मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : काँग्रेस नेते आणि राज्याचे नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची वडेट्टीवार भेट घेणार आहेत. दिल्ली सेवा बिल आज राज्यसभेत सादर होणार. विधेयकाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि आपचा खासदारांना व्हीप जारी. मणिपूरमध्ये बीरेन सरकारला झटका, कुकी पिपुल्स अलायन्सने एनडीएपासून घेतली फारकत. यासह राज्य आणि देशातील घटना घडामोडी जाणून घ्या
नवी दिल्ली | राज्यसभेत आज दिल्ली सेवा विधेयक मांडण्यात आलं. यावेळी राज्यसभेत चांगलीच खडाजंगी बघायला मिळाली. अखेर दिल्ली सेवा विधेयकाच्या बाजूने 131 मते पडली. तर विरोधात 102 मते पडली. त्यामुळे हे विधेयक बहुमताने मंजूर झालं. हे विधेयक राज्यसभेतही मंजूर झाल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. कारण गेल्या आठवड्यात लोकसभेतही हे विधेयक मंजूर झालंय.
नवी दिल्ली | राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयकाची मतदान प्रक्रिया लांबली आहे. तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे आवाजी मतदान होणार नाही. सर्व खासदारांना स्लिप्स वाटप करून मतदान घेण्यात येत आहे. रात्री दहा वाजल्यानंतरही राज्यसभेचे कामकाज सुरूच आहे. थोड्याच वेळात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
पुणे | राज्याच्या शिक्षण विभागात नोकरी लावण्याचा अमिष दाखवलं, पैसेही घेतले, मात्र नोकरी न लावता फसवणूक केली. हा संपूर्ण प्रकार केलाय शिक्षण विभागातील एका मोठ्या महिला अधिकाऱ्यांनं. शैलजा दराडे असं या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे. शैलजा दराडे या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या प्रभारी आयुक्त होत्या. पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होता आणि त्यानंतर आता शैलजा दराडे यांना अटक करण्यात आलीय.
शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून शैलजा दराडे आणि त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे यांनी फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रत्येकी 12 ते 15 लाख रुपये घेऊन 44 उमेदवारांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले होते.
राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयकावर अमित शहा यांनी उत्तर दिले आहे. दिल्लीत भ्रष्टाचार मुक्त सरकारचा कारभार व्हावा हाच आमचा हेतू आहे. हे विधेयक आल्यानंतर आधीची जी परिस्थिती होती त्यात कोणताही बदल होणार नाही, असेही अमित शहा म्हणाले आहेत.
कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुनील फुलारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून घटनेचा आढावा घेणे सुरू आहे. दुपारी वाई न्यायालयात घडली होती गोळीबाराची घटना. कुख्यात गुंडावर दोन जणांकडून गोळीबार करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.
माटरगाव आंदोलनातील पालकावरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी भाग्यश्री विसपुते यांचे निर्देश दिले आहेत. शेगांव तालुक्यातील माटरगाव येथील विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी केले होते जिल्हा परिषदमध्ये आंदोलन. दरम्यान जिल्हा परिषद प्रशासनाने पालकांवरच केले होते गुन्हे दखल.
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे विक्रोळी विधानसभा आमदार सुनील राऊत यांच्या विभागातील टागोर नगरमधील शाखाप्रमुख राजेश सोनवळे यांच्यासोबत मोठ्या संख्येने गटप्रमुख, पदाधिकारी कार्यकर्ते आज रात्री 9 वाजता ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करणार आहेत.
कंटेनर मुंबई दिशेने जात असताना चालकांचा कंटेनर वरील ताबा सुटल्याने कंटेनर पहिल्या लेन जवळील दुभाजकावर चढून पुणे बाजूस पलटी झाला. यामुळे पुण्याकडे येणारी वाहतूक काही वेळ ठप्प होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. चालकाचा ताबा सुटल्याने ही घटना घडलेली आहे.
