महाराष्ट्रातील राजकारणातील हायव्होलेटेज घडामोडी, पहाटेपासूनच्या A टू Z अपडेट
अखेर उद्या (५ डिसेंबर) महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी आज राज्याच्या राजकारणात हायव्होलटेज घडामोडी घडत आहेत. त्याचा आपण आढावा घेणार आहोत...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने लवकरच महायुतीचा मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र निकाल लागून १० दिवस उलटल्यानंतर अद्याप राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा संपता संपत नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. एकीकडे शिवसेना शिंदे गटाकडून गृहमंत्रिपदाची मागणी करण्यात आली. तर दुसरीकडे भाजपकडून या मागणीला कडाडून विरोध झाला. यामुळे नवीन मुख्यमंत्री कधी शपथ घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर उद्या (५ डिसेंबर) महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी आज राज्याच्या राजकारणात हायव्होलटेज घडामोडी घडत आहेत. त्याचा आपण आढावा घेणार आहोत…
💠सकाळी ७ वाजता
राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आज सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. त्यापूर्वी आज भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या गटनेतेपदाच्या निवडीसाठी विधीमंडळ परिसरात जय्यत तयारी करण्यात आली होती. या बैठकीसाठी भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी, निर्मला सीतारमण हे कालच मुंबईत दाखल झाले आहेत.
💠सकाळी 8 वाजता
भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदाच्या निवडीसाठी भाजपचे अनेक आमदार हे विधानभवन परिसरात दाखल झाले आहेत. यावेळी सर्व आमदारांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळत आहे. यावेळी अनेक आमदारांनी देवाभाऊ मुख्यमंत्री होणार अशी प्रतिक्रिया दिली.
💠सकाळी 9 वाजता
देवेंद्र फडणवीस हे सागर बंगल्यावरुन विधीमंडळाच्या गटनेतेपदाच्या बैठकीसाठी निघाले. यावेळी त्यांनी भगव्या रंगाचे जॅकेट परिधान केले होते. त्यासोबत ते आज एका वेगळ्याच कॉन्फिडन्समध्येही दिसत होते.
💠सकाळी 10 वाजता
भाजप पक्ष निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमन हे विधीमंडळात पोहोचले. यावेळी पुष्पगुच्छ देऊन निर्मला सीतारमन आणि विजय रुपाणी यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर भाजप विधीमंडळ पक्ष कार्यालयात चौथ्या मजल्यावर कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत विधीमंडळ गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
💠सकाळी 11 वाजता
यानतंर आज सकाळी ११ वाजता विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या आमदारांची विधिमंडळ गटनेता निवडीची बैठक पार पडली. यावेळी सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी गटनेते पदाचा प्रस्ताव मांडला. तर आशिष शेलार आणि रविंद्र चव्हाण हे या प्रस्तावावर अनुमोदन देणार आहेत.
💠दुपारी 11.45 वाजता
विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या आमदारांची विधिमंडळ गटनेता निवडीची बैठक सुरु झाली आहे. यावेळी चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. मी महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्र जी सरीताताई गंगाधरराव फडणवीस यांचं नाव सूचवत आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तर सुधीर मुनंगटीवार यांनी मी विधीमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्र जी सरीताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवतो असे म्हटले.
💠दुपारी 12 वाजता
यानंतर पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. मी अनुमोदन देते, शुभेच्छा देते. या पाठोपाठ रवींद्र चव्हाण, संजय वामन सावकारे, अशोक विखे, योगेश सागर, संभाजी पाटील निलंगेकर, गोपीचंद पडळकर आणि आशिष शेलार यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. अखेर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.
केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत विधिमंडळ पक्षनेतेपदी शिक्कामोर्तब करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर अखेर सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. आता दुपारी 3 वाजता राजभवनात जाऊन राज्यपालांना सत्तास्थापनेचं पत्र देण्यात येणार आहे.