मुंबई | अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील एकूण 9 आमदारांनी 2 जुलै रोजी बंडखोरी केली. त्यानंतर अजित पवार यांनी पाचव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेतली. तर त्यांच्यासोबतच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 8 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पवार गटाच्या या शपथविधीनंतर शिवसेना शिंदे गटात कुठेतरी नाराजी पाहायला मिळत होती. इतकंच नाही, तर काही विद्यमान मंत्र्यांकडून खाती काढण्यात येणार असल्याचीही चर्चा होती. तर दुसऱ्या बाजूला अर्थ खात्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आग्रही होते. त्यामुळे खातेवाटपाकडे लक्ष लागलेलं होतं.
या खातेवाटपासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात रात्रंदिवस बैठका सुरु होत्या. अखेर शपथविधीच्या 12 दिवसांनंतर बहुप्रतिक्षित खातेवाटप जाहीर करण्यात आलं. खातेवाटपात फेरबदल करण्यात आलंय. या खातेवाटपात अजित पवार यांना त्यांना हवं असलेलं खातं मिळवण्यात यश आलंय. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेलं अर्थ खात्याची जबाबदारी ही आता अजित पवार सांभाळणार आहेत. त्यामुळे आता अजित पवार हे राज्याचे नवे अर्थमंत्री असणार आहेत.
सचिन सावंत यांची शिंदे शिवसेनेवर टीका
अजितदादा् पुन्हा अर्थमंत्री झाल्यावर शिंदे गटाचा प्रश्न – हाची 'अर्थ' काय मम तपाला?
निधी केवळ राष्ट्रवादीच्या आमदारांना देतात अशी ज्यांच्या नावाने बोंब ठोकत भाजपासोबत गेले त्यांनाच अर्थमंत्री पदी पहावे लागावे हा दैवदुर्विलासच व नियतीचा मार नाही का?
आमची सहानुभूती आहे ?— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 14, 2023
दरम्यान अजित पवार यांना अर्थखातं मिळाल्यानंतर सचिन सावंत यांनी शिंदे सरकारवर ट्विटद्वारे टीका केली आहे. “अजितदादा पुन्हा अर्थमंत्री झाल्यावर शिंदे गटाचा प्रश्न – हाची ‘अर्थ’ काय मम तपाला? निधी केवळ राष्ट्रवादीच्या आमदारांना देतात अशी ज्यांच्या नावाने बोंब ठोकत भाजपासोबत गेले त्यांनाच अर्थमंत्री पदी पहावे लागावे हा दैवदुर्विलासच व नियतीचा मार नाही का? आमची सहानुभूती आहे”, असं सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.
कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं?
राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे.
राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ… pic.twitter.com/KwhXn15uO2
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 14, 2023
महापौर ते उपमुख्यमंत्री असा प्रवास राहिलेल्या छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्याची जबाबदारी मिळाली आहे. भुजबळ यांच्याकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा हेच खातं होतं.
अब्दुल सत्तार यांच्याकडून कृषी खातं काढण्यात आलं. आता कृषी खात्याची जबाबदारी ही धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
अतुल सावे यांच्याकडून सहकार खातं काढलंय. मात्र त्यांना गृहनिर्माण खातं देण्यात आलं आहे. तर माजी गृहमंत्री असलेल्या दिलीप वळसे पाटील यांना सावे यांच्याकडे असलेलं सहकार खातं दिलं गेलं आहे.