9 वर्षांचा बालक ते 60 वर्षाचा वृद्ध; संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील हुतात्म्यांचा थरारक अज्ञात इतिहास
21 डिसेंबर 1956 ला मुंबईचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी लष्करी कायदा पुकारला आणि त्याच दिवसापासून सुरवात झाली संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील हुतात्म्यांच्या थरारक इतिहासाला...
मुंबई : अंगणात खेळत असलेला 9 वर्षाचा सुभाष, जेवता जेवता बळी पडलेला 9 वर्षाचा महमद अली, दरवाजात उभा असताना खाली कोसळलेला 10 वर्षांचा विजय, 14 वर्षाचा करपय्या देवेंद्र आणि गोरखनाथ जगताप, 16 वर्षाचा एडविन साळवी, घरात गोळी लागून ठार झालेले घनशाम कोलार, खाटेवर बसून चुना खात असताना बळी पडलेले बालन्ना, घरात झोपलेले असताना गोळी लागून ठार झालेले रामचंद चौगुले, व्हरांड्यात झोपलेला शिवडीचा बाबा महादू सावंत… काय गुन्हा होता या बालकांचा आणि घरी असलेल्या वयोवृद्धांचा? तरीही तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई म्हणतात, ‘निष्पाप लोक मृत्युमुखी पडल्याचे आम्हाला माहित नाही’? संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हुतात्मा झालेल्यांची दखल त्याकाळच्या सरकारने घेतली तर नाहीच. पण, त्यानंतर आलेले सरकार यांनीही घेतली नाही. शासन दरबारी आजही त्यांची उपेक्षा होतेय.
10 ऑक्टोबर 1956… राज्य पुनर्रचना कमिशनने शिफारशी जाहीर केल्या. महाराष्ट्राचा विदर्भ प्रांत सोडून उरलेला महाराष्ट्र गुजरातला जोडण्याची शिफारस यात होती. महाराष्ट्राने त्याचा धिक्कार केला. सरकारने मुंबई कायदेमंडळांत बहुमताच्या जोरावर शिफारशी मान्य करण्याचे ठरवले. पण, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा ही मागणी घेऊन जनमत एकवटले. अहिंसक जनतेवर पोलिसांनी हिंसक बळाचा वापर केला. 21 डिसेंबर 1956 ला मुंबईचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी लष्करी कायदा पुकारला आणि त्याच दिवसापासून सुरवात झाली संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील हुतात्म्यांच्या थरारक इतिहासाला…
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील पहिला हुतात्मा सिताराम बनाजी पवार
21 डिसेंबर 1956 ला सकाळी अनेक कामगार कायदे मंडळावर धडकले. त्यांची निदर्शने सुरु होण्यापूर्वीच पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. जमावावर लाठीचार्ज केला. चिडलेल्या निदर्शकानी त्याला प्रत्युत्तर दिले. पोलिसांनी त्या निदर्शकांवर गोळ्या झाडल्या. फ्लोरा फाऊंटन येथे पोलिसांच्या गोळीबारात पहिला हुतात्मा झाला तो अवघ्या 16 वर्षाचा कोवळा मुलगा सिताराम बनाजी पवार. गिरगावच्या फणसवाडी येथे तो रहात होता.
फ्लोरा फाऊंटन येथे पोलिसांच्या अंदाधुंद गोळीबारात कुंभारवाडा येथे राहणारे धर्माजी नागवेकर हे दुसरे हुतात्मे झाले. त्यापाठोपाठ विद्यार्थी रामचंद्र सेवाराम, फोर्टमधील एल कंपनीचे कर्मचारी शंकर खोटे, भास्कर नारायण ( वय 20 ), शरद जी. वाणी ( वय 20 ), गंगाराम गुणाजी ( वय 23 ), चंद्रकांत लक्ष्मण ( वय 25), पी. एस. जॉन, के. जे. झेवियर, बेदी सिंग, रामचंद्र भाठिया हे या गोळीबारात मत्यूमुखी पडले. सुपारीबाग रोडवर घरांतून निदर्शन पाहात असताना अवघे 11 वर्ष वय असणारा मीनाक्षी मोरेश्वर हा ही गोळीबाराचा बळी ठरला. तर, या निदर्शनाचे वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेले जन्मभूमी दैनिकाचे वृत्तसंपादक चिमणलाल डी. सेठ ( वय 32) यांचाही पोलिसांच्या गोळीने वेध घेतला.
जोसेफ डेव्हिड पेजारेकर : फ्लोरा फाऊंटन येथे पोलिसांच्या गोळीबाराचे लोण हळूहळू मुंबईत पसरू लागले. महालक्ष्मी रेल्वे पुलावर रेल्वे पोलिसांनी गोळीबार केला यात जेकब सर्कल येथील जोसेफ डेव्हिड पेजारेकर याला गोळी लागून त्याचा मृत्यू झाला.
