कुठे निकालाआधीच जल्लोष; तर कुठे बत्तीगुल! मतमोजणी केंद्रांवर नेमकं काय घडतंय? वाचा…
Kolhapur Pune Maharashtra Gram Panchayat Election 2023 : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल लागतो आहे. मतमोजणी केंद्रांवर घडामोडी घडत आहेत. तुमच्या ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी केंद्रांवर नेमकं काय घडतंय? निकालाआधी कुणी गुलाल उधळला? वाचा सविस्तर...
कोल्हापूर | 06 नोव्हेंबर 2023 : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल आहे. अशातच राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर विविध घडामोडी घडत आहेत. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतची मतमोजणी शासकीय गोदाम परिसरात होत आहे. करवीर तालुक्यातील मतमोजणी केंद्रावरील बत्तीगुल झाली आहे. मतमोजणी सुरू होण्या आधीच लाईट गेली आहे. कर्मचाऱ्यांनी धावपळ करत लाईट पूर्ववत केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 89 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची आज मतमोजणी होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 85% मतदान झालं आहे. आज तालुक्यांच्या ठिकाणी मतमोजणी होत आहे. या निकालाकडे राज्याचं लक्ष आहे.
नांदेडमध्ये दोन गटात दगडफेक
ग्रामपंचायत निवडणुकीतील वादातून दोन गटात दगडफेक झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यात तेलंगणा सीमेवर असलेल्या मानूर गावातील गुत्ती तांडा इथे हा प्रकार घडलाय. या घटनेचे व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मतदान प्रक्रिया संपण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. दोन गटात दगडफेक झाली. नंतर त्याचं रूपांतर हाणामारीतही झालं. त्यात काही जण जखमी देखील झालेत. मरखेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेनंतर गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. तसेच पोलिसांनी दोन्ही गटातील अशात विरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
मतमोजणी आधीच जल्लोष
बारामतीत मतमोजणी सुरू व्हायच्या आधीच उमेदवारांनी जल्लोष सुरु केला आहे. मतमोजणी सुरू व्हायच्या आधीच अंगावरती गुलाल टाकत उमेदवारांसह कार्यकर्ते देखील मतदान केंद्रावर दाखल झालेत. बारामती तालुक्यातील भोंडवे वाडी ग्रामपंचायतच्या सदस्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. मतमोजणी सुरू व्हायच्या आधीच गुलालाची उधळण करत उमेदवार मतमोजणी केंद्रावर जल्लोष पाहायला मिळतो आहे. आम्हाला विजयाचा विश्वास आहे. आम्ही गावात गुलाल खेळूनच मतमोजणीसाठी आलो आहोत, असं म्हणत या उमेदवारांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.
बारामतीत काय होणार?
बारामती तालुक्यातील एकूण 31 ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी होत आहे. 9 फेऱ्यांमध्ये 31 ग्रामपंचायींची मतमोजणी होणार आहे. पवारांच्या काटेवाडी ग्रामपंचायतीची मतमोजणी 9 व्या फेरीत होणार आहे. मतमोजणी केंद्रावर एकूण 24 टेबलांवर मतमोजणी केली जात आहे. बारामतीचा पहिला निकाल समोर आला आहे. भोंडवेवाडी ग्रामपंचायतचा निकाल हाती आला आहे. बारामतीतील पहिली ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे आहे. अजित पवार यांच्या गटाकडे बारामती तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत आली आहे.