पूरग्रस्त भागात वीज बिल वसूली करु नका, उर्जामंत्री नितीन राऊतांचे आदेश
पूरग्रस्त भागात वीज बिल वसूली करु नका, असे आदेश आज नितीन राऊत यांनी दिले आहेत. परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर बिल भरण्यासाठी सवलत दिली जाईल, असंही ऊर्जामंत्री यावेळी म्हणाले.
सांगली : राज्यात महापुरानं थैमान घातलं आहे. घरात छतापर्यंत पाणी शिरल्यानं अनेकांचे संसार मोडून पडले आहेत. त्यामुळे दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न पूरग्रस्त भागातील नागरिकांना भेडसावत आहे. अशावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांना मोठा दिलासा दिलाय. पूरग्रस्त भागात वीज बिल वसूली करु नका, असे आदेश आज नितीन राऊत यांनी दिले आहेत. परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर बिल भरण्यासाठी सवलत दिली जाईल, असंही ऊर्जामंत्री यावेळी म्हणाले. वीज बिल माफीचा निर्णय अद्याप झालेला नाही. तो निर्णय मी नाही तर मंत्रिमंडळ करेल, असंही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलंय. (Do not recover electricity bills in flood-hit areas, Nitin Raut orders)
ऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार
गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, निसर्ग व तौक्ते चक्रीवादळ व पुरामुळे वीज यंत्रणेचे खूप नुकसान झाले आहे. उघड्यावर वीज यंत्रणा असल्यामुळे प्रथम नैसर्गिक संकटाचा सामना ऊर्जा विभागाला करावा लागतो. यावर उपाययोजना व संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठी आपत्ती विभाग स्थापन करण्याचा मानस असल्याचे राऊत म्हणाले. कोकणात वारंवार नैसर्गिक संकटे येत आहे. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे कायमस्वरूपी तळ निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मीटर त्वरीत बदलून द्या
रत्नागिरी जिल्ह्यात 22 जुलै रोजी झालेल्या ढगफुटी व अतिवृष्टीमुळे मुख्यत: चिपळूण, खेड, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यात महावितरण व महापारेषणच्या यंत्रणांचे अतोनात नुकसान झाले आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नितीन राऊत यांनी आज चिपळूण तालुक्याला भेट दिली. या प्रसंगी महावितरणचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे, महावितरण रत्नागिरी परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर, ऊर्जामंत्री यांचे सल्लागार उत्तम झालटे, महापारेषाणचे कराड परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल कोलप, कोयना जलविद्युत प्रकल्पाचे प्रभारी मुख्य अभियंता राजेश कोलप व महापारेषाणच्या अधिक्षक अभियंता शिल्पा कुंभार हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी पुरामुळे नादुरुस्त झालेल्या ग्राहकांचे मीटर त्वरित बदलून देण्याचे निर्देश महावितरणला दिलेत.
कामगारांचं कौतुक
चिपळूण येथे पुरामुळे नागरिकांचे तसेच महावितरण आणि महापारेषणच्या यंत्रणेचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक भागात तारांसह पोल जमीनदोस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत नदीला आलेल्या पुराचा सामना करत, डोंगर दऱ्यांतून अवजड पोल, रोहित्रे व इतर अवजड सामग्री खांद्यावर वाहून नेऊन महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी बहुतांश भागाचा वीज पुरवठा सुरळीत केला आहे. त्यांच्या या कामगिरीचे राऊत यांनी प्रत्यक्ष भेटीत कौतुक केले.
मदत साहित्याचे वाटप
या दौऱ्यात चिपळूण तालुक्यातील खेर्डी, वशिष्ठी नदीपूल परिसर तसेच मुरादपूर येथे सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांनी वीज कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. तसेच प्रभावित क्षेत्रातील भागात दुरूस्तीसाठी त्वरित साहित्य व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी महावितरण व्यवस्थापनाला दिल्या आहेत. आपल्या या दौऱ्यात त्यांच्या हस्ते पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटपही करण्यात आले.
संबंधित बातम्या :
Do not recover electricity bills in flood-hit areas, Nitin Raut orders