हजारो कामगार रस्त्यावर, सरकारचे प्रयत्न धुळीस मिळाले
21 डिसेंबर 1956 या एकाच दिवशी पोलिसांनी 15 जणांचे बळी घेतले. तरीही लाखोंच्या सभा होत होत्या. मोर्चे निघत होते. 16 जानेवारी 1956 रोजी मुंबई सरकारने संयुक्त महाराष्ट्राच्या पुढाऱ्यांची आणि 400 कार्यकर्त्यांची धरपकड केली. सरकारच्या दडपशाहीला न जुमानता घोषणा देत कामगार संपावर उतरले. दुपारपर्यंत 1 लाख 70 हजार गिरणी कामगार, 9 हजार रेशमी कामगार, 15 हजार रेल्वे कामगार आणि 5 हजार इंजिनिअर कामगार संपावर आले. यामुळे जनतेमध्ये दहशत पसरविण्याचे सरकारचे प्रयत्न धुळीस मिळाले.
हुतात्मा बंडू गोखले
तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी रात्री साडे आठ वाजता आकाशवाणीवरून मुंबई केंद्रशाषित ठेवण्याचा आणि बेळगाव – कारवार वगळून महाराष्ट्राची पुनर्रचना करण्याचा निर्णय जाहीर केला. जनतेच्या असंतोषात भर पडली. पंतप्रधान नेहरू यांचे भाषण संपले. ठाकूरद्वार येथे संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत जमाव जमला. याचवेळी पोलिसांची एक गाडी बेफाम गोळ्या झाडत आली. यात मुगभाटमधील 20 वर्षांचा विद्यार्थी गजानन उर्फ बंडू गोखले छातीच्या उजव्या बाजूला गोळी लागून खाली कोसळला. रात्री दीड वाजता जी. टी. हॉस्पिटलमध्ये त्याची प्राणज्योत मावळली.
बंडू गोखले पाप्युलर नाईट हायस्कूलमध्ये शिकत होता. रात्री मॅट्रिकचा अभ्यास तर दिवसा नोकरी करून तो आपल्या दोन लहान भावंडांचे पालन करत होता. बंडू गोखलेच्या प्रेतयात्रेस सरकारने परवानगी नाकारली. 600 पोलिस आणि होमगार्डसचा पहारा बसविला. रस्त्यातून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांवर पोलिसांच्या काठ्या बरसत होत्या. कॉरोनरची चौकशी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता गोकुळदास तेजपाळ इस्पितळात त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात मिळाला. पोलिसांच्या नियंत्रणाखाली निघालेल्या प्रेतयात्रेला सुमारे हजार माणसे हजर होती.
16 जानेवारीला पोलिसांच्या गोळीबारात गिरगावमधील सरकारी तबेल्याजवळ घराच्या पुढल्या गॅलरीत उभ्या असलेल्या वृद्ध रुखमिणीबाई साळवी आणि त्यांचा मुलगा जखमी झाले. तर, पहिल्या मजल्यावरील चव्हाण यांच्या घरातील वृद्ध स्त्रीच्या पोटरीस गोळी लागली. बर्वे नावाच्या छोट्या मुलाच्या पायाला गोळी लागून तो जखमी झाला. एकूण 8 नागरिक या गोळीबारांत जखमी झाले होते.
दडपशाहीची चक्रे वेगाने फिरली, निवृत्ती मोरे आणखी एक बळी
बंडू गोखले यांच्या मृत्यूमुळे जनता संतापली. हजारो लोक ‘काळे बॅजेस’ लावून रस्त्यावर फिरू लागले. मांगलवाडीत पोलिसानी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. ऑर्थर रोड, चिंचपोकळी येथे बंदुकीच्या गोळ्यांच्या आठ फैरी तर भायखळा आणि आग्रीपाडा येथे चौदा फैरी झाडल्या. त्यात चार माणसे जखमी झाली. तर, भायखळा येथे एका कामगाराचा बळी घेऊन हा दिवस संपला. भायखळा डिलाईल रोड येथे कुशाबा काळे यांच्या चाळीच्या दरवाजा शेजारी निवृत्ती विठोबा मोरे छातीत गोळी लागून ठार झाले. सिंप्लेक्स मिलमध्ये ते कामगार होते. 27 वर्षाचे निवृत्ती मोरे हे तरुण आणि उंचेपुरे पहिलवान होते. त्यांचे नुकतेच लग्न झाले होते.
बेळगावचा निधड्या छातीचा कॉ. मारुती बेन्नाळकर
17 जानेवारीपासून बेळगांव – कारवार महाराष्ट्रात सामील न करण्याच्या घोषणेचा निषेध सुरु झाला. त्यावेळीही पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये कॉ. मारुती बेन्नाळकर, मधुकर बापू बांदेकर, लक्ष्मण गोविंद गावडे माणि महादेव बारीगडी या चार जणांचा बळी गेला.
