Maharashtra Government formation : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. यात भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. तर महाविकासआघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या. तसेच अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत. यामुळे राज्यात महायुती सरकार स्थापन करणार हे निश्चित झाले होते. आता सध्या महायुतीच्या गोटात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. त्यातच आता महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा कधी केला जाणार याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. एकनाथ शिंदे यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. आता नवीन सरकार स्थापन होईपर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहेत. मात्र, यावेळी महायुतीकडून अद्याप राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करण्यात आला नाही. एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर दीपक केसरकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुती सत्तास्थापनेचा दावा कधी करणार याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट भाष्य केले.
“एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला आहे. नवीन सरकार अस्तित्वात येण्याआधी ती औपचारिकता असते. त्यांच्यावर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांनी जबाबदारी सोपवली आहे. आजपासून ते राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील. यानंतर आता येत्या काही दिवसात नव्या सरकारचा शपथविधी पार पडेल”, असे दीपक केसरकर यांनी म्हटले.
“भाजप गटनेता निवडीसाठी उद्या बैठक होईल. उद्या महायुतीतील तिन्ही नेते एकत्र बसतील आणि चर्चा करतील. त्यानंतर मग पक्ष श्रेष्ठींकडे जातील. यानंतर पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील. त्यानुसार पुढील गोष्टी होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह हे जो काही निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य असेल”, असेही दीपक केसरकर यांनी सांगितले.
“एकनाथ शिंदे यांनी नियमित कार्यवाहीनुसार राजीनामा दिला आहे. आम्ही तिघेही एकत्र आहोत, महाराष्ट्राच्या हितासाठी हे सरकार काम करेल. आमच्या तिघांमध्ये कोणतीही नाराजी नाही. जो काही वरिष्ठांचा निर्णय होईल, त्यानुसार मुख्यमंत्री ठरेल”, असाही पुनरुच्चार दीपक केसरकरांंनी केला.