सर्वात महत्त्वाची बातमी, एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर, महाराष्ट्रासाठी मोठी बातमी येणार?
महाराष्ट्रातील राजकीय (Maharashtra Politics) घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत (Delhi) पुन्हा एकदा महत्त्वाची खलबतं होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.
मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय (Maharashtra Politics) घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत (Delhi) पुन्हा एकदा महत्त्वाची खलबतं होणार आहेत. राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra assembly budget session) उद्यापासून सुरुवात होणार आहे. या अधिवेशनाच्या आधी दिल्लीत फार महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. एकनाथ शिंदे यांचा हा दौरा फार महत्त्वाचा आहे. कारण गेल्या अनेक महिन्यांपासून राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार प्रलंबित आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारावरुन विरोधकांनी अनेकदा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा आजचा दिल्लीचा दौरा महत्त्वाचा आहे.
खरंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामागचं अधिकृत कारण सध्या तरी गुलदस्त्यात आहे. पण राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांचा हा दिल्ली दौरा जास्त महत्त्वाचा मानला जातोय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतर ते दिल्लीसाठी रवाना होणार आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली दौऱ्यात मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत दिल्लीतील भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा होण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षाचे ‘चिन्ह’ आणि ‘नाव’ मिळाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाल्याने अधिवेशना दरम्यान किंवा त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती.
मुख्यमंत्री अमित शाह यांची भेट घेणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. या भेटीत मंत्रिमंडळ विस्तार, सत्तासंघर्ष आणि राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे अवघ्या काही तासांसाठी मुख्यमंत्री दिल्ली दौरा करणार असल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराकडे शिंदे गटाच्या आमदारांचं लक्ष
मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे शिंदे गटाच्या आमदारांचं जास्त लक्ष आहे. कारण अनेक आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. काही आमदारांनी तर उघडपणे आपली मंत्रिपदाची इच्छा व्यक्त देखील केलीय. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल, याकडे त्यांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे सरकार स्थापन होऊन सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ होऊन गेला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही म्हणून शिंदे गटातील आमदार नाराज झाल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. यावरुन शिंदे गटातील आमदारांची धुसफूस समोर आली होती. काही जणांनी उघडपणे याबाबत भाष्यही केलं होतं. त्यामुळे हा विस्तार शिंदे गटाच्या आमदारांसाठी जास्त महत्त्वाचा मानला जातोय.