कॉ. मारुती बेन्नाळकर : गडगडा विहिरीजवळ सायंकाळी निदर्शने सुरू होती. चिडलेल्या पोलिसांनी बंदुका रोखल्या होत्या. त्याचवेळीं कंग्राळीचा पैलवान कॉ. मारुती बेन्नाळकर हा ‘चालवा तुमच्या गोळ्या ‘ असे आव्हान देत समोर आला. बाटाच्या दुकानापुढे उभ्या असलेल्या बेन्नाळकर याचे आव्हान पाहून पोलिसांनी गोळ्या झाडल्या. त्यातील एका गोळीने बेन्नाळकर याच्या छातीचा वेध घेतला. मारुतीच्या जखमेतून रक्ताच्या नळकांडया उडत होत्या. त्याला उचलण्यासाठीं लोक पुढे आले. पोलिसांनी संगिनीच्या धाक दाखवला. पण, लोकांनी जुमानले नाही. एकाने पुढे होऊन मारुतीला पाणी पाजले. परंतु, काही वेळातच त्याने प्राण सोडले. 24 वर्षांचा कम्युनिस्ट पार्टीचा हा कार्यकर्ता लोकांचा आवडता होता. कॉ. मारुती बेन्नाळकर यांच्या पश्चात वृद्ध वडील, 2 भावंडे, पत्नी आणि 3 महिन्याची मुलगी होती.
हुतात्मा मधू बापू बांदेकर : मंगळवारचा दुपारचा सिनेमा पहाण्यासाठी शहापूरहून मधू बांदेकर बेळगांवला आला होता. पण, हरताळ असल्यामुळे मित्र मंडोळकर याच्यासोबत अनसूरकर गल्लीत गप्पा मारत बसला होता. ‘पोलिस आले’ अशी हाक त्यांच्या कानावर पडली. ते पुढे आले काही कळण्याआधीच पोलिसांच्या गोळीने बापूच्या छातीचा वेध घेतला. कुणीतरी उचलून फेकावे अशा रीतीने तो 10 ते 12 फूटांवर जाऊन कोसळला. मधू याच्या जखमेतून रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. नंदकुमार शर्मा यांच्या घरांसमोर तो पडला होता. आवाज ऐकून शर्मा बाहेर आले. त्यांनी तडफडत असलेल्या बापूला उचलून समोर कट्टयावर ठेवले. घरातून पाणी आणून त्याच्या तोंडांत घातले. पण, पाणी पोटांत न जाता छातीस पडलेल्या जखमेतून बाहेर आले आणि क्षणार्धात् बापू याचे प्राण गेले. त्याचा मित्र म्हात्रु मंडोलकर याच्याही पायाला गोळी लागली होती. त्याचाही पाय कापावा लागला त्यामुळे तो जन्माचा पंगू बनला.
आत्माराम पुरुषोत्तम पालवणकर : 18 जानेवारीचा मुंबईतील हरताळ शंभर टक्के यशस्वी झाला. मुंबईच्या सर्व गिरण्या, कारखाने, वर्कशॉप, गोद्या, शाळा, कॉलेजे बंद होतीं. पोलिसांची मजल खालच्या थराला गेली होती. 19 वर्षाचा आत्माराम दादर येथे पालनजी सोजपाल चाळीत एका मित्राला भेटायला गेला होता. परत येत असताना चाळीसमोरच त्याच्या छातीत आणि पोटात अशा दोन गोळ्या लागल्या. सायन हॉस्पिटलमध्ये 5 तासांनी त्यांचे देहावसान झाले. मॅट्रिकपर्यंत शिक्षण झालेला आत्माराम पालवणकर हा भारत मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये टर्नरफिटर म्हणून नुकताच नोकरीला लागला होता. त्याच्या पश्चात डॉ. क्षिरसागर यांच्या दवाखान्यांत कंपाउंडर म्हणून पार्ट टाईम नोकरी करणारे वडील, 2 बहिणी, 1 लहान भाऊ असा परिवार होता.
नरेंद्र नारायण उर्फ पप्पु प्रधान : दादर पोर्तुगीजचर्च शेजारी रहाणारा 19 वर्षाचा नरेंद्र नुकताच मॅट्रिक परीक्षा पास झाला होता. हिंदुस्थान कन्स्ट्रक्शनमध्ये त्याला नोकरी लागली होती. 19 जानेवारी दुपारी पाहुण्यांना पोहोचवायला दादर स्टेशनवर गेला. परत येत असताना पोलिसांच्या गोळीने त्याच्या मेंदूचा वेध घेतला. त्याचा जागीच मृत्यू झाला.
बालण्णा मुनण्णा कामाठी : 25 वर्षांचा हा तरुण कामगार दादरच्या के.एस.ए. बिल्डिंगजवळ तंबाबू खात बसला होत. एक गोळी आली आणि त्याच्या डोक्यांतून आरपार गेली. बालण्णा मरून पडला तेव्हा त्याच्या एका हातांत तंबाखू अन् दुसऱ्या हातांत चुना तसाच होता.
शंकर गोपाळ कुटे : हरी महादेव वैद्य या सोन्याचांदीच्या दुकानांत हे कामाला होते. 18 तारखेला झालेल्या गोळीबारात गोळी लागून दुकानाजवळच मरण पावले.
धोंडू लक्ष्मण पारडुले : दादरच्या भवानी शंकर रोड क्रॉसलेन मधून जात असताना बंदुकीची गोळी त्यांच्या डोक्यांत शिरली. ते कारखान्यात मजुरी करत होते. त्यांना टॅक्सीत घालून दादरच्या विजयनगरकडे शुश्रूषा पथकाचे दोन स्वयंसेवक एस. आर. म्हात्रे आणि व्ही. डी. इंदूलकर घेऊन जात होते. रस्त्यावरील पोलिसांनी त्यांची गाडी अडवून स्वयंसेवकांना बेदम चोपले. त्यांना अटक करून दादर पोलीस चौकीत नेले. तोपर्यंत धोंडू यांचा प्राण गेला होता.
