हणाले.
शंभुराज देसाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला वर्षा निवस्थानी दाखल झाले आहेत. या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे ठाणे येथील आनंद आश्रम येथे शिवसैनिकांच्या जल्लोषात सहभागी होतील.
पुण्यात आज तलाठी भरती घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी आणि एमपीएससी 2024 च्या जाहिरातीत सर्व संवर्गातील जागांमध्ये वाढ करावी या मागणीसाठी बालगंधर्व रंगमंदिरासमोरील चौकात युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री रामाच्याबाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्यात 295 अ (कोणत्याही धर्माच्या भावना दुखवणे) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या उद्योग आघाडीच्या अध्यक्षा सेजल कदम यांनी तक्रार दाखल केली होती .
शिवसेना आमदार निकालाविरोधात कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक झाला असून निकाला विरोधात ठाकरे गट आणि इंडिया आघाडीने कोल्हापुरात निदर्शनने केली. कोल्हापूरच्या बिंदू चौकात काळे झेंडे दाखवत नोंदवला निकालाचा निषेध. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
पालघरमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने आले आहेत. हुतात्मा चौकात दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्याच आली. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
इचलकरंजी शहरात महाविकास आघाडीच्या वतीने शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात येत आहे. राहुल नार्वेकर यांचाही केला निषेध. ’50 खोके एकदम ओके शिंदे ओके’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
शेख हसीना आज पाचव्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत आवामी लीग पक्षाच्या विजयानंतर आज शेख हसीना यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. काल हसिना यांच्या नेतृत्वाखालील आवामी लीग सरकारने आपल्या 36 सदस्यीय मंत्रिमंडळाची घोषणा केली होती. 14 विद्यमान मंत्र्यांना नवीन मंत्रिमंडळात स्थान मिळालं नसल्याची माहिती आहे. ज्यामध्ये परराष्ट्र मंत्री एके अब्दुल मोमेन, परराष्ट्र राज्यमंत्री शहरयार आलम, अर्थमंत्री एएचएम मुस्तफा कमाल, नियोजन मंत्री अब्दुल मन्नान, कृषी मंत्री अब्दुर रज्जाक आणि वाणिज्य मंत्री टिपू मुन्शी यांसारख्या दिग्गजांचा समावेश असल्याची माहिती आहे.
मणिपूर – राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला अखेर मणिपूर सरकारची परवानगी मिळाली आहे. काल रात्री उशिरा ही परवानगी मिळाली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पाहता यात्रेत मोजकेच लोक दाखल व्हावेत आणि यात्रेदरम्यान जास्त गर्दी होणार नाही याची खबरदरी घेण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. यात्रेत सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या आणि नाव प्रशासनाला कळवण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. १४ जानेवारीला इंफाळ मधून ही यात्रा सुरू होणार असून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
गुजरातच्या वडोदरामधून 108 फूट लांब अगरबती अयोध्येत दाखल झाली आहे. भरवाड समाजाने ही मोठी अगरबती बनवली आहे. मोठ्या ट्रकमधून ही अगरबती अयोध्येत आणण्यात आली आहे.
नवी दिल्ली- लोकसभा निवडणूक 2024 मध्ये जागा वाटपाबाबत नितीश कुमार पुन्हा नाराज झाले आहेत. दहा जागांबाबत नितीश कुमार यांची नाराजी आहे. इंडिया आघाडीकडून लोकसभा निवडणुकीबाबत बिहारमधील जागा वाटपाचं सूत्र ठरलं आहे. मात्र नितीश कुमार यांना जागावाटपाचा फॉर्मुला मान्य नाही अशी सूत्रांची माहिती आहे.
शिंदे, फडणवीस साहेब महाराष्ट्रातील एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा. महाराष्ट्र तुमची लायकी दाखवेल. सुषमा अंधारे यांनी शिंदे- फडणीसांवर हल्लाबोल केला आहे. विधानसभा अध्यक्षांनी काल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी हुकूमशाही आणि घराणेशाही मोडीत काढली असं विधान केलं होतं. यावरच सुषमा अंधारेनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करत त्यांचेच चिरंजीव असलेले श्रीकांत शिंदे तसेच शिवसेनेतील अनेक मंत्र्यांच्या मुलांनाही राजकारण सोडून गुणवत्ता सिद्ध करायला सांगा. तसंच शिंदे, फडणवीस साहेब महाराष्ट्रातील एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा महाराष्ट्र तुमची लायकी दाखवेल,” असं त्यांनी म्हटलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मुंबईच्या शिवडी-नावाशेवा लिंक रोडचं उद्या मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. नागरिकांसाठी हा लिंकरोड आजपासूनच बंद करण्यात आला आहे. नवी मुंबईत मोदींची उद्या जाहिर सभा आहे.
उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. ते नाशिकच्या काळाराम मंदिरात श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत. या निमित्त नाशकात काळाराम आणि पंचवटी परिसरात रंगरंगोटी सुरू आहे. रामायणातील प्रसंग दर्शवणारे चित्र कलाकारांकडून रेखाटले जात आहे.
शिंदे गटाची वकिली करावी अशा प्रकारे नार्वेकरांकडून निकालाचं वाचन सुरू होतं, असा घणाघात संजय राऊत यांनी आज केला. सुप्रिम कोर्टाला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचं संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. राहूर नार्वेकर भाजपच्या कार्यकर्त्याप्रमाणे वागले असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
आमदार अपात्रतेच्या निकालावरून संजय राऊत यांनी जोरदार टिका केली. नार्वेकरांनी दिलेला निकाल एकतर्फी आहे. या निर्णयाविरोधात आम्ही सुप्रिम कोर्टात जाणार असं संजय राऊत म्हणाले.
