Maharashtra Cabinet Minister 2024 : महायुती सरकारमधील नवीन मंत्र्यांचा शपथविधी आज पार पडणार आहे. नागपुरात हा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला असून आज संध्याकाळी ४ वाजता हा सोहळा होईल. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तिन्ही पक्षातील मंत्री शपथ घेतील. नागपुरातील राजभवनात हा शपथविधी आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तब्बल ३३ वर्षांनी नागपुरात मंत्रिमंडळाचा शपथविधी होत आहे. त्यामुळे सध्या नागपुरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यापूर्वी काही संभाव्य मंत्र्यांची नावे समोर आली आहेत.
येत्या १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या शपथविधी सोहळ्याकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत. सध्या कोणत्या पक्षातील किती आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान सध्या नागपुरातील राजभवनात मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. आज दुपारी 4 नंतर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. यानंतर उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होईल.