सातारा : वाई न्यायालय परिसरात दुपारी गोळीबार झाला होता. कुख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव, निखिल आणि अभिजीत शिवाजी मोरे यांच्या दिशेने गोळीबार झाला होता. या गोळीबारात सुदैवाने कोणीही जखमी नाही. वाई मेनवली येथील हॉटेल मालकास खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव आणि त्याच्या सहकाऱ्यांवर वाई न्यायालय परिसरात गोळीबार झाला.
दोन फायर होऊनही नशिबाने कोणाला दुखापत झाली नाही. गोळीबार करणारे दोनजण ताब्यात घेण्यात आले आहेत. याप्रकरणीत सातारा पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. गोळीबार का करण्यात आला? याची चौकशी सुरू केली आहे.
जालना नगर परिषद आता महानगर पालिका होणार आहे. या संदर्भात नगर विकास खात्याचे उप सचिव विद्या हम्पय्या यांचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहे. जालना नगर परिषद आता महापालिका झाल्याने शहराच्या विकासाला गती मिळणार आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील हे मुंबईत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या मातोश्री निवासस्थानी दाखल झाले आहेत. इंडिया आघाडीची ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत बैठक बोलावण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील उद्धव ठाकरे यांची भेट घेत असल्याची चर्चा आहे.
पुणे | पुणे महानगरपालिकेतील आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात मनसेने आज आक्रमक आंदोलन केले आहे. पुणे महानगरपालिकेच्या आवारात मनसेकडून आरोग्य विभाग व्हेंटिलेटर असून रुग्णांचे हाल होत आहेत, म्हणून आज मनसेने व्हेंटिलेटरवर रुग्णांना आणून प्रतिनिधिक आंदोलन केले. आंदोलनात मनसैनिकांनी पालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
पुणे : जेजुरीत शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जेजुरीच्या दौऱ्यावर आहेत.
पुणे : युवक क्रांती दलाच्या वर्धापन दिनाला उद्धव ठाकरे जाणार नाहीत. उद्धव ठाकरे यांचा नियोजित कार्यक्रम नाही. त्यांचा पुण्यात नियोजित कार्यक्रम नसल्याने ते हजर राहणार नाहीत, अशी माहिती शिवसेना संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी दिली आहे.
उल्हासनगर | मुंबईनजीकच्या उल्हासनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. उल्हासनगरमध्ये कंपनीला भीषण आग लागली आहे. उल्हासनगर कॅम्प 3 परिसरात ही आग लागलीय. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचं कारण अजून अस्पष्ट आहे.
जेजुरी | “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा विकास होतोय. 9 वर्षात मोदींच्या मार्गदर्शनाखाली देश पुढे जात आहे. राज्यात 80 हजार कोटींची कामं सुरु आहेत.राज्य सरकारला निधीची कमी भासणार नाही. महाराष्ट्राच्या विकासाची गाडी वेगाने जाणार आहे. सत्तेचा वापर सर्वसामन्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी करणार. सरकार कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही” असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. जेजुरी शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस अजित पवार बोलत होते.
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाबाबत उद्धव ठाकरे राज ठाकरेंशी चर्चा करण्याची शक्यता. वेळ आली तर मी राज ठाकरेंशी चर्चा करेन, उद्धव ठाकरे यांचे खासगीत वक्तव्य.
पुरानंतर राजधानी दिल्लीत डेंग्यूच्या प्रकरणात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. एक आठवड्यात 100 हून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. आत्तापर्यंत डेंग्यूच्या एकूण 348 केसेस समोर आल्या आहेत.
शरद पवार गटातर्फे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेला दावा दुर्भाग्यपूर्ण आहे, असे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
तसेच अजित पवारांच्या याचिकेमुळे राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचं सिद्ध होतं नाही. अजित पवार गटाची याचिका फेटाळून लावावी, अशी मागणी शरद पवार यांच्या गटाने केली आहे.
शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेजुरीत दाखल झाले आहेत. त्यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही जेजुरीत पोहोचले आहेत. शासन आपल्या दारी माध्यमातून जनतेला विविध योजनांचा लाभ दिला जातो.
गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयक सादर केले आहे. हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे.
औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जोरदार बाचाबाची झाली. निधीवरुन दानवे आणि भुमरेंमध्ये बाचाबाची झाली. विरोधी आमदारांना निधी असल्याचा दानवेंचा आरोप
जयपूर-मुंबई एक्सप्रेसमधील गोळीबार प्रकरणी आरोपी चेतन सिंगला 11 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. बोरिवली न्यायालयाने आज सुनावणीदरम्यान कोठडी सुनावली.
आमचे सरकार आले की मुंबईतील टोलनाके बंद करु.
शिंदेंच्या दिल्लीवाऱ्यांमुळे राज्यातील प्रश्न वाऱ्यावर. पूर्व, पश्चिम द्रूतगती मार्गावरील टोलचा पैसा एमएसआरडीसीकडे का जातोय? आदित्य ठाकरेंचा सवाल.
आदित्य ठाकरेंची मातोश्री येथे पत्रकार परिषद. न्याय मिळेपर्यंत लढत राहणार. आदित्य ठाकरेंचे पत्रकार परिषदेत वक्तव्य
अजित पवार गटाच्या सांस्कृतिक विभागाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना पत्र लिहिण्यात आलं आहे. दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचा एनडी स्टुडिओ ताब्यात घेऊन मराठी आणि हिंदी चित्रपट निर्मात्यांना तो उपलब्ध करून द्या, अशी पत्रातून विनंती करण्यात आली आहे. चित्रपट कलावंतांच्या अडचणी समजून घेण्यासाठी राज्य शासनाने लवकरात लवकर बैठक घ्यावी, असं पत्र अजित पवार गटाचे सांस्कृतिक प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी लिहिलं आहे.
औरंगाबादमधील डीपीडीसीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्यात जोरदार राडा झाला. या बैठकीत अंबादास दानवे आक्रमक झाले आणि मंचावरून उठून त्यांनी संताप व्यक्त केला. विरोधी आमदारांना निधी देत नसल्यामुळे अंबादास दानवे आक्रमक झाले. यावेळी संदिपान भुमरे आणि अंबादास दानवे यांच्यात बाचाबाची झाली.
मोदी आडनाव बदनामी प्रकरणात गेलेली खासदारकी राहुल गांधींना पुन्हा मिळाली आहे. 137 दिवसांनंतर ते पुन्हा एकदा संसदेत दाखल झाले आहेत. यावर भाजप नेते सुशील मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ते अजूनही दोषमुक्त झाले नाहीत. फक्त त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. त्यांचं अपील अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे. ही एक सर्वसामान्य प्रक्रिया आहे. सुप्रीम कोर्टाने असंही म्हटलं होतं की ‘हे चांगलं नव्हतं’. कोर्टाने राहुल गांधींवर जोरदार टीका केली. त्यामुळे सदस्यत्व बहाल केल्याने कोणताही परिणाम होणार नाही”, असं ते म्हणाले.
नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयातील एका वॉर्डला आग लागली आहे. इमर्जन्सी वॉर्डमध्ये आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तर वॉर्डमधील सर्व रुग्णांना सुरक्षिच बाहेर काढण्यात यश आलं आहे.
#WATCH | Delhi: A fire broke out in the endoscopy room of AIIMS. All people evacuated.
More than 6 fire tenders sent, say Delhi Fire Service
Further details are awaited. pic.twitter.com/u8iomkvEpX
— ANI (@ANI) August 7, 2023
भंडारामधील गोसेखुर्द धरणाचे 18 गेट बंद करण्यात आले आहेत. तर 15 गेटमधून 64 हजार 308 क्युसेस वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सतत दोन दिवस सर्व 33 गेट सुरू ठेवण्यात आले होते. गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा बॅरेजचे 19 गेट सुरू असून त्यातून 95 हजार 335 क्युसेस वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी वैनगंगा नदीत पोहोचत असल्यानं गोसेखुर्द धरणाची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे नदी काठावरील नागरिकांनी सतर्क रहावं, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ उद्या मणिपूरला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप यांनी दिली. तर मणिपूरमधील घटनेच्या विरोधात जंतर-मंतरवरच्या आंदोलनात महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. या आंदोलनात केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे.
