महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडल्यानंतर आता विविध संस्थांचे एक्झिट पोलची आकडेवारी समोर येत आहे. या आकडेवारीनुसार, महायुती आणि महाविकास आघाडीत काँटे की टक्कर आहे. विविध संस्थांचे वेगवेगळी आकडेवारी समोर आली आहे. काही संस्थांच्या अंदाजानुसार, राज्यात महायुतीचं पुन्हा सरकार स्थापन होऊ शकतं. तर काही संस्थांच्या अंदाजानुसार, राज्यात सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात काँटे की टक्कर असण्याची शक्यता आहे. या सगळ्या घडामोडींदरम्यान आता ‘tv9 रिपोर्टर पोल’चा अंदाज समोर आला आहे. या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, राज्यात कदाचित महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. पण तरीही महाविकास आघाडीला अपक्षांची मदत घ्यावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्तेच्या चाव्या कदाचित अपक्षांच्या हाती असण्याची शक्यता आहे. tv9 रिपोर्टर पोलनुसार, महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काँटे कीट टक्कर आहे. टीव्ही 9 रिपोर्टरनुसार, महायुतीला 129 ते 139 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 136 ते 145 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना 13 ते 23 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
टीव्ही 9 रिपोर्टर पोलनुसार, राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. पोलनुसार, भाजपला 81 पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाला 25 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 23 पेक्षा जास्त जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
टीव्ही 9 रिपोर्टर पोलनुसार, महाराष्ट्रात महाविकास आघाडी कदाचित बहुमताचा आकडा गाठण्यात यशस्वी होऊ शकतात. अंदाजानुसार, महाविकास आघाडीला 136 ते 145 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. अंदाजानुसार, काँग्रेसला 50 पेक्षा जास्त जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाला 44 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 42 पेक्षा जास्त जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
टीव्ही 9 रिपोर्टर पोलनुसार, महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला 105 जागांवर यश मिळालं होतं. पण टीव्ही 9 रिपोर्टर पोलनुसार, महाराष्ट्रात भाजपला कदाचित 81 जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाला केवळ 25 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ शिंदे गटाच्या 15 पेक्षा कमी जागा होण्याची शक्यता आहे. तसेच अजित पवार गटाला 23 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे, याचाच अर्थ अजित पवार गटाला तब्बल 17 जागा कमी होण्याचा अंदाज आहे.