“सगळ्यांच्या सर्व गोष्टी आपल्याला पूर्ण करता येत नाही…” देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य, मोठा गेम होण्याची शक्यता
येत्या काळात चार गोष्टी मनासारख्या होतील. तर चार गोष्टी मनाविरुद्धही होतील. लार्जर इंट्रेस्टमध्ये काम करू. आपली शक्ती दाखवून देऊ, असेही सूचक विधान देवेंद्र फडणवीसांनी केले.
Devendra Fadnavis Speech : महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. आज त्यांची भाजपच्या गटनेतेपदी आज निवड करण्यात आली. उद्या 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांचा आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा पार पडेल. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस राज्याचा कारभार सांभाळतील. विधीमंडळाच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच भाषण केले. यावेळी त्यांनी भाजपच्या नवनियुक्त आमदारांना सूचक सल्ला दिला.
देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी सर्व नेत्यांचे, वरिष्ठांचे आभार मानले. आज आपल्या महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. भाजपला १३२ आणि महायुतीला २३७ जागा मिळाल्या. हा महाराष्ट्रातील अभूतपूर्व यश आहे. मोदींचं आभार मानेल. बुथचा कार्यकर्ता म्हणून, वॉर्डाचा कार्यकर्ता म्हणून काम केलं. अशा व्यक्तीला तीन वेळा मुख्यमंत्रीपदावर बसवलं. एकदा ७२ तासांसाठी होतो. पण टेक्निकली मुख्यमंत्री होतो. हा पक्ष मोठा झाला. त्यांनी संधी दिली. मी मोदींचं आभार मानतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तुम्ही आहात म्हणून मी इथे आहे. तुम्ही नसता तर मी नसतो. त्यामुळे तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. पण पुढची वाट अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संघर्षाची आहे. आपल्याला अपेक्षा पूर्ण करायचे आहे. आपलं महायुतीचं सरकार आहे. आपल्या सर्व मित्रांना एक दिलाने सर्वांना सोबत घेऊन. एवढा मोठा कौल असल्यावर सगळ्यांच्या सर्व गोष्टी आपल्याला पूर्ण करता येत नाही. पण मोठा गोल घेऊन आपण राजकारणात आलो आहोत. पदासाठी किंवा कुणी तरी मोठं करावं यासाठी आलेलो नाहीत. येत्या काळात चार गोष्टी मनासारख्या होतील. तर चार गोष्टी मनाविरुद्धही होतील. लार्जर इंट्रेस्टमध्ये काम करू. आपली शक्ती दाखवून देऊ, असेही सूचक विधान देवेंद्र फडणवीसांनी केले.
आजच सत्तास्थापनेचा दावा
देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर फडणवीस आजच राज्यापालांना सत्ता स्थापनेचं पत्र देणार असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी फडणवीस यांच्यासोबत अजित पवार असण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदे हे फडणवीस यांच्यासोबत असतील का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि विजय रुपाणी हे भाजपचे दोन्ही निरीक्षक राजभवनावर शिष्टमंडळासोबत जाण्याची शक्यता आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या सूचक विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी मोठं घडणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे.