संदीप राजगोळकर, Tv9 मराठी, नवी दिल्ली | 25 ऑक्टोबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अचानक दुपारी दिल्ली दौऱ्यावर गेले. त्यांच्या दौऱ्याबाबत काही बाबतीत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली आहे. शिंदे आणि फडणवीस आज दुपारी दिल्लीला रवाना झाले तेव्हा ते मराठा आरक्षणावर योग्य तोडगा काढण्यासाठी दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली होती. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ते दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची चर्चा होती. पण याबाबत अधिकृत अशी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. शिंदे-फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली आहे. ते या दौऱ्यादरम्यान नेमकं कुणाकुणाला भेटले, याबाबतची माहिती समजू शकलेली नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान मुंबईहून दिल्लीच्या दिशेला रवाना झाले होते. ते संध्याकाळी साडेसहा वाजता दिल्लीत दाखल झाले होते. या दरम्यान त्यांनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती समोर आलीय. पण त्यांनी दिल्लीत नेमकी कुणाची भेट घेतली, याबाबत गुप्तता बाळगण्यात आली आहे. दोन्ही नेते आता दिल्लीतील बैठक आटोपून मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने त्यांचा आजचा दिल्ली दौरा असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील आज पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी आज सकाळीच मनोज जरांगे यांना फोन करुन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पण मनोज जरांगे उपोषण मागे घ्यायला तयार नाहीत. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणावेळी एक महत्त्वाची कृती केली. त्यांनी आपलं भाषण सुरु असताना माईक सोडला आणि ते मंचावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर गेले होते. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर आधी नतमस्तक झाले. त्यानंतर त्यांनी पुन्हा मंचाच्या मध्यमागी येत भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी शिवरायांची शपथ घेत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ, असं आश्वासन दिलं. त्यामुळे आता सरकारला मराठा समाजाला आरक्षण देणं महत्त्वाचं आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवरायांची शपथ घेतल्यानंतरही मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी शिंदे-फडणवीस आज दिल्लीच्या दौऱ्यावर गेल्याची चर्चा आहे. मनोज जरांगे यांनी शिंदे-फडणवीस यांना दिल्लीला गेला आहात तर आरक्षणाचा निर्णय घेऊन या. नाहीतर एक तासही देणार नाही, अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे या प्रकरणी आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.