मुंबई, पुण्यासह अख्खा महाराष्ट्र गारठला, शनिवारपासून ‘या’ जिल्ह्यात पाऊस; हवामान खात्याचा मोठा अंदाज
तसेच येत्या काही दिवसांनी राज्यातील तापमानात आणखी घट होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या मुंबई, पुणे, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्र गारठल्याची स्थिती पाहायला मिळत आहे.
राज्यात पुन्हा थंडीचा जोर वाढू लागला आहे. महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यातील किमान तापमानात घट झाली आहे. वाऱ्याची चक्राकार दिशा आणि अरबी समुद्रात आर्द्रता यामुळे बहुतांश ठिकाणी किमान तापमानत घट झाली आहे. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जिल्ह्यात किमान तापमानात घट होताना दिसत आहे. तसेच येत्या काही दिवसांनी राज्यातील तापमानात आणखी घट होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या मुंबई, पुणे, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्र गारठल्याची स्थिती पाहायला मिळत आहे.
मुंबईत थंडीची तीव्रता वाढली, सर्वत्र धुक्याची चादर
मुंबईत काल रात्री तापमानाचा पारा 19 अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील दादर, परळ, लालबाग यांसारख्या ठिकाणी 18-19 अंश इतके तापमान नोंदवण्यात आले. तर मुंबई उपनगरात अंधेरी, घाटकोपर या भागात तापमानाचा पारा 16-17 अंशापर्यंत घसरला होता. तर मालाड, कांदिवली, गोरेगाव, बोरिवली, मुलूंड, ठाणे या भागात 15-16 अंश कमी तापमानाची नोंद करण्यात आली. मुंबईतील थंडीची तीव्रता पुढील दोन दिवस कायम राहणार आहे. सध्या मुंबईत सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे. मुंबईतील दृष्यमानताही कमी झाली आहे.
उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा परतला आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आला आहे. राज्याच्या किमान तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याचा अंदाज असल्याने थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मध्य महाराष्ट्र आणि परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली आहे. तर आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. पश्चिमी चक्रवातामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये हलक्या पावसासह हिमालय लगतच्या भागात हिमवृष्टी सुरूच आहे.
तर दुसरीकडे उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी झाला आहे. स्वच्छ आकाशामुळे सूर्यप्रकाश जमिनीवर येत असल्याने उन्हाचा चटका कायम आहे. पुण्यातील कमाल तापमान ३० ते ३४ अंशांच्या दरम्यान आहे. तर किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या आसपास असल्याने थंडीचा कडाका कमी जास्त होताना दिसत आहे. आज राज्याच्या किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याचा अंदाज आहे. राज्यात गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
जळगावात पुन्हा पावसाचा अंदाज
जळगाव जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असून, पारा ८ अंशापर्यंत खाली आला आहे. मंगळवारी जळगाव शहराचे तापमान ८.२ अंश इतके नोंदले गेले. भारतीय हवामान खाते व ममुराबाद वेधशाळेकडे ही नोंद करण्यात आली आहे. आगामी दोन दिवस थंडीचा जोर वाढणार असला तरी येत्या ११ जानेवारीपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे.
जळगाव जिल्ह्यातील वातावरणाची स्थिती पाहिली तर ढगाळ वातावरण व त्यानंतर पुन्हा थंडी अशी स्थिती राहिली आहे. हवामानातील बदलामुळे रब्बी पिकांवर परिणाम होत आहे. एकीकडे थंडीच्या कडाक्यानंतर पुन्हा निर्माण होणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे गहू, हरभरा, मका या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होत आहे. गव्हाच्या वाढीवर परिणाम होत आहे. ज्वारी, दादरवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. जर पूर्ण हंगामभर हेच वातावरण राहिले तर रब्बी हंगामाला मोठा फटका बसण्याचा अंदाज आहे.
जालन्यात मोसंबीची मागणी घसरली
उत्तर भारतात वाढलेली थंडी आणि मोसंबीचे घसरलेले भाव पाहता मागील एक आठवडा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मोसंबी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र कालपासून दरवाढीच्या आशेवर मोसंबीची बाजारपेठ खुली झाली आहे. परंतु मोसंबीचे दर हे 8 ते 10 रुपयांपेक्षा जास्त नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. महिनाभरापूर्वी जालन्याच्या मोसंबी मार्केटमध्ये 35 ते 40 रुपये दराने विकत होती. मात्र उत्तर भारतात वाढलेली थंडी त्यामुळे मोसंबीची मागणी कमी झाली आणि दिल्लीतील व्यापाऱ्यांनी मागील आठ दिवस खरेदी बंद केल्यामुळे मोसंबी सद्यस्थितीला कवडीमोल भावात विकत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. दरम्यान संक्रातीनंतर तरी मोसंबीचे भाव वाढणार का?ही अशा शेतकऱ्यांना लागली आहे.