दत्ताराम कृष्णा सावंत : अवघ्या 14 वर्ष वय असेलला दामोदर हा रणजित मुव्हिटोनच्या बाजूला महमद सुलेमान वाडीत रहात होता. संध्याकाळी शिंदेवाडी नं. २ येथे नातेवाईकांना भेटून जिन्यावरून खाली येत असतानाचा दोन गोळ्या त्याच्या पायात घुसल्या. रक्त जास्त प्रमाणात गेल्याने त्याचा मृत्यू झाला.
18 जानेवारीचा कहर; लालबाग, काळाचौकी येथे तीन तास गोळीबार
18 जानेवारीच्या रात्री लालबागच्या सुपारीबाग रोडवरील तेजुकाया, हाजी कासम आणि कोंबडेगल्ली येथे पोलिसांनी रात्री 10 वाजता गोळीबार सुरु केला. तीन तासाच्या गोळीबारात तासाला सुमारे 92 गोळ्या झाडल्या गेल्या. तरीही घराघरातून संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा उठतच होत्या.
बबन बापू भरगुडे : विक्रोळीच्या आशा सिल्क मिलमध्ये कामाला होता. रात्री काम संपवून साडेबाराच्या सुमारास घरी परत येत होता. तेजुकाया कंपाऊंडजवळ तो आला असता एका गोळी लागून तो जागच्या जागी ठार झाला. त्याच्यामागे पत्नी, सह महिन्यांचा मुलगा, म्हातारे वडील असा परिवार होता.
यशवंत बाबाजी भगत : सुपारीबाग रोडवरील वीर महाल बिल्डींगचे भाडे वसूल करण्याचे काम भगत करत असत. रात्री साडे अकरा वाजता पाण्याच्या टाकीतील वाहणारे पाणी बंद करण्यासाठी गच्चीवर गेले असता पोटांतून एक गोळी आरपार गेली आणि जागच्या जागी मरण पावले.
विष्णू सखाराम बाणे : 19 वर्षाचा तरुण कामगार युनियन मिलमध्ये कामगार होत. पेरु चाळ कंपाउंडमध्ये रात्री 9 च्या सुमारास गोळी लागून मरण पावला. नाकांतून शिरलेली गोळी त्याच्या डोक्यांतून बाहेर पडली. आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे प्रेत 4 दिवसानंतर नातेवाईकांना मिळाले.
गोविंद बाबूराव जोगल : हा पूर्वी राष्ट्र सेवादलाचा कार्यकर्ता होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा प्रमुख कार्यकर्ता. परळच्या भारत इलेक्ट्रिक स्टोअर्स येथे अॅप्रेटिंस म्हणून काम करत होता. परळ नाक्यावर सकाळी 10 वाजता माने याला गोळी लागली. जखमी स्थितीत अर्धा तास तो रस्त्यावर पडून होता. गोळीबार थांबल्यानंतर त्याला केइएम मध्ये नेले पण, दुपारी 4 वाजता त्याचे निधन झाले. दुसऱ्या दिवशीं रात्री 9 वाजता त्याचे प्रेत नातेवाईकांना दिले गेले.
तुकाराम धोंडु शिंदे : हा कामगार लॅबोरेटरीमध्ये कामाला होता. 18 तारखेला दुपारी कामाला जायला निघाले असता परळ नाक्यावर अश्रुधुराच्या माऱ्यात सापडला. गॅसबॉम्ब इतका जवळ पडला की गुदमरून दोन पिवळ्या उलट्या होऊन त्याचे प्राण गेले. त्याच्यामागे पत्नी, 2 मुले होती.
पांडुरंग बाबाजी जाधव : 7 वर्षांचा असल्यापासून एल्फिन्स्टन ब्रिजजवळील साबुवाला चाळीत मामाकडे रहात होता. भांडुप सिल्क फॅक्टरीत कामगार होता. त्यापूर्वी एल्फिन्स्टन मिलमध्ये 4 वर्षे फिटर म्हणून काम केले होते. रात्री 9 वाजता विडी आणण्यास गेला असता रेल्वे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पोटात गोळी लागली आणि मरण पावला.
सीताराम धोंडू राडे : वय वर्षे 18. हे रेल्वे कँटीनमध्ये नोकरीला होते. डोक्यावर गोळी लागून जागच्या जागी ठार झाले.
भाऊ सखाराम कदम : 23 वर्षाचे कदम कृष्णनगरमध्ये मामाच्या घरी रहात होते. कृष्णनगरमध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चाळीच्या आवारात उभे असलेल्या कदम यांच्या डाव्या हाताच्या दंडांतून गोळी बरगड्यांमध्ये शिरली. त्यांनी जागीच प्राण सोडला. त्यांचेही शव केईएम् हॉस्पिटलमधून 4 दिवसांनी मिळाले. आगासवाडी आणि स्वान मिलमध्ये ते बदली कामगार होते.
पांडूरंग धोंडू धाडवे : 20 वर्षाचा हा तरुण युनिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये कामाला होता. काकांच्या घरी रहात असे. दुपारी कामावर जात असताना काळाचौकीजवळ धावत्या लॉरीतून झाडलेली गोळी त्याच्या छातीत शिरली.
विठ्ठल गंगाराम मोरे : कामावरून उमरखाडी येथील घरी जात असताना रस्त्यात गोळी लागून मरण पावले. हे गरीब होते. हे बाँबे पोर्ट ट्रस्टमध्ये कामाला होते.
गोपाळ चिमाजी कोरडे : 55 वर्षाचे कोरडे इंडिया युनायटेड मि. नं. 3 मध्ये कामाला होते. बदक चाळीत पोलिसांनी गोळीबार केला. त्यात जखमी झालेल्यांना गाडीतून हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. हॉस्पीटलमध्ये पोहोचवून परत येणाऱ्या गाडीवर पोलिसांनी पुन्हा गोळीबार केला त्यात गोपाळ कोरडे यांचा बळी गेला.
रामा लखन विंदा : परेल टैंक रोडवरील म्युनिसिपल स्कूल रोडवर गोळी लागून जागच्या जागी मरण पावले. परळ येथील गोलंदजी हिल रोडवरील वागेश्वरी चाळ येथे ते रहात होते. तर, इंडिया युनायटेड मि. नं. २ मध्ये रिंग खात्यात कामाला होते.
एडवीन आमरोज साळवी : केशरबाग फुटपाथवर उभा राहून मुलांबरोबर खेळत असताना लॉरीतून केलेल्या गोळीबारात हा सोळा वर्षाचा विद्यार्थी छातीमध्ये गोळी लागून मरण पावला. शिरोडकर हायस्कूलमध्ये तो नववीत शिकत होता. 48 तासानंतर त्याचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले गेले.
बाबू हरू दाते : 20 वर्षाचा तरुण रत्नागिरी जिल्ह्यातील दोडवन गावांतून कामासाठी मुंबईला आला होता. पण, पोलिसांच्या बेछूट गोळीबारात दादर येथे व्हीन्सेंट रोडवरीले पेट्रोल पंपासमोर त्याचा बळी गेला.
बाबा महादू सावंत ( वय 25 ) : शिवडीच्या म्युनिसिपल बॅरॅकमध्ये राहणारे सावंत दाणे बंदरांत कामगार होते. दोन वर्षापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. घरातील व्हरांड्यात झोपले असताना गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला.
अनुप महावीर : हे चिंचपोकळीच्या इंडिया स्टैंडर्ड मेटल कंपनीत कामाला होते. हॉटेलामधून चहा पिऊन परत येत असताना शिवडी नाक्यावर मागच्या मेंदूला गोळी लागून जागच्या जागीं ठार झाले. त्यांना 4 मुळे, पत्नी आणि 1 भाऊ होता.
वसंत द्वारकानाथ कन्याळकर : केळेवाडीमधील दीनानाथ प्रसाद वागळे बिल्डींगच्या तळ मजल्यावर रहाणारे कन्याळकर बुधवार 18 जानेवारी रोजी अडीच ते तीनच्या सुमारास गोळी लागून मरण पावले. ते होजीयारीचा धंदा करत होते. कपडे विक्री करत असताना त्यांच्या तोंडावर आणि उजव्या गालावर गोळ्या लागल्या. यात त्यांचा अंत झाला.
सिताराम गणपत म्हादे (वय 18) : कुंभारवाडा येथील दुर्गादेवी हुतुतू संघांतील एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून नाव कमवले होते. कुटुंबांत वृद्ध आईवडील व 5 बहिणी एवढी माणसे आहेत. हातातोंडाशी आलेला मुलगा म्हणून कुटुंबाच्या आशा यांच्यावर होत्या. तोच 18 जानेवारी हा काळ दिवस उजाडला आणि त्यांचा लाडका सिताराम कुंभारवाड्यांत सायं- काळी झालेल्या गोळीबारांत जायबंदी झाला. त्यांना ताबडतोब हॉस्पिटलांत हलविण्यांत आले व मानेंत गोळीं घुसलेली असल्यामुळे ते कदाचित् हातीं लागतील अशी आशा वाटत होती, परंतु ता. २४ रोजी सायंकाळी ५ वा. त्यांचा अंत झाला.
रामनाथ पांडुरंग अमृते : डॉ. व्हीगस स्ट्रीट वरील कावेल क्रॉस लेन नं. १० मध्ये राहणारे अमृते सोनार काम करत असत. 19 जानेवारी सायंकाळी पाच वाजता कामावरून घरी जात असताना कानाच्या मागे एक गोळी घुसली. ती थेट मेंदूत शिरली आणि तेथल्या तेथे ते गतप्राण झाले. त्यांची बायको आणि चार मुले निराधार झाली.
विनायक पांचाळ (मिस्त्री) (वय 18 ) : हा तरुण सुतारकाम करत असे. गिरगावरोडला सरकारी तबेल्याजवळ रहात होता. पोलिसांनी दुपरी केलेल्या गोळीबारात तो बळी पडला. घरात कमवणार तो एकुलता होता.
