Devendra Fadnavis | संभाजी भिडे यांचं महात्मा गांधीबाबत वादग्रस्त वक्तव्य, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
Devendra Fadnavis On Sambhaji Bhide | संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.
मुंबई | संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वातावरण चांगलंच पेटलंय. राज्यात ठिकठिकाणी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. काँग्रेसकडून राज्यात आंदोलन करण्यात येत आहेत. या वक्तव्याविरोधात अमरावतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजी भिडे यांनी केलेल्या या वक्तव्याचं राज्यातील अनेक नेत्यांकडून निषेध करण्यात येत आहे. संभाजी भिडे यांनी वारंवार असे वादग्रस्त वक्तव्य करु नयेत, अशा प्रतिक्रियाही समोर येत आहेत. आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनीही इतर नेत्यांप्रमाणे संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचं निषेध करत आपली पहिली प्रतिक्रिया मांडली आहे. तसेच महापुरुषांविरोधात कुणीही वक्तव्य करु नये, असंही फडणवीस यांनी म्हटलं.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“संभाजी भिडे गुरुजींनी जे वक्तव्य केलंय त्याचं मी पूर्णपणे निषेध करतो. महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये महात्मा गांधी याच्यांकडे महानायक म्हणून पाहिलं जातं. महानायकाबाबत असं अनुचित वक्तव्य करणं चुकीचं आहे. माझं स्पष्ट मत आहे की अशा प्रकारचं वक्तव्य हे भिडे गुरुजी आणि कुणीही करु नये”, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं.
“अशा वक्तव्यांमुळे लोकांमध्ये संताप निर्माण होतो. लोकं महात्मा गांधी यांच्याबाबत बोललेलं कधीही सहन करणार नाहीत. याबाबत जी कारवाई करायची असेल ती राज्य सरकार करेल. महात्मा गांधी असोत किंवा स्वातंत्र्य सावरकर असोत, कुणाच्या विरोधात बोललेलं खपवून घेणार नाहीत”, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
“संभाजी भिडे गुरुजींचा भाजपशी काहीही संबंध नाही. ते त्यांची स्वत:ची संघटना चालवतात. याला जाणीवपूर्वक राजकीय रंग देऊ नये. राजकीय रंग देण्याचं काहीही कारण नाही. तसेच जसं आता काँग्रेसची लोकं या वक्तव्याचा निषेध करत रस्त्यावर उतरतायेत, तसंच जेव्हा राहुल गांधी स्वातंत्र्य सावरकर यांच्याबाबत अतिशय गलिच्छ बोलतात तेव्हा त्याचाही निषेध त्यांनी केला पाहिजे. मात्र ते त्यावेळेस मिंधे होतात” असं म्हणत फडणवीस यांनी काँग्रेसला सुनावलं.