काटेवाडी ते नागपूर… ग्रामपंचायत निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; कोण बाजी मारणार?
Maharashtra Gram Panchayat Election 2023 Result : महाराष्ट्रातील अडीच हजार ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल. गावागावातील ग्रामपंचायतीचा निकाल... राजकीय नेत्यांच्या गावात कोण बाजी मारणार? कोणत्या ठिकाणी कोणत्या नेत्याची प्रतिष्ठा पणाला? ग्रामपंचायत निवडणुकीचे सर्व अपडेट आज दिवसभर टीव्ही 9 मराठीवर पाहा...
मुंबई | 06 ऑक्टोबर 2023 : आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्वाचा आहे. कारण आज राज्यातील अडीच हजार ग्रामपंचायतींचा निकाल आज लागणार आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधी ही महाराष्ट्र व्यापी निवडणूक होतेय. ग्रामीण भागातील जनतेचा कौल या निवडणुकीतून स्पष्ट होईल. ग्रामीण भागातील जनता कुणासोबत आहे, हे आज स्पष्ट होईल. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत भाजसोबत सरकार स्थापन केलं. तर काही महिन्यांआधी अजित पवारही सरकारमध्ये सामील झाले. या सगळ्याचा राज्यातील जनतेच्या मतांवर काय परिणाम झाला हे सांगणारी ही ग्रामपंचायत निवडणूक आहे. या निवडणुकीत राज्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
काटेवाडीत कोण बाजी मारणार?
पवारांच्या काटेवाडीच्या ग्राम पंचायतीचा देखील आज निकाल आहे. काटेवाडीत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत झाली. अजित पवारांच्या पॅनल विरोधात भाजपचं पॅनल उभं होतं. काटेवाडी ग्रामपंचायतीच्या 16 जागांसाठी काल मतदान पार पडलं. काटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काटेवाडी ग्रामपंचायतीवर अनेक वर्षे राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आहे. यंदा नेमकं काय होणार याकडे राज्याचं लक्ष आहे. बारामती तालुक्यातील 31 ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी होतेय. 32 ग्रामपंचायतींपैकी 31 ग्रामपंचायतींचा आज निकाल आहे. बारामती तालुक्यातील 1 ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली होती. बारामती तालुक्यात एकूण 85% मतदान झालं आहे. बारामतीतील निकालाकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे.
पुणे जिल्ह्यात काय स्थिती?
जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्याची मतमोजणीला आज सकाळी 10 वाजता सुरू होईल. न्नरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नारायणगाव ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. आता इथं ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता आहे. आंबेगाव तालुक्यात सहकारमंत्री दिलीप वळसे यांच्या निरगुडसर गावातही निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या निकालाची राज्याला उत्सुकता आहे. तर शिरूर तालुक्यात शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
नागपुरात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
नागपूर जिल्ह्यात 357 ग्रामपंचायत आणि पाच ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा आज निकाल आहे. नागपूर जिल्ह्यात 362 ग्रामपंचायतीसाठी 85 टक्के मतदान झालं. सरपंचपदासाठी 1185 आणि सदस्यपदाच्या 6882 उमेदवारांच्या भवितव्याचा आज निकाल लागणार आहे. नागपूर जिल्ह्यात चंद्रशेखर बावनकुळे, सुनील केदार, अनिल देशमुख, आ. राजू पारवे, सलील देशमुख, आशिष देशमुख या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.