महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेत मोठा ट्वीस्ट, शिंदे गट-भाजपमध्ये गृहमंत्रिपद विभागले जाणार?
एकनाथ शिदें यांनी गृहमंत्रीपदावर दावा केला. तर भाजपकडून गृहमंत्रिपदाचा दावा सोडणार नाही, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगली होती.
Maharashtra Government formation : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आता एक महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत गृहमंत्रिपदावर चर्चा सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच आता गृहमंत्रिपदावरुन एक मोठी बातमी समोर येत आहे. महायुतीत गृहमंत्रिपद हे विभागून घेतले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गृहमंत्रिपदाचे विभागन केले जाणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप आणि शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून गृहमंत्रिपदावरुन वाद सुरु आहे. त्यामुळे गृहमंत्रिपद विभागून दिले जाऊ शकतं असं म्हटलं जात आहे. भाजप आणि शिवसेना हे गृहमंत्रिपदातील काही महत्त्वाचे विभाग विभागून घेऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
गृहमंत्रीपदावरुन वाद
येत्या ५ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील नवीन मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले. यानंतर शिवसेना शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गटात मंत्रिपदावरुन नाराजीनाट्य पाहायला मिळाले. त्यातच एकनाथ शिदें यांनी गृहमंत्रीपदावर दावा केला. तर भाजपकडून गृहमंत्रिपदाचा दावा सोडणार नाही, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगली होती.
प्रकृती ठिक होताच एकनाथ शिंदे ‘वर्षा’वर दाखल
तर दुसरीकडे दिल्लीत महायुतीची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली. ते दोन दिवस विश्रांतीसाठी साताऱ्यातील दरे गावात गेले होते. यानंतर ते ठाण्यात दाखल झाले. यानंतरही ते आजारी असल्याने अनेक बैठका रद्द करण्यात आल्या. त्यानंतर आज ज्युपिटर रुग्णालयात एकनाथ शिंदेंच्या काही चाचण्या करण्यात आल्या. यानंतर डॉक्टरांनी त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगताच ते थेट वर्षा निवासस्थानी रवाना झाले. यानंतर गेल्या काही तासांपासून एकनाथ शिंदेंनी बैठकांचा सपाटा सुरु केला.
देवेंद्र फडणवीस थेट वर्षा बंगल्यावर दाखल
यावेळी एकनाथ शिंदे यांनी महापरिनिर्वाण दिनासाठी काय-काय तयारी केली आहे याची आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस हे देखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. यानंतर भाजप नेते गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले. यानंतर एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेनंतर एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गेले. गिरीश महाजनांनी एकनाथ शिंदे यांचा निरोप देवेंद्र फडणवीस यांना कळवला.
गिरीश महाजन यांच्यासोबतच्या बैठकीनंतर थेट देवेंद्र फडणवीस हे स्वत: एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा बंगल्यावर बैठक झाली. यानंतर अवघ्या १५ मिनिटात देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्याबाहेर आले. त्यामुळे आता सत्तास्थापनेचा पेच सुटला का? भाजप एकनाथ शिंदे यांना गृहखातं देणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.