विठ्ठल दौलत साळुंके (वय 22) : वागळे प्रेसमध्ये कामाला होते. काम संपवून मरीन लाईन्स येथे भावाला भेटून गिरगावात घरी चालले होते. साडे पाच वाजले होते. कुठून एक गोळी आली आणि त्यांच्या वेध घेऊन गेली. ते जागच्या जागी ठार झाले.
9 वर्षाच्या मुलाच्या मृत्यूची हृदयद्रावक कहाणी
दादरच्या भवानीशंकर भागाचा कारभार होमगार्डच्या ताब्यात देण्यात आला होता. रस्त्यावर शांतता होती. पण, कुंभारवाडा म्युनिसिपल शाळेजवळ होमगार्डने बेछूट गोळीबार केला. यामध्ये चाळीमागे खेळत असलेल्या 9 वर्षांच्या सुभाषचा बळी घेतला.
सुभाष भिवा बोरकर : भवानीशंकर रोड क्रॉस लेनमध्ये पत्र्याच्या चाळीत सुभाष याचे आजोबा देवजी हरि मोरे रहात होते. म्युनिसिपल शाळेच्या आवारातून एका होमगार्डने चाळीच्या रोखाने बंदूक उडवली. शाळेपासून ही चाळ दोनशे यार्ड अंतरावर आहे. मध्ये एक बोळ आहे. त्या बोळातून वेगाने आलेली गोळी घरात शिरली. मोरीशेजारी देवजी उभे होते. त्यांच्या डाव्या हाताला भोक पाडून ही गोळी समोरच्या पत्र्याच्या भिंतीत घुसली. गोळीने मोठा भोक पाडून बाहेर खाटेवर बसलेले देवजी यांच्या चिरंजीवाच्या मांडीखालून लाकूड कापून समोर खेळत असलेल्या सुभाषच्या पोटात शिरली. नऊ वर्षाचा सुभाष जागीच गतप्राण झाला.
परशुराम अंबाजी देसाई ( वय 20 ) : फिन्ले मिलमध्ये गेली कामगार होते. मावस भावासोबत रहात होते. सकाळी 11 वाजता तावऱ्याच्या पाड्यावर गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला.
घनशाम बाबू कोलार (वय 20) : हे युनियन मिलमध्ये फोल्डिंग खात्यात कामाला होते. मेघवाडी डी ब्लॉकमधील रहात्या घरी त्यांना गोळी लागली. चाळीच्या आत रस्त्यापासून सुमारे 60 फूट अंतरावर गोळी घुसली आणि तिने घनशाम यांचा प्राण घेतला.
गोरखनाथ रावजी जगताप : वरळी बी.डी.डी. चाळ नं. 85 मध्ये रहाणारा 14 वर्षाचा गोरखनाथ 102 नंबर चाळीजवळ छातीत गोळी लागून मृत्युमुखी पडला. त्याची आई केळी विकण्याचा धंदा करत होती. आईला जेवण पोहोचवून तिच्याजवळील केळी घेऊन तो घरी निघाला होता.
गणपत रामा तानकर (वय 27) : इंडिया युनायटेड नं. 4 मध्ये बायडिंग खात्यांत कामगार होते. सकाळी 9 वाजता चिंचपोकळी पुलाजवळील वेल्फेअर सेंटरजवळ झालेल्या गोळीबारांत मरण पावले. दंडांतून घुसलेली गोळी त्यांच्या छातीत घुसली. आर्थर रोडवरील साठे बिल्डींगमध्ये ते रहात होते.
धोंडू रामकृष्ण सुतार (वय 45) : डिलाईल रोडचे रहिवाशी सुतार यांचे वरळीच्या बी.डी.डी. चाळीत काम सुरु होते. सकाळी 9 च्या सुमारास रस्त्यावर काहीही गडबड नव्हती. त्यामुळे ते वरळीला जाण्यास निघाले. एकाएकी गोळीबार सुरू झाला. एका गोळी त्यांच्या मानेत घुसली आणि ते जागीच ठार झाले. जनतेमध्ये दहशत बसण्याच्या हेतूने त्यांचे प्रेत युनियन मिलसमोर सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत मुद्दाम टाकले होते. प्रेत उचलण्यासाठी पुढे येणाऱ्यांवरही गोळी घातली जात होती.
सीताराम गयादीन (वय 30) : डिलाईल रोडवरील 26 नंबरच्या बी. डी. डी. चाळीत राहाणारा हा भय्या कामगार. 19 तारखेला निष्कारण करण्यात आलेल्या गोळीबारात जबरदस्त जखमी झाला. पोद्दार हॉस्पिटलमध्ये त्याला नेण्यात आले पण तिथे तो मरण पावला. श्रीनिवास मिलमध्ये त्रासन खात्यात तो कामाला होता.
