Maharashtra Cabinet Expansion : सरपंच ते मंत्री; शिंदे गटातील फायर ब्रँड असलेल्या भरत गोगावलेंबद्दल माहितीये का?
विशेष म्हणजे भरत गोगावले यांनी मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी नवीन जॅकेट शिवले होते. आता त्यांना हे नवीन जॅकेट घालण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या नवीन जॅकेटची घडी मोडली.
Who Is Bharat Gogawale : राज्यातील फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज पार पडला. नागपुरातील राजभवनात दुपारी ४ वाजता नवनिर्वाचित मंत्र्यांनी शपथ घेतली. गेल्या १० दिवसांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागलं होतं. अखेर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यावेळी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षातील आमदारांनी शपथ घेतली. यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचीही मंत्रिपदी वर्णी लागली.
आज सकाळपासून महायुतीच्या तिन्ही पक्षांकडून आपापल्या आमदारांना फोन करून मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी नागपूरला बोलवण्यात आलं आहे. पक्षनेतृत्वाकडून फोन आल्यानंतर अनेक आमदार नागपूरला रवाना झाले आहेत. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचीही मंत्रिपदी वर्णी लागली. शिंदे गटाकडून त्यांचे मंत्रिपद निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे ते नागपुरात दाखल झाले. महायुतीच्या गेल्या सरकारमध्ये भरत गोगावले यांना मंत्रीपद मिळेल, अशी चर्चा रंगली होती. मात्र प्रत्येक वेळी त्यांना मंत्रिपदानं हुलकावणी दिली. ते शिंद गटाचे प्रतोद होते. तरीही त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळालं नव्हतं. विशेष म्हणजे भरत गोगावले यांनी मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी नवीन जॅकेट शिवले होते. आता त्यांना हे नवीन जॅकेट घालण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या नवीन जॅकेटची घडी मोडली.
भरत गोगावले यांचा अल्पपरिचय
भरत गोगावले यांनी सरपंच ते आमदार असा प्रवास केला आहे. त्यांच्या कुटुंबात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. शिवसेना शिंदे गटाने बंड केल्यानंतर प्रतोद म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. भरत गोगावले यांचा जन्म महाडमधील दुर्गम भागातील पिंपळवाडी नावाच्या छोट्याशा गावात झाला. भरत गोगावले यांचे शिक्षण नववीपर्यंत झाले आहे. मात्र त्यांना शिक्षणात फारसा रस नव्हता. त्यांना राजकारणाची आवड निर्माण झाल्याने ते छोटी-मोठी कामं करु लागले. ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना आपल्या कामाची पावती मिळवण्याची पहिली संधी मिळाली. ते सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले आणि सक्रीय राजकारणाला सुरुवात झाली.
1992 मध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीत भरत गोगावलेंना उभं राहण्याची इच्छा होती. त्यांनी तेव्हा काँग्रेसकडे तिकीट मागून पाहिलं. पण काँग्रेसनं तिकीट दिलं नाही, म्हणून ते अपक्ष लढले आणि जिंकले. त्यानंतर शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर ते सलग दोनदा रायगड जिल्हा परिषदेवर निवडून आले. पशु, अर्थ, बांधकाम अशा विविध खात्यांचे दोन वेळा त्यांनी सभापतीपदही भूषवलं. शिवसेनेचा आक्रमक नेता म्हणून त्यांना ओळखले जाते.
महाड विधानसभा मतदारसंघातून 2009 मध्ये त्यांनी निवडणूक लढवली. शिवसेनेने त्यांना तिकीट दिलं आणि ते निवडून आले. 2009, 2014, 2019 आणि 2024 असे सलग चार वेळा भरत गोगावले यांनी महाड मतदारसंघाचे शिवसेनेचं आमदार म्हणून प्रतिनिधित्त्व केले आहे. आता त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे.