नाराजी उफाळण्याच्या भीतीने मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर?
राज्याच्या मंत्रिमंडळाला मुहूर्तच मिळत नसल्याचं दिसत आहे. विधानसभेचा कार्यकाळ संपण्यासाठी फक्त तीन महिने उरले आहेत. त्यामुळे मंत्रिपदाकडे डोळे लावून बसलेल्या आमदारांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडल्याचं चित्र आहे.
मुंबई : राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी छाती ठोकपणे सांगितलं होतं. पण राज्याच्या मंत्रिमंडळाला मुहूर्तच मिळत नसल्याचं दिसत आहे. विधानसभेचा कार्यकाळ संपण्यासाठी फक्त तीन महिने उरले आहेत. त्यामुळे मंत्रिपदाकडे डोळे लावून बसलेल्या आमदारांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडल्याचं चित्र आहे.
मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजप-शिवसेनेत धुसफूस सुरू असल्याची चर्चा रंगत असताना आता मंत्रिपदं, उपमुख्यमंत्रीपद आणि विभागांचे वाटप निश्चित होत नाही तोवर मंत्रीमंडळ विस्तारावर निर्णय होणार नसल्याचं सांगितलं जात आहे. आयात नेत्यांना विस्तारात प्राधान्य मिळत असल्याने दोन्ही पक्षांतर्गत कलह अधिक वाढल्याने राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला. पण शिवसेना नेत्यांच्या म्हणण्यानुसार, विस्ताराचं शिवसेनेला काहीही पडलेलं नाही. पक्ष सध्या दुष्काळासाठी काम करत आहे. ज्यांनी विस्तार जाहीर केला, त्यांनाच प्रश्न विचारा, अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्त्या निलम गोऱ्हे यांनी दिली.
शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यानंतर विधान परिषदेवर निवडून गेलेल्या आमदारांनाच मंत्रिपदासाठी झुकते माप देण्यात आले होते. त्यामुळे लोकांमधून निवडून विधानसभेवर गेलेले पक्षाचे आमदार नाराज होते. आता मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागताच ही नाराजी पुन्हा एकदा उफाळून आली. आताही दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना किंवा विधान परिषदेवरील आमदारांचीच नावे संभाव्य मंत्रिपदासाठी शिवसेनेकडून समोर येऊ लागल्यामुळे विधानसभेतील आमदारांची नाराजी कशी दूर करावी, असा पेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोर होता. पण शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वाढदिवसाच्या पत्रकार परिषदेत मौन बाळगत कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही.
भाजपच्या गोटातही शिवसेनेसारखीच परिस्थिती आहे. भाजपकडून पाच ते सहा जणांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी दिली जाणार असल्याचं बोललं जात होतं. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर एसआरए प्रकल्पाप्रकरणी लोकायुक्तांनी ताशेरे ओढले आहेत. प्रकाश मेहता यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाऊ शकतो. अशावेळी मुंबईतून योगेश सागर यांना त्यांच्या जागी संधी दिली जाऊ शकते, असा अंदाज होता.
मुंबईतून आमदार आशिष शेलार यांच्याबरोबर त्यांचंही नाव चर्चेत आहे. विदर्भातील आमदार डॉ. अनिल बोंडे यांचं नावही शर्यतीत होतं. मराठवाडयातील एक आणि नाशिकमधून एका आमदाराला संधी द्या अशी मागणी होत होती. त्यामुळे भाजपमध्ये मंत्रिपदासाठी रस्सीखेच आणि नेत्यांची लॉबिंग सुरू असताना भाजपमध्ये मंत्रिपदाचा निर्णय राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतात, असं सांगत भाजपच्या नेत्यांची उघड प्रतिक्रिया देणं बंद झालं आहे.