Maharashtra Din 2023 : मुंबई, महाराष्ट्रासाठी एकाच दिवशी 15 हुतात्मे झाले, यांची नावे सुवर्णाक्षरांनी कोरली गेली
21 डिसेंबरला सर्व भाषिक कामगारांनीं एकजुटीने संप केला. पुन्हा कायदेमंडळावर निदर्शन केले. ह्या दिवशी मुंबईचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी मुंबईत लष्करी कायदा पुकारण्याच्या तयारीने सकाळपासूनच गोळीबाराला सुरवात केली.
मुंबई : 10 ऑक्टोबर 1956 ला राज्य पुनर्रचना कमिशनच्या शिफारशी जाहीर झाल्या. त्यात भारतातील सर्व भाषिकांची पुनर्रचनेची मागणी मान्य करण्यात आली. फक्त, महाराष्ट्र दुभंगलेला ठेऊन विदर्भ सोडून उरलेला महाराष्ट्र गुजरातला जोडण्याची तत्त्वशून्य अशी शिफारस करण्यात आली. महाराष्ट्रातील व्यक्तींनी संयम न सोडता शांत पण तीव्रपणे ह्या शिफारशींचा धिक्कार केला. तरीही मुंबई कायदेमंडळांत बहुमताच्या जोरावर त्या मान्य करून घेण्याचा घाट घालण्यात आला. याविरोधात महाराष्ट्राच्या जनतेने 18 डिसेंबर 1956 रोजी निर्दर्शने केली. या निदर्शनाचे नेतृत्व वयोवृद्ध नेते सेनापती बापट यांनी केले होते.
सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणाऱ्या इतर निदर्शकांना अटक करण्यात आली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी संपूर्ण जनमत एकवटले होते. पण त्याची पर्वा न करता त्या जनमताला पायदळी तुडवण्याचे आणि साडे तीन कोटी महाराष्ट्रीय जनतेच्या भावनांना आव्हान देऊन प्रक्षोभ निर्माण करण्याचे धोरण भारत सरकारने आणि तत्कालीन मुंबई सरकारने सुरवातीपासूनच अवलंबिले होते. त्यामुळेच ह्या संपूर्णपणे अहिंसक अशा हजारो सत्याग्रही निदर्शकांवर पोलिसांनी लाठी हल्ले केले. अश्रू धुराचा मारा केला.
आपली योग्य मागणी दडपण्याची सरकार तयारी करीत आहे याचा थांगपत्ता नसलेल्या महाराष्ट्रीय जनतेला सरकारच्या या धोरणाचा सुगावा लागला. त्यानंतर 21 डिसेंबरला सर्व भाषिक कामगारांनीं एकजुटीने संप केला. पुन्हा कायदेमंडळावर निदर्शन केले. ह्या दिवशी मुंबईचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी मुंबईत लष्करी कायदा पुकारण्याच्या तयारीने सकाळपासूनच गोळीबाराला सुरवात केली.
कायदेमंडळ जवळचा हा सत्याग्रह सुरू होण्यापूर्वीच जमावाला झोडपून काढण्यास आणि त्यावर अश्रूधुराच्या नळकांडी आणि लाठी हल्ल्यात सुरुवात केली गेली. ह्यानंतर चिडलेल्या निदर्शकांनीं गोळ्यांचा वर्षाव करणाऱ्या पोलिसांना सळो की पळो करून सोडले.
मोरारजी यांच्या पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 15 हुतात्मे झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासात या 15 जणांची नावे सुवर्णाक्षरांनी कोरली गेली.
1) सिताराम बनाजी पवार : फणसवाडी येथे रहाणारा हा अवघ्या 16 वर्षाचा कोवळा मुलगा, फ्लोरा फाऊंटन येथील गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.
2) धर्माजी नागवेकर : कुंभारवाडा येथे राहणारे फ्लोरा फाऊंटन गोळीबारात मृत्यू
3) जोसेफ डेव्हिड पेजारेकर : जेकब सर्कल येथील महालक्ष्मी पुलावर रेल्वे पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात मृत्यू
4) चंद्रकांत लक्ष्मण : वय 25, फ्लोरा फाऊंटन गोळीबार
5) चिमणलाल डी. सेठ : वय 32, जन्मभूमी या दैनिकाचे वृत्तसंपादक, फ्लोरा फाऊंटन गोळीबार
6) के. जे. झेवियर
7) भास्कर नारायण : वय 20
8) पी. एस. जॉन
9) रामचंद्र सेवाराम हा विद्यार्थी होता.
10) शरद जी. वाणी : वय 20
11) शंकर खोटे : फोर्टमधील एल कंपनीमध्ये कर्मचारी होते.
12) बेदि सिंग
13) मीनाक्षी मोरेश्वर : वय वर्ष 11, सुपारीबाग रोडवर घरांतून निदर्शन घरातून पाहात असताना याला गोळी लागली आणि जागीच मृत्यू झाला
14) रामचंद्र भाठिया
15) गंगाराम गुणाजी : वय 23
21 डिसेंबरला इतका रक्तपात केल्यानंतर मुंबईच्या कायदे मंडळांतील चर्चा तहकूब करण्याचा निर्णय घेतला. या घटनेनंतरही जनता शांत होती. लाखोंच्या सभा, परिषदा होत होत्या. मोर्चे निघत होते. एकमुखाने, शांततेच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने न्याय्य व योग्य निकालाची मागणी करत होते. मुंबईकरांच्या या धैर्याला सलाम.