Maharashtra Government Formation LIVE: भास्कर जाधव ठाकरे गटाचे गटनेते, सुनील प्रभू प्रतोद
Maharashtra Government Formation and New CM Oath Taking Ceremony LIVE - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे स्पष्ट निकाल समोर आले असून महायुतील दणदणीत विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला आहे. निकालानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. तसेच मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युलाही समोर आला आहे. राजकारणाशी निगडीत सर्व बातम्यांचे अपेड्टस तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.
विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं असून महाविकास आघाडीचा फॉर्म्युला बिलकूल चाललेला नाही. या निवडणुकीत मविआचा दणदणीत पराभव झाला, अनेक मोठ्या नेत्यांनाही हार पत्करावी लागली. महायुतीने 236 जागांववर विजय मिळाला असून भाजपला सर्वाधिक 132 तर शिवसेना शिंदे गटाला 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या आहेत. या निकालानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युलाही समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रिपदासाठी दोन फॉर्म्युला निश्चित करण्यात आले असून त्यावर सध्या चर्चा सुरू आहे. महायुतीचा नवा मुख्यमंत्री कोण असेल, शपथविधी कधी होईल या सर्व बातम्यांसह क्रीडा, मनोरंजन, या क्षेत्रांचेही अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
LIVE NEWS & UPDATES
-
संसदेच्या अधिवेशनासाठी काँग्रेस खासदारांची आज संध्याकाळी बैठक
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची रणनीती तयार करण्यासाठी काँग्रेस संसदीय रणनीती समितीची बैठक आज सायंकाळी 6 वाजता 10 राजाजी मार्गावर होणार आहे.
-
आम्हाला विजयाची अपेक्षा होती: नाना पटोले
विधानसभा निवडणुकीत हेराफेरी झाल्याचं वक्तव्य महाराष्ट्र काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलं आहे. निकाल आमच्या बाजूने लागतील अशी आम्हाला आशा होती. नांदेड लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी झाल्या, पण आम्ही विधानसभेची जागा हरलो आणि लोकसभेची जागा जिंकली, असे कसे होऊ शकते, असा सवाल त्यांनी केला.
-
-
फडणवीस, शिंदे आणि अजित पवार आज रात्री दिल्लीला जाणार
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज रात्री दिल्लीला पोहोचू शकतात. जिथे ते एका खाजगी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यानंतर रात्री उशिरा भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट होऊ शकते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबतच्या बैठकीत महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा फॉर्म्युला ठरणार आहे.
-
शेतकऱ्यांचे वैजापूर बाजार समितीत आंदोलन
वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयावर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. एका व्यापाऱ्याने दोन कोटीहून अधिक शेतकऱ्यांची रक्कम थकवल्याने शेतकऱ्यांकडून हे आंदोलन सुरू आहे. बाजार समितीने या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. परंतु बाजार समितीच्या पैशातून हे पैसे देता येत नाही असे म्हणत मात्र हात झटकल्याची माहिती समोर येत आहे.
-
महायुतीचा विजय ईव्हीएममुळे-खैरे
विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा दारुण पराभव झाल्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी या पराभवावरती प्रचंड संताप व्यक्त केला आहे. ईव्हीएम मशीन आणि पैशांचा बेमाप वापर झाल्याचा वापर खैरे यांनी केला आहे.
-
-
बारामतीत अपघात, तीन जण गंभीर
बारामती सोनगाव रोडवर आज सकाळी साडेनऊच्या सुमारास गुणवडी हद्दीमध्ये चार चाकीने तीन चाकी प्रवासी रिक्षाला धडक दिली. यामध्ये गर्भवती महिला तिची आई आणि लहान मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
-
महाविकास आघाडीतील आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात
महाविकास आघाडीतील अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. महायुतीला मिळालेल्या दणदणीत विजयानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. काही आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात.
-
सुनील प्रभू शिवसेनेचे प्रतोद
शिवसेना उबाठा गटनेतेपदी भास्कर जाधव यांची निवड करण्यात आली. तसेच सुनील प्रभू यांना पुन्हा प्रतोदपदी नियुक्त केले आहे.
