BIG BREAKING | एकटे अजित पवार नाही, तर राष्ट्रवादीचे तीन बडे नेते दिल्लीत दाखल, मोठ्या हालचाली
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता दिल्लीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्रात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपाचा तिढा सुटला नसल्याने आता दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता दिल्लीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्रात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपाचा तिढा सुटला नसल्याने आता दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार दिल्लीला रवाना झाल्याची बातमी समोर आली होती. अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल हे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आलेली. पण अजित पवार दिल्ली विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांच्यासोबत मंत्री हसन मुश्रीफ हे देखील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दिल्लीतल्या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे तब्बल तीन नेते दिल्लीत दाखल झाले आहेत, अशी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हे तीनही नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी जाण्याची शक्यता आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास शिंदे गटाचा विरोध आहे. तसेच आमदार भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांच्या मंत्रिपदावरुन पेच निर्माण झालेला आहे. हाच पेच सोडवण्यासाठी अजित पवार आपल्या पक्षाच्या दोन नेत्यांसह दिल्लीत दाखल झाले आहेत. अजित पवार दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
शिंदे-फडणवीस दिल्लीला जाणार?
अजित पवार एकीकडे दिल्लीत दाखल झालेले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईत आहेत. दोन्ही नेते सह्याद्री अतिथीगृहावर बैठकांमध्ये व्यस्त असल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार दिल्लीला रवाना झाल्यानंतर शिंदे आणि फडणवीस हे सुद्धा दिल्लीत बैठकीसाठी जातील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. पण अद्याप तरी तशा घडामोडी घडलेल्या दिसत नाहीत. शिंदे-फडणवीस हे सध्या तरी मुंबईत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
‘उद्या-परवा मंत्रिमंडळ विस्तार होणार’, प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया
दरम्यान, दिल्लीत दाखल झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सामील झाल्यापासून दिल्लीत अजित पवार, माझी आणि भाजपचे पक्षश्रेष्ठी यांच्यासोबत आमची भेट झालेली नव्हती. त्यामुळे आज एक औपचारिक भेट होणार आहे”, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आमच्यात कुठलाही वाद नाही. जवळपास सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आहेत. आजच्या भेटीत मंत्रिमंडळ आणि खातेवाटपाचे विषय चर्चेत येणार नाहीत. आम्हीसुद्धा टीव्ही पाहतोय. जे टीव्हीवर चाललंय तसं वास्तव्यात नाही, अशी प्रतिक्रिया पटेल यांनी दिली.
“काही खाते भाजप आणि शिवसेनेकडे आहेत. याबाबत चर्चा सुरु आहे. याबाबत काल रात्री सखोल चर्चा झाली आहे. याबाबत कोणताही वाद नाही. उद्या किंवा परवा तुम्हाला खातेवाटप झालेलं दिसेल”, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. तसेच मंत्री हसन मुश्रीफ हे त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्ताने दिल्लीत आले आहेत. ते आमच्यासोबत कुठेही येणार नाहीत, असंही पटेल यांनी यावेळी स्पष्ट केलं.