महाराष्ट्र ग्रामपंचायत मतदान 2021: राज्यभरात मतदानाला सुरुवात, गावोगावी बूथ सजले
आज राज्यभरात जवळपास 14 हजाराहून अधिक ग्रामपंतायतींसाठी मतदान पार पडत आहे. त्यासाठी गावागावात मतदान केंद्र सजली आहे.
मुंबई: ‘राज्याचं राजकारण एकवेळ सोपं, पण गावचं राजकारण लय बेकार’ असं गावखेड्यात तुम्हाला नक्की ऐकायला मिळत असेल. तर आज राज्यभरात जवळपास 14 हजाराहून अधिक ग्रामपंतायतींसाठी मतदान पार पडत आहे. त्यासाठी गावागावात मतदान केंद्र सजली आहे. बाहेरगावी असलेल्या मतदारांना आणण्याची व्यवस्था आधीच करण्यात आलीय. त्यानुसार अनेक गाड्या आता गावात दाखल होऊ लागल्या आहेत. तसंच वयस्कर मतदारांना मतदान केंद्रावर घेऊन येण्यासाठीही लगबग सुरु झाली आहे. (Voting begins for Gram Panchayat elections across the state)
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ग्रामपंचायत निवडणूक पुढे ढकलण्यात आल्या होत्या. कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. पण कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार आज राज्यभरातील जवळपास 14 हजाराहून अधिक ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अनेक गावात उमेदवारांनी मतदान यंत्राची पूजा करुन, मतदानाला सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं.
उमेदवारांची दमछाक
कोरोनाच्या सावटाखाली पार पडत असलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांची चांगलीच दमछाक झालेली पाहायला मिळत आहे. उमेदवारांना प्रचारासाठी कालावधी कमी मिळाला. त्याचबरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच असल्यानं सर्व काळजी घेऊनच निवडणूक प्रचार मोहीम राबवावी लागली. उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच भरावा लागल्यानं तिथेही त्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे यंदाची ग्रामपंचायत निवडणूक पॅनल प्रमुख आणि उमेदवारांसाठी कायम लक्षात राहील अशीच ठरली आहे.
कोरोना नियमावली
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दिशानिर्देश दिले आहेत. त्यानुसार मतदान केंद्रांवर सरकारनं घालून दिलेल्या नियमांचं पालन करावं लागणार आहे. निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही मोठी काळजी घ्यावी लागणार आहे. मतदारांनी मतदान केंद्रांवर मतदानासाठी जाताना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं गरजेचं आहे.
सरपंचपदाची आरक्षण सोडत निवडणुकीनंतर!
सरकारनं पहिल्यांदाच सरपंचपदाची आरक्षण सोडत निवडणुकीनंतर पार पडणार असल्याचं जाहीर केलंय. विशेष म्हणजे यापूर्वी आठ जिल्ह्यांत आरक्षणाची सोडत जाहीर झाली होती. ती सोडत रद्द करण्यात आल्याचं ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केलं होतं. मात्र, त्यानंतरही काही जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. ती दूर व्हावी म्हणून सरकारनं 16 डिसेंबर 2020 रोजी नव्यानं एक जीआर काढून, आधी झालेली सरपंच आरक्षणाची सोडत रद्द केलं. त्यामुळे आता निवडणूक पार पडल्यानंतर सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत होणार आहे.
बिनविरोध ग्रामपंचायत
अनेक आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभावक्षेत्रातील ग्रामपंचायती बिनविरोध काढण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार राज्यभरातील शेकडो ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याही. अनेक आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यास लाखोंच्या बक्षिसांची घोषणा केली होती. या लोकप्रतिनिधींच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक ग्रामपंचायती बिनविरोध काढण्यात त्यांना यश मिळालं आहे.
बिनविरोध ग्रामपंचायतसाठी बक्षिस जाहीर करणारे लोकप्रतिनिधी
1. निलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेस 2. कैलास पाटील, शिवसेना 3. रत्नाकर गुट्टे, रासप 4. अभिमन्यू पवार, भाजप 5. चिमणराव पाटील, शिवसेना 6. श्वेता महाले, भाजप 7. सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस 8. अभिजित पाटील, पंढरपूरचे कारखानदार 9. सरोज अहिरे, राष्ट्रवादी काँग्रेस
यांच्यासह राज्यातील अनेक लोकप्रतिनिधींनीही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यास लाखो रुपयांच्या बक्षिसांची घोषणा केली होती.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला तेव्हा कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायत निवडणूक
ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.
महाराष्ट्र ग्रामपंचायत मतदान 2021 Voting LIVE : ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज मतदानhttps://t.co/epeHP0UIDr#Grampanchayatelections #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 15, 2021
संबंधित बातम्या:
Gram Panchayat Elections | तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही? कसं चेक करालं?
“ग्रामपंचायतीला दोन गट उभे राहतात; निवडून येतो, तो म्हणतो दादा आम्ही तुमचे” अजितदादांनी हशा पिकवला
Voting begins for Gram Panchayat elections across the state