-
हे सरकार जनतेनं निवडून दिलंय का हे जनता टाहो फोडून विचारत आहे- वडेट्टीवार
“फडणवीसांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत. महाराष्ट्रातील नवं सरकार शेतकऱ्यांसाठी काय करणार आहे? महागाई वाढली, अनेक प्रश्न राज्यात असताना आम्ही विरोधक म्हणून आमची भूमिका पार पाडू. एक नक्क्की आहे हे सरकार जनतेनं निवडून दिलं आहे का हे जनता टाहो फोडून विचारत आहे,” असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
-
दिल्ली- 5.3 लाख वृद्धांना पेन्शन मिळणार, मंत्रिमंडळाने केलं मंजूर- केजरीवाल
दिल्ली: “आज आम्ही दिल्लीतील वृद्धांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. 80,000 वृद्धापकाळ निवृत्तीवेतन सुरू केलं जात आहे. आता एकूण 5.3 लाख वृद्धांना पेन्शन मिळणार आहे. मंत्रिमंडळाने ते मंजूर केलं आहे आणि दिल्ली सरकारने त्याची अंमलबजावणी केली आहे. गेल्या 24 तासात 10,000 अर्ज आले आहेत. 2015 मध्ये सरकार स्थापन केल्यानंतर आम्ही पेन्शनची रक्कम वाढवली. ही रक्कम संपूर्ण देशात सर्वाधिक आहे”, अशी माहिती ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिली.
-
अदानींच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास सरकार तयार नाही- शशी थरुर
दिल्ली: “सर्व विरोधी पक्षांनी अदानी मुद्द्यावर चर्चा करण्याचा निर्णय घेतला होता, पण सरकार त्यासाठी तयार नव्हतं. त्यामुळेच संसदेच्या दोन्ही सभागृहांचं अधिवेशन तहकूब करण्यात आलं आहे. बघूया काय होतं ते…”, अशी प्रतिक्रिया काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी दिली.
-
युगेंद्र हा व्यावसायिक, त्याचा राजकारणाशी संबंध नव्हता- अजित पवार
“युगेंद्र हा व्यावसायिक आहे, त्याचा राजकारणाशी संबंध नव्हता. माझ्या विरोधात माझ्या पुतण्याला निवडणुकीत उतरवण्याचं कारण नव्हतं. लोकसभा निवडणुकीत माझ्याकडून चूक झाली, पण जर तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर तुम्ही घरातल्याच माणसाला माझ्या विरोधात उभे करणार का?”, असा सवाल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
-
महाराष्ट्रात बिहार-हरियाणा पॅटर्न राबवण्यात यावा; शिंदेंच्या शिवसेनेची मागणी
“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं जाईल असा आम्हाला विश्वास आहे. बिहारमध्ये भाजपच्या जागा जास्त असतानाही नितीश कुमार मुख्यमंत्री झाले. हरियाणात सैनीसाहेबांच्या नेतृत्वात निवडणूक लढली गेली, तेच मुख्यमंत्री झाले. भाजप छोट्या पक्षांवर अन्याय करणार नाही असं मला वाटतं. सर्व योजना, शासन आपल्या दारी राबवण्यात शिंदेंची प्रमुख भूमिका होती. एक कार्यकर्ता म्हणून शिंदे मुख्यमंत्री होतील असं मला वाटतं,” अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिली.
