सिद्धीविनायक ते मुंबादेवीचं दर्शन… देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यातील A टू Z अपडेट काय?
आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. याच पार्श्वभूमीवर आज सकाळपासून काय काय घडामोडी घडल्या याची आपण माहिती घेणार आहोत.
Devendra Fadnavis Swearing-in : महाराष्ट्रात आजपासून देवेंद्र पर्वाला सुरुवात होणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेतील. देवेंद्र फडणवीसांसोबतच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. याच पार्श्वभूमीवर आज सकाळपासून काय काय घडामोडी घडल्या याची आपण माहिती घेणार आहोत.
🔹सकाळी ७ वाजता
भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. आझाद मैदानात हा शपथविधी सोहळा होणार आहे. यानिमित्ताने आझाद मैदानात जय्यत तयारी करण्यात आली आहे.
🔹सकाळी ८ वाजता
देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीपूर्वी ‘वर्षा’ निवासस्थान परिसरात साधू-संतांकडून अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आले. या बॅनरमध्ये फडणवीस यांना ‘धर्मरक्षक’ आणि ‘महाराष्ट्रसेवक’ या विशेषणांनी गौरवण्यात आले आहे.
🔹सकाळी ८.३० वाजता
मुंबईतील देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदासाठी शपथविधी पार पडत असतात दुसरीकडे पुण्यात महाविकास आघाडीकडून विधान भवन प्रवेशद्वारासमोर ईव्हीएमविरोधात आंदोलन कण्यात आले.
🔹सकाळी ९ वाजता
महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला नाशिकचे साधू महंत हजेरी लावणार आहेत. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या अनेक साधू-संतांना निमंत्रित करण्यात आले आहे.
🔹सकाळी १० वाजता
महायुती सरकारच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या संपूर्ण दौऱ्याची माहिती समोर आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संध्याकाळी ४.३० च्या दरम्यान मुंबई विमानतळावर दाखल होतील. यानंतर ते 5.15 च्या सुमारास आझाद मैदानात पोहोचतील. यानंतर देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होईल. यानंतर अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. हे शपथविधी झाल्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदी हे रवाना होतील, असे म्हटले जात आहे.
🔹सकाळी १०.३० वाजता
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील मुंबईत येणार आहेत. अमित शाह हे दुपारी 3.30 वाजता मुंबईत दाखल होतील. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्यापूर्वी अमित शाह हे सह्याद्री अतिथीगृहात एक छोटी बैठक घेतील. दुपारी ३.३० नंतर ही बैठक होईल. अमित शहा जवळपास 2 तास सहयाद्री अतिथीगृहात असतील. त्या दरम्यान ते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक करतील. त्यामुळे शपथविधीपूर्वी तिन्ही नेत्यांची अमित शहांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
🔹सकाळी ११ वाजता
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी मुंबादेवीचेही दर्शन घेतले.
🔹दुपारी १२ वाजता
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमानिमित्त ५ डिसेंबर रोजी वाहतुकीत मोठे बदल केले जाणार आहेत. गुरूवारी दुपारी १२ वाजल्यापासून हा कार्यक्रम संपेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. आझाद मैदान परिसरात पार्किंगची व्यवस्था उपलब्ध नसल्याने शपथविधीसाठी येणाऱ्यांनी लोकलचा वापर करावा, असे मुंबई वाहतूक पोलिसांनी सांगितले.
🔹दुपारी १२.३० वाजता
येत्या ११ डिसेंबर रोजी फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सांगितले जात आहे. या मंत्रिमंडळ विस्तारावेळी ३३ जणांचा शपथविधी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
🔹दुपारी १ वाजता
आज मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्यानंतर मंत्रालयात पहिली मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
🔹दुपारी २ वाजता
शिवसेना नेते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. आमदारांनी आग्रह धरल्यानंतर एकनाथ शिंदे शपथ घेण्यासाठी तयार झाले. यानंतर राजभवनात राज्यपालांना एक पत्रक पाठवण्यात आले.