मुनीमजी बलदेव पांडे : बी.डी.डी. चाळ नं. 93 मध्ये यांचे दुधाचे दुकान होते. नाक्यावर गोळीबार सुरु होताच ते दुकानाबाहेर आले. लोकांना, ‘आत जा. बाहेर येऊ नका. पोलिस गोळीबार करीत आहेत.’ असे सांगत होते. त्याचवेळीं दोन चाळीच्या गल्लीत पोलिसांनी गोळीबार केला. मुनीमजी यांच्या मानेत गोळी लागली आणि ती डोळ्यातून बाहेर आली. जागच्या जागी त्यांचा प्राण गेला. त्यांचे वय ५५ वर्ष होते.
महमुद अली : हा अवघ्या 9 वर्षाचा कोवळा मुलगा वरळीच्या 129 नंबर बी.डी.डी. चाळीत रहात होत. महमद अली जेवायला बसला होता. चाळ नंबर 71 पासून पोलिसांनी मारलेली गोळी घरातील महमुद याच्या डोक्यात घुसली. त्याची आई शेजारी लहान मुलाला घेऊन बसली होती. पोद्दार हॉस्पिटलमध्ये महमुद अली मरण पावला.
मारुती विठोबा म्हस्के : हा १८ वर्षाचा तरुण मुळचा हैदराबादचा. रात्रीच्या शाळेत शिक्षण करून पैसे मिळवेत म्हणून तो मुंबईला मामाकडे आला होता. वरळीच्याच बी.डी.डी. चाळ नं. 60 मध्ये तो रहात होता. 58 नंबर चाळीकडे तो पान आणायला गेला होता. परंतु, परत येताना गोळीबारातील एक गोळी त्याच्या कपाळावर बसली. तो मरण पावला त्यावेळी त्याच्या एका हातात पाने होती.
तुळशीराम पुंजाजी बेलसरे ( वय 30) : बहिणीकडे राहणारे बेलसरे सकाळी 8 वाजता कामास जातो म्हणून बाहेर गेले. गिरगांवमध्ये मंगल प्रिंटिंग प्रेसमध्ये कामाला होते. संध्याकाळी परत आले नाही म्हणून चौकशी करण्यास सुरुवात झाली. 2 दिवसानंतर त्यांचे प्रेत जे. जे. हॉस्पिटल मध्ये मिळाले. त्यांच्या पोटाला गोळी लागली होती.
भाऊ कोंडीबा भास्कर : दुपारी अडीच वाजता भायखळा भाजी बाजारात कामाला निघाले. पण, दरवाजांतच डोळ्याला गोळी लागून जागीच मृत्यू आला. डोक्याची मागील कवटी साफ उडाली होती. 22 वर्षाचे भाऊ आईवडिलांचा एकुलत एक आधार होता. डिलाईलरोड मेहेरपाडा येथे ते रहात होते.
वासुदेव सुर्याजी मांजरेकर (वय 30) : लालबागच्या वाणी चाळीत रहाणारे मांजरेकर हिरजी मिलमध्ये वाईडिंग खात्यात फिटरचे काम करत होते. 20 तारखेला दुपारी चार वाजता रस्त्यावर पडलेले प्रेत उचलित असताना त्यांनाच गोळी लागली. पाठीतून एक गोळी आरपार निघून गेली तर दुसरी खांद्यावर लागली. मांजरेकर गतप्राण होऊन पडले.
देवाजी सखाराम पाटील (वय 21) : कांदेवाडींतून दुकान बंद करून ते खोलीवर येत होते. दादीशेठ अग्यारी लेन येथे दुपारी गोळीबार झाला. तो चुकविण्यासाठी ते पळू लागले. त्याचवेळी पोटाच्या कुशीवर गोळी लागली.
शामलाल जेठानंद (वय 19) : चिराबझारमधील सिंध डेरी फार्ममध्ये नोकरीला होता. घरी जाण्यासाठी डेरीचा दरवाजा उघडून बाहेर येत होता. इतक्यात गोळ्यांचा वर्षाव झाला. शामलाल यांच्या उजव्या कानांतून गोळी शिरली आणि डाव्या कानातून बाहेर आली. डेरीच्या दारातच तो कोसळला.
सदाशिव महादेव भोसले ( वय 27) : जुनी मारुती चाळ, फर्ग्युसन रोड येथे राहणारे भोसले त्रिकमदास गिरणीमध्ये वायडिंग खात्यात होते. चाळीजवळच मानेला गोळी लागून ते जागीच ठार झाले.
पांडू मोधू अडविरकर (वय 60) : श्रीनिवास कॉटन मिलमध्ये रिंग खात्यात कामाला होते. दुपारी साडे तीन वाजता लोअर परळ येथे पारशाच्या चाळीजवळ कुशीत गोळी लागून ठार झाले.
भिकाजी पांडुरंग रंगाटे ( वय 30) : रेचल मिलमध्ये कपडा खात्यांत काम करत होते. 7 वी पर्यंत त्यांचे शिक्षण झाले होते. त्यांना ज्ञानेश्वरी वाचनाचा नाद होता. 20 जानेवारी रोजी दुपारी काळाचौकी नाक्यावरील गोळीबारात त्यांच्या दंडावर आणि छातीत अशा दोन गोळ्या घुसल्या. ते गतप्राण झाले. तीन दिवसांनी त्यांचे प्रेत पोलिसांनी घरच्यांच्या ताब्यात दिले.
