महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज दिवसभरात मतदान पार पडलं आहे. राज्यातील दिग्गज नेत्यांचं भवितव्य आता मतपेटीत कैद झालं आहे. या मतपेट्या आता दोन दिवसांनी म्हणजेच येत्या 23 नोव्हेंबरला मतमोजणीच्या दिवशीच उघडतील. या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे प्रत्येकाचं अतिशय बारकाईने लक्ष आहे. महाराष्ट्रात सहा महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणूक पार पडली होती. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी फार कमी टक्के मतदान केलं होतं. पण त्यामानाने विधानसभा निवडणुकीत नागरिकांनी उत्सफूर्तपणे प्रतिसाद दिल्याचं चित्र आहे. राज्यातील मतदान करणाऱ्या मतदारांचा आकडा हा अनेक ठिकाणी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 60 टक्क्यांपेक्षा जास्त बघायला मिळाला आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्यातील जनता खूप अपेक्षेने आणि आशेने बघत असल्याचं चित्र आहे.
राज्यात गेल्या पाच वर्षात प्रचंड उलथापालथ झालेली बघायला मिळाली. गेल्या निवडणुकीनंतर सलग दोन ते अडीच वर्ष कोरोना संकटाने हैराण केलं. त्यानंतर राज्यात सत्तांतर घडून आलं. यानंतर राजकारणाचा अक्षरश: चिखल उडालेला बघायला मिळाला. कोण कुणाच्या बाजूने आहे, हेच स्पष्ट होईना. त्यामुळे जनता आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते देखील अनेकदा संभ्रमात पडले. पण आता हेच चित्र बदलवण्याची संधी मतदारांना मिळाली आहे. या निवडणुकीत मतदारांनी कुणाला सर्वाधिक पसंती दिली आहे ते येत्या 23 तारखेला स्पष्ट होणार आहेच, पण त्याआधी विविध संस्थांनी केलेल्या सर्व्हेक्षणातून एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीतून कुणाची सत्ता राज्यात येऊ शकते किंवा कशी राजकीय परिस्थिती निर्माण येऊ शकते, याबाबतचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पोल डायरीच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला सर्वात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पोल डायरीच्या अंदाजानुसार, महायुतीला राज्यात 122 ते 186 जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला केवळ 69 ते 121 जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. तर इतर अपक्षांना 12 ते 29 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
पोल डायरीच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक 77 ते 108 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. भाजप हा राज्यात पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. त्या पाठोपाठ शिवसेना शिंदे गटाला 27 ते 50 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार गटाला 18 ते 28 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला महाविकास आघाडीत सर्वाधिक जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, काँग्रेसला 28 ते 47 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गटाला 25 ते 39 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. सर्वात ठाकरे गटाला 16 ते 35 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
पी-मार्कच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, राज्यातला विधानसभा निवडणुकीचा निकाल हा अतिशय थरारक असणार आहे. कारण दोन्ही बाजूने स्पर्धा असण्याची शक्यता आहे. महायुतीला निवडणुकीत 137-157 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 126-146 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना 2 ते 8 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
मॅट्रीझच्या एक्झिट पोलनुसार, महाविकास आघाडीला राज्यात 110 ते 130 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. अंदाजानुसार, महायुतीला 150 ते 170 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
चाणक्यच्या पोलनुसार, राज्यात महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. अंदाजानुसार महायुतीला 152 ते 160 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 130 ते 138 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
पोल ऑफ पोलच्या अंदाजानुसार, राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. राज्यात महायुतीला 152 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर महायुतीला 126 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना 10 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.