-
जळगाव जिल्ह्यात १७ हजार ६१९ मतदारांचे ‘नोटा’ला मतदान
जळगाव जिल्ह्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत १७ हजार ६१९ मतदारांनी ‘नोटा’ला मतदान केले. २०१९ मधील विधानसभेच्या तुलनेत नोटा ला मतदान करणाऱ्यांचा टक्का ६ हजारांवर मतांनी घसरला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक चोपड्यात 2 हजार 405 जणांचे तर सर्वात कमी 625 मुक्ताईनगर मतदारसंघात नोटाला मतदान झाले
-
ज्याला निवडून आणायचे त्याला आणले आणि पाडायचे त्याला पाडले; मनोज जरांगेंचा खळबळजनक खुलासा
आमच्यासाठी कोण समाधानकारक आहे. आमच्या वाट्याला कधीही संकटच आलेले आहेत. 70-75 वर्षात आमच्या वाट्याला संघर्ष आला आहे, कोणीही आला काय त्याचे आम्हाला सुख किंवा दुःख असण्याचे काही कारण नाही. आमच्या जीवनात संघर्ष आहे आणि तो आम्हाला करावाच लागणार आहे. आमची जात आणि आमचे लेकरं बाळ मोठे करण्यासाठी आम्हाला लढावं लागणार आहे. कोण आल्याने आमच्या समाजाचे भलं होईल असं आम्ही कधीही अपेक्षित धरलं नाही. त्यामुळेच आम्ही उठाव आणि चळवळीवर विश्वास ठेवला आहे. कोणी आलं काय आणि कोणी मुख्यमंत्री झाले काय आम्हाला लढावं लागणार आहे. मराठे पुन्हा एकदा कडवी झुंज देणार आहेत, आता राजकारण विषय संपला आहे. ज्याला निवडून आणायचे त्याला आणले आहे, आणि ज्याला पाडायचे आहे त्याला पाडले पण आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
-
आरक्षणासाठी उपोषण करु नये, बाळासाहेब सराटे यांची जरांगे पाटील यांना विनंती
ओबीसीमधून मराठा आरक्षण ही कालबाह्य गोष्ट आहे. मराठा आरक्षणासाठी आता उपोषण करणे व्यवहार्य नाही. मराठा समाजाने एकनाथ शिंदे सरकारने दिलेलं 10 टक्के आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न करावेत. 10 टक्के आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही तर ews आरक्षणाचा कोटा वाढवून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्या मागण्या केल्यामुळे आंदोलनाला यश आलं नाही, असे विधान बाळासाहेब सराटे यांनी केले.
सभा मेळावे आणि इव्हेंट मुळे आंदोलन भरकटले. जरांगे पाटलांना आता हात जोडून विनंती आरक्षणासाठी उपोषण करू नये
नव्याने स्थापन झालेल्या सरकारला कमीत कमी 6 महिने वेळ द्यावा, सरकार काय पावले उचलतंय ते पाहावं मग आंदोलनाचा निर्णय घ्यावा
-
Maharashtra News: मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी उद्याच होण्याची शक्यता – सूत्र
मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी उद्याच होण्याची शक्यता… मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसाचं नाव निश्चित… सध्याकाळपर्यंत नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे.
-
Maharashtra News: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण ? आज दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता
आज दुपारी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज दुपारी दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती… लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी तिन्ही नेते दिल्लीला जाण्याची शक्यता… संध्याकाळी महायुतीच्या नव्या सरकार बाबतची रुपरेषा ठरण्याची शक्यता…
-
Maharashtra News: विधानसभा निवडणुकीत १७ हजार ६१९ मतदारांचं ‘नोटा’ला मतदान
जळगाव जिल्ह्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत १७ हजार ६१९ मतदारांनी ‘नोटा’ला मतदान केले… २०१९ मधील विधानसभेच्या तुलनेत नोटाला मतदान करणाऱ्यांचा टक्का ६ हजारांवर मतांनी घसरला आहे… जिल्ह्यात सर्वाधिक चोपड्यात 2 हजार 405 जणांचे तर सर्वात कमी 625 मुक्ताईनगर मतदारसंघात नोटाला मतदान…
-
Maharashtra News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका हिंदुत्वाची
मुख्यमंत्रीपद कोणाला द्यावं, यात संघाची कोणतीही भूमिका नाही… संघाकडून तत्वनिष्ठ हिंदुत्वाचा पुरस्कार, व्यक्तीसापेक्ष भूमिका नाही… मुख्यमंत्री पद वगैरे निर्णय भाजप घेणार… संघाच्या वरिष्ठ अष्टकातील विश्वसनीय सूत्रांची माहिती…
-
नाशिकमध्ये युवकाची हत्या
नाशिकच्या पंचवटीत टोळक्याकडून युवकाची हत्या झाला आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास युवकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. विशांत भोये या 29 वर्षीय युवकाची टोळक्याने हत्या केल्याची माहिती आहे. आडगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. किरकोळ कारणातून खून झाल्याची माहिती आहे. डोळ्यात मिरचीची पूड फेकल्यानंतर दहा ते बारा जणांकडून हल्ला करण्यात आला आहे. यातील एकाने थेट विशांत वर कोयत्याने हल्ला केला आहे. कोयत्याच्या हल्ल्यानंतर विशांत धारातीर्थ पडला आहे. जखमी विशालला मित्रांनी तातडीने रुग्णालयात उपचार करता दाखल केले मात्र वर्मी घाव लागल्याने मृत्यू झाला आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संबोधन
आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. या अधिवेशनात जास्तीत जास्त सदस्यांनी सहभागी व्हावं. जनेतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दिवस- रात्र मेहनत करायला हवी. सर्वच पक्षात नवीन सदस्य आहेत. त्यांना संधी मिळावी, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
-
कोल्हापुरात गोळीबारची घटना
कोल्हापूरच्या आदमापूरात दोन गावठी पिस्तूलमधून परस्पर विरोधी गोळीबार झाला आहे. पुलाची शिरोलीतील बारा जणांना अटक करण्यात आली आहे. दोन गावठी पिस्तूल आणि तीन राऊंड जप्त करण्यात आले आहेत. स्क्रॅप व्यवसायातील वादातून कोल्हापूर आदमापुर येथील एका हाॅटेलमध्ये एखाद्या पिक्चरला लाजवेल असे गावठी पिस्तूल गोळीबाराचे थरनाट्य घडले. निमित्त पुलाची शिरोलीतील भंगार व्यवसाय वादाचे होते. पोलीसांनी याप्रकरणी बारा जणांना अटक केली आहे. चार जण फरार आहेत. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेच सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
-
राज्याच्या मुख्यमंत्रिपदाबाबत संजय राऊतांचं मोठं विधान
राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होईल? यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. दिल्ली ठरवेल तो मुख्यमंत्री यांना स्वीकारावा लागेल, असं संजय राऊत म्हणाले. तसंच महाविकास आघाडीच्या पराभवाच्या कारणांवर बोलताना कोणी एक व्यक्ती या पराभवाला कारणीभूत असू शकत नाही, असं संजय राऊत म्हणाले.
-
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत निवडणूक संचलन समितीची बैठक
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत निवडणूक संचलन समितीची आज दुपारी १ वाजता भाजप प्रदेश कार्यालय येथे बैठक होणार आहे.
ऐतिहासिक विजयानंतर विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला जाणार असून रावसाहेब दानवे, प्रवीण दरेकर यांच्यासह निवडणूक संचलन समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी ?
नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच होणार सुनावणी. उद्या अर्थात 26 नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणीची तारीख आहे. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्या सुप्रीम कोर्ट काय निर्देश देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.
-
सीएमपदासाठी कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही – अजित पवार
सीएमपदासाठी कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. मुख्यमंत्रीपदाबाबत आम्ही तिघे बसून निर्णय घेऊ असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
-
राज ठाकरे मुंबईतील उमेदवारासोबत आज संवाद साधणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे निवडणूक लढलेल्या मुंबईतील उमेदवारासोबत आज संवाद साधणार आहेत.
मुंबईतील निवडणूक लढून पराभूत झालेले उमेदवार शिवतीर्थावर येणार असून राज ठाकरे त्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष लागलेआहे.
-
देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाला वाढता पाठिंबा
देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाला वाढता पाठिंबा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यानंतर अपक्षांचाही फडणवीसांना पाठिंबा. विधानसभेतील नवनिर्वाचित पाच आमदारांनी भाजपला पाठिंबा दर्शवला आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे, जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे आणि अशोकराव माने, युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा आणि अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.
महायुतीतील सर्वाधिक आमदारांची मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना पसंती आहे.
-
Maharashtra Government Formation : मुख्यमंत्रीपदाच्या 2 फॉर्म्युलावर महायुतीच्या बैठकीत चर्चा
मुख्यमंत्रीपदाच्या 2 फॉर्मुल्यावर महायुतीच्या बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्रीपदाचा अडीच-अडीच वर्षाच्या फॉर्म्युलावर शिंदे गट आग्रही आहे.
तर दुसरा फॉर्म्युला 2-2-1 यावरही चर्चा सुरू असून त्यासाठी अजित पवार गट आग्रही आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. 1 वर्ष अजित पवार , 2 वर्ष भाजप , 2 वर्ष शिंदे असे मुख्यमंत्रीपद मिळावे अशी मागणी असल्याचे समजते. आज तिन्ही नेते दिल्लीत जाण्याची शक्यता आहे.
-
सत्तास्थापनेचा फॉर्म्युला ठरला ?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर सध्या महायुतीत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महायुतीचा मुख्यमंत्री कोण यावर सध्या विचारमंथन सुरू असून महायुतीत 2-2-1 असा सीएमपदाचा फॉर्म्युला असेल का यावर चर्चा सुरू आहे.
Published On - Nov 25,2024 9:15 AM