शंकर विनोबा राणे (वय 60) : हिंदमाता लेनमध्ये खोजा चाळीत रहात होते. त्याचा वैद्यकीचा व्यवसाय होता. काळाचौकी नाक्यावरून जात असतान डोक्याला गोळी लागली. मेंदूच्या चिंधड्या उडाल्या आणि ताबडतोब प्राण गेला. त्यांची पत्नी त्यावेळी गरोदर होती.
विजयकुमार संदाशिव बडेकर (वय 10) : हा विद्यार्थी ऑर्थर रोड येथील मराठी शाळेत दुसऱ्या इयत्तेत शिकत होता. दुपारी काळाचौकी येथील चुलत्याच्या दुकानात उभा असताना आलेली गोळी त्याच्या डोक्याला लागली. जागीच त्याचा मृत्यू झाला.
भिकाजी बाबू बांबरकर (वय 22) : मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाले होते. स्वभावानें अत्यंत गरीब, सालस होता. काळाचौकी येथे माय लाँड्रीमध्ये कामाला होता. त्याला 1 वर्षाची लहान मुलगी होती. काळाचौकी येथे गोळीबारात डोक्याला गोळी लागून गतप्राण झाला.
कृष्णा गणू शिंदे (वय 25) : काळाचौकीच्या राधामाईच्या चाळीत रहात होते. वेस्टर्न इंडिया मिलमध्ये काम करीत होते. दुपारी झालेल्या गोळीबारात त्यांच्या तोंडातून आणि मानेतून गोळी आरपार गेली. लागलीच त्यांचा प्राण गेला. पत्नी, आई, बाप, 2 लहान भाऊ, 2 लहान बहिणी त्यांच्या पश्चात आहेत.
सखाराम श्रीपत ढमाले (वय 26) : काळाचौकी येथे बावन चाळीत राहणारे ढमाले तेलाच्या गिरणीत त्रासन खात्यात काम करत होते. पोलिसांची एक गोळी त्यांच्या पोटांतून आरपार गेल्याने जागीच गतप्राण झाले.
रामचंद्र विठ्ठल चौगुले : प्रिंसेस स्ट्रीट येथील एका चाळींतील पहिल्या मजल्यावर झोपले होते. एका सुस्साट गोळी डोक्याला लागून मरण पावले. ते कपडयाच्या दुकानांत कामाला होते.
धोंडू भागू जाधव (वय 50) : करीरोडच्या चांदीवाला चाळीत रहात होते. दुकानावर पानसुपारी आणण्यासाठी गेले आणि गोळीबारात सापडले. दुकानासमोरच एक गोळी मानेतून गेली आणि जागीच मरण पावले.
सुखलाल रामलाल बसकर (वय 18) : आंबेवाडींत रहायला होते. आगासवाडी गिरणीत वासन खात्यात बदली कामगार होते. संयुक्त आंबेवाडी हुतुतू संघात एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून नाव कमावले होते. भजनी मंडळांतही ते सक्रीय होते. आंबेवाडीत दुपारी 4 वाजता गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला.
रघुनाथ सखाराम बेनगुडे ( वय 40) : फेरबंदरमधील झवेरी बिल्डींगमध्ये रहात होते. खोलीच्या दारात झोपले होते. दार फोडून गोळी आता घुसली आणि त्यांच्या डोक्याला लागली. न्यू सिटी मिलमध्ये ते डाफर बॉयचे काम करत होते.
पांडुरंग विष्णु वाळके (वय 48) : फिन्ले मिलमध्ये कपडा खात्यात नोकरीला होते. बायको, 3 मुले आणि संपूर्ण कुटुंब त्यांच्यावर अवलंबून होते. सकाळी 10 वाजता हबीब टेरेसमधून हाजी कासम चाळीत खानावळीकडे जेवायला येत असताना करीरोड पुलाजवळ गोळीबार करत फिरणाऱ्या लॉरीच्या तडाख्यात सापडले. छातीत गोळी लागली आणि पोद्दार हॉस्पिटमध्ये रात्री त्यांचे प्राणोत्क्रमण झाले.
काशिनाथ गोविंद चिंदरकर : जेकब सर्कल येथील हेन्स रोड येथे गोळी लागून प्राणांतिक जखमी झाले. नायर हॉस्पिटलमध्ये त्यांना नेले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. खटाव मिलमध्ये कामगार होते.
फूलवरी मगरु (वय 30) : वरळीच्या धोबी घाटात काम करत होते. सकाळी 11 वाजता कामावरून घरी येत असताना कमरेजवळ गोळी लागून जखमी झाले. त्यांना जमनाबाई हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे 2 दिवसानंतर त्यांना मरण आले.
करपय्या किरमल देवेंद्र (वय 14) : रावळी कँपमधील म्युनिसिपल तमिळ शाळेत शिकत होता. शाळा बंद असल्याने घरी परत येत असताना छातींत गोळी लागून जागीच ठार झाला.
गुलाब कृष्णा खवळे (वय 50) : हे हमालीचे काम करत होते. 21 तारखेला सकाळी 7 वाजता दुकानांतून चुना घेऊन परत येत असताना छातीत गोळी लागून जागीच प्राण गेला. बायको, 2 मुलगे आणि 1 मुलगी निराधार झाले.