मणिपूरच्या मुद्द्यावर लोकसभेत विरोधकांनी पुन्हा गोंधळ घातला आहे. या गोंधळानंतर लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे मणिपूर घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचं जंतर-मंतरवर आंदोलन सुरू आहे. पुण्यातील आणि दिल्लीतील पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
राहूल गांधी संसदेत दाखल झाले आहेत. काँग्रेस खासदारांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे. इंडिया आघाडीच्या खासदारांनी सुध्दा त्यांचं स्वागत केलं आहे. राहूल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं आहे.
राहुल गांधी यांना पुन्हा सरकारी निवासस्थान मिळणार आहे. तुघलक लेनवरच्या सरकारी निवासस्थानासाठी राहुल आग्रही असल्याची माहिती सूत्रांची दिली आहे. खासदारकी गेल्यानंतर सरकारी निवासस्थान राहूल गांधी यांना सोडावं लागलं होतं. राहुल गांधी यांचा मुक्काम पुन्हा तुघलक लेनवरच्या निवासस्थानी असेल.
आज अजित पवार यांनी साखर आयुक्तांसोबत बैठक घेतली. साखर कारखान्याच्या विविध प्रश्नांबाबत बैठक घेतली असल्याची माहिती पवारांनी दिली. कुठल्या कामाला गती द्यायची याबाबत सुध्दा चर्चा झाली आहे. इथेनॉल उत्पादनासाठी केंद्र सरकार मदत करणार आहे. राज्याचा विकास करण्यासाठी मी भाजपसोबत आहे. शहांनी माझं कौतुक केलं तर तु्म्हाला काय त्रास झाला आहे. मोदींशिवाय आता पर्याय दिसत नाही.
मी कुठल्याही दबावाला घाबरणार नाही. जयंत पाटील हे काल आणि परवा पवार साहेबांसोबत होते. त्यामुळे त्यांच्याबाबत उगाचं चर्चा सुरु आहे. बरं ते भेटले असते तर त्यांनी ते मान्य केलं असतं.
नवी मुंबईत उद्या पाणीपुरवठा होणार नाही.
हिंदू एकत्र आले तर ठाकरेंना राग का ? घरबशाने फडणवीसांवर बोलू नये असा टोला आशिल शेलार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला
काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रजनी पाटील यांचे निलंबनही मागे घेण्यात आले आहे. सभागृहात व्हिडिओ बनवल्यामुळे हे निलंबन करण्यात आले होते
अभिनेते सनी देओल कायम त्यांना खटकणाऱ्या मुद्द्यांवर बोलताना दिसतात. आता देखील सनी देओल यांनी बॉडी शेव करणाऱ्या अभिनेत्यांवर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर….
WI vs IND 2nd T20 | हार्दिक पंड्याने काय चूका केल्या?. मोक्याच्या क्षणी हार्दिक पांड्याने धाडस दाखवलं नाही. त्यामुळे टीम इंडियाची विजयाची संधी हिरावली. टीम इंडिया 5 सामन्यांच्या T20 सीरीजमध्ये पिछाडीवर पडली आहे. वाचा सविस्तर…
राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर खासदारकी बहाल. लोकसभा सचिवालयाकडून राहुल गांधींच्या खासदारकीबाबत अधिसूचना जारी.
“उद्धव ठाकरे आता मस्टर लिहिण्याच्या लायकीचे राहिले नाहीत. उद्धव ठाकरे आणि त्यांची टोळी औरंगजेबाच्या वृत्तीची. मुलगा जेलमध्ये जाणार हे ठाकरेंना कळून चुकलय. 2019 पर्यंत फडणवीसांना ठाकरेंचे सर्व लाड पुरवले” असं नितेश राणे म्हणाले.
