कोगनोळी टोल नाक्याजवळ पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये झटापट; महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात पुन्हा अस्वस्थता
Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्न पुन्हा एकदा तापला आहे. कोगनोळी टोल नाक्याजवळ ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना पोलिसांनी अडवलं. यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये झटापट झाली. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमात नेमकं काय घडतंय? वाचा सविस्तर...
कर्नाटक सरकारचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. बेळगावात हे अधिवेशन होत आहे. आजच्याच दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषकांचा महामेळावा छत्रपती संभाजी महाराज चौकात आयोजित केला आहे. मात्र पोलिसांनी या मेळाव्याला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर तणावाचं वातावरण आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर दोन्ही राज्यांच्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सीमा भागात राहणाऱ्या मराठी भाषिक नागरिकांवर अन्याय करण्यासाठी कर्नाटत सरकार मुद्दाम बेळगावात अधिवेशन घेत आहे, असा आरोप महाराष्ट्र एकीकरण समितीचा आरोप आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीकडून मराठी भाषकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. याचमुळे सीमावर्ती भागात तणाव निर्माण झाला आहे.
कोल्हापूरमधून शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढच बेळगावकडे जाण्याचा निर्धार व्यक्त केल्याने सीमेवर तणावाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर दोन्ही राज्यांच्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. बेळगावच्या धर्मवीर संभाजी महाराज चौकात कर्नाटक पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह 100 पेक्षा जास्त पोलीस धर्मवीर संभाजी महाराज चौकात दाखल झाले आहेत. महामेळाव्याला परवानगी नाकारल्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीने संभाजी महाराज चौकात एकत्र येत निदर्शने करण्याचा इशारा दिलाय. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या इशाऱ्यानंतर कर्नाटक पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे.
कोगनोळी टोल नाक्याजवळ झटापट
कोगनोळी टोल नाक्याजवळ शिवसैनिकांना पोलीस अडवलं आहे. महामार्गावर शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. कोल्हापूर बंगळुरु हायवेवर वाहतूक विस्कळीत झाली आहे. शिवसैनिकांना पोलिसांनी कोगनोळी टोल नाक्यावर अगोदरच अडवलं आहे. यावेळी शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये झटापट झाली. बेळगावच्या दिशेने आम्ही जाणारच असा आक्रमक पवित्रका शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घेतला आहे. या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
कर्नाटक पोलिसांकडून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते मंडळींना ताब्यात घेण्यास सुरुवात झाली आहे. माजी आमदार मनोहर किणेकर प्रकाश शिरोळकर, प्रकाश मरगाळेआर, एम चौगुले, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, माजी नगरसेवक नेताजी जाधव यांच्यासह काही नेते मंडळींना अटक करण्यात आली आहे. महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर म ए समितीच्या बऱ्याच नेत्यांना अटक झाली आहे. काही जणांना एपीएमसी पोलीस स्थानकात नेण्यात आलं आहे.