काल आमदार अपात्रतेवर दिलेला निकाल हा नार्वेकरांनी मॅच फिक्सिंग करून दिला असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. आमच्यावर घराणेशाहीची टिका करता, मग श्रीकांत शिंदेंची ओळख काय असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ऊद्धव ठाकरे यांचं निवासस्थान मातोश्री बाहेर बॅनर लागले आहेत. बाळासाहेबांची अन् दिघे साहेबांचा मान आणि धनुष्यबाण असा या बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे. मुंबईत शिवसेना कार्यकर्त्यांची सगळीकडे बॅनरबाजी पाहायला मिळतेय. बांद्रा , माहीम , बोरीवलीत बंटी महाडीक आणि कुणाल सरमळकर यांनी बॅनर लावले आहेत.
शरद मोहोळ यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना आणखीन सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. काल सहा आरोपींना न्यायालयात हजर केले होते. पोलीस तपासामध्ये आरोपींकडे आणखीन तीन काढतुसे सापडली. घटनेपूर्वी देखील आरोपींनी दोन ते तीन वेळा शरद मोहोळ याला एकटे पाडून मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो प्लॅन पूर्णत्वास गेला नसल्याची माहिती आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाच्या मुंबईतील बैठकीत निर्णय. 15 जानेवारी नंतर घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं जाणार आहे. हे सर्वेक्षण सात दिवसात पूर्ण करून विश्लेषण केले जाईल. पुढील 15 फेब्रुवारी पर्यंत राज्य सरकारला अहवाल देण्याचा राज्य मागासवर्ग आयोगाचा विचार आहे. कालच्या बैठकीत गोखले इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्यांसोबत राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांनी सॉफ्टवेअर बाबत चर्चा केली.
गाव गुंडा विरोधात कोल्हापूर पोलीस अँक्शन मोडवर आले आहेत. वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी कोल्हापुरात मोठ्या प्रमाणावर कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांचं राजेंद्र नगरात सर्च ऑपरेशन सुरु आहे. फाळकुट दादांच्या विरोधात कोल्हापूर पोलिसांची विशेष मोहीम सुरु आहे. कोल्हापुरातील राजेंद्र नगर परिसरात 100 पेक्षा अधिक पोलिसांचा सहभाग आहे.
शरद पवार आणि अजित पवार आज एकत्र येण्याची शक्यता होती. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त एकत्र येणार होते. पण अजित पवार कार्यक्रमाला येणार नाहीत. त्यांनी एकत्र येण टाळलय. यापूर्वी नाट्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्याला अजित पवार आणि शरद पवारांनी एकत्र येणं टाळलं होतं
उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच एसीबी चौकशी प्रकरण. आता यापुढे कुठल्याही चौकशीला सामोरं जाणार नाही, माझ्याकडची सर्व माहिती एसीबीला दिली. आता चौकशी पूरे, जी कारवाई करायची ती करा, आमदार राजन साळवी यांचा इशारा. गेल्या दीड वर्षापासून राजन साळवी यांच्या संपत्तीची अलिबागच्या एसीबी कार्यालयात चौकशी सुरु आहे. काल देखील राजन साळवी यांच्या कुटुंबीयांची अलिबागच्या एसीबी कार्यालयात एक तास चौकशी झाली.
जळगावातील एरंडोलमध्ये भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडले. एक ठार, चार जखमी. अपघातानंतर महामार्गावर गतीरोधक तयार करावे, या मागणीसाठी संतप्त जमावाकडून रास्ता रोको. नागरिकांनी स्वतःच जेसीबीच्या सहाय्याने रस्ता खोदून टाकल्याने सहा ते सात किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
पुणे-लोणावळा दरम्यान सोमवारपासून दुपारच्या वेळेत लोकल धावणार. सोमवार 15 जानेवारी पासून दुपारच्या वेळेत सोईनुसार लोकल धावणार आहे. याबाबतचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. रेल्वे सुरू होणार असल्याने प्रवासी, विद्यार्थी, चाकरमानी, नोकरदार, पर्यटक यांची मोठी सोय होणार आहे.
तुरुंगातून जामिनावर सुटल्यानंतर विनापरवानगी रॅली काढले आमदार सुनील केदार यांच्या अंगलट आले. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवंतीका लेकुरवाळे, कुंदा राऊत, विष्णू कोकड्डे, रविंद्र चिखले यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुनील केदार यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणार आहे.
फेसबुकवर ॲानलाईन पद्धतीने नायलॅान मांजाची विक्री सुरु आहे. ही विक्री थांबवण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे पोलिसांना दिले आहे. न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत येत्या शुक्रवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे सांगितले आहे.
वाशीमच्या कारंजा तालुक्यातील धनज येथील शेतकरी निनाद गजानन टेकाडे यांनी आपल्या तीन एकर क्षेत्रातील पपईवर भाव मिळत नसल्यानं ट्रॅक्टर फिरवलाय. तीन एक्कर पपईच्या लागवडीसाठी त्यांनी जवळपास अडीच लाख रुपयांचा खर्च केला. परंतु पपई विक्रीस आल्यानंतर अवघे ४ ते ५ रुपये किलोचा दर मिळत असल्यानं उत्पादन खर्चही भरून निघणं कठीण झाला आहे.
उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर, शिरूर ,आंबेगाव ,खेड तालुक्यातील अनेक भागात दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने झोडपले आहे. अचानक पडलेल्या या अवकाळी पावसाने बळीराजा शेतकऱ्याची मात्र चिंता वाढवली आहे. सततच्या वातावरण बदल आणि अवकाळी पावसाने कांदासह इतर पिकांना मोठा फटका बसणार आहे.