जयंत पाटील-जितेंद्र आव्हाड अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा; आव्हाड म्हणाले, ही अशी चर्चा होणं हा तर माझा अपमान आहे. बातमी वाचा सविस्तर…
मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांचं नाव लावायला लाज वाटायची
बॅनरवर बाळासाहेबांचे फोटोही नसायचे; नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात, बातमी वाचा सविस्तर…
चांद्रयान 3 कुठपर्यंत पोहोचलं? चंद्रापासून किती लांब? चांद्रयान 3 च्या नजरेतून दिसणारा चंद्र; पाहा फोटो… संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
बाणास्तरी पुलावर पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. वाहने एकमेकांवर आदळल्याने झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत 5 जण गंभीर जखमी झाले आहे. बाणास्तरी पुलावरुन विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका आलीशान कारने तीन कार आणि दोन दुचाकींना धडक दिली. माशेल ओल्ड गोव्यात हा अपघात झालाय.
जुन्या भांडणाची कुरापत काढून तीन ते चार जणांच्या टोळक्याने एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला. नाशिकच्या म्हसरूळ पोलीस स्टेशन हद्दीतील म्हसरूळ-मखमलाबाद लिंकरोडवरील चाणक्यपुरी परिसरात ही घटना घडली. गौरव थोरात (२२) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
जयपूर, मुंबई एक्सप्रेस गोळीबारातील आरोपी चेतन सिंगची पोलीस कोठडी संपणार आहे. सोमवारी दुपारनंतर आरोपी चेतन सिंगला बोरिवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 31 जुलै रोजी चेतन सिंगने जयपूर मुंबई एक्स्प्रेसमध्ये चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार करून 4 जणांची हत्या केली होती.
धोंड्याच्या महिन्यात घरी जेवायला आलेल्या मुलीसह आईचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली. पेरु तोडण्यासाठी गच्चीवर गेले असता त्यांना उच्च दाबाच्या वीजवाहिनीचा शॉक बसला. यावेळी जावयासह दोन नातवंडे लांब फेकले गेल्याने सुदैवाने बचावले.
ऑक्टोबरमध्ये नाशिकहून बंगळूर आणि दिल्लीसाठी विमानसेवा सुरु होणार आहे. एअर आकाशाकडून १० नवीन मर्गांसाठी झाली चाचपणी यासाठी करण्यात आली आहे. स्पाईज जेटकडून नाशिकहून दिल्लीसाठी सुरू असलेली विमानसेवा तूर्तास स्थगित केली आहे. ती सुरु होण्याची शक्यता आहे.
वंचित बहुजन आघाडी मुंबई महापालिका निवडणुकीत 88 जागा लढवणार आहे, अशी घोषणा वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. मुस्लिमांनी आम्हाला साथ दिली तर महापालिकेत बदल झालेला दिसून येईल, असा दावाही आंबेडकर यांनी यावेळी केला.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उद्या पुण्यात सभा होणार आहे. युवक क्रांती दलाच्या वर्धापन दिनानिमित्ताने परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश कला क्रीडा सभागृहात ही सभा होणार असून यावेळी काँग्रेस नेते नाना पटोले, विद्या चव्हाण आणि कुमार सप्तर्शी उपस्थित राहणार आहेत.
अजित पवार गटाने दाखल केलेली याचिका फेटाळून लावा, अशी मागणी करणारी याचिका शरद पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगात केली आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीवर केलेला दावा दुर्भाग्यपूर्ण आहे. त्यामुळे त्यांची याचिका फेटाळून लावावी, असंही या याचिकेत म्हटलं आहे.
राज्यसभेत आज दिल्ली सेवा विधेयक सादर केलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने आपआपल्या खासदारांना व्हीप बजावला आहे. दिल्ली सेवा बिल लोकसभेत मंजूर झालं आहे. राज्यसभेत हे बिल मंजूर होतं का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.