मुंबई : गेल्या चार दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. आज पहाटेपासूनच मुंबईसह ठाणे जिल्ह्यात पावसाने चाांगला धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, वसई, विरार आणि पालघरमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे. वसई, विरार, नालासोपारा येथे तर काही घरांमध्ये पाणी शिरलं आहे. त्यामुळे येथील नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आहे. राज्यातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. कोल्हापुरात पावसामुळे रस्ता वाहून गेला आहे. तर रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळगड येथेही सकाळपासून धुवाँधार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे दरड कोसळलेल्या ठिकाणी मदत कार्यात अडचणी निर्माण होत आहेत.
भिवंडी परिसरात काकूबाई चाळ, नारपोली परिसरात घरामध्ये पाणी शिरलं आहे. यामुळे नागरिकांचं मोठ नुकसान झालं आहे. अनेक सखल भागात पाणी साचलेलं दिसत आहे.
विदर्भात काही ठिकाणी पावसाने मुसंडी मारली आहे. बुलढाणा जिल्ह्यात अनेक भाग जलमय झाले आहे. अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. संग्रामपूर, जळगाव जामोदमध्ये अनेकांची शेती पाण्याखाली गेली आहे. नुकत्याच प्रण्या झालेल्या असल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सोनाला गावात पुराच पाणी शिरल्याने अनेकांची घरं पाण्याखाली गेली आहे.
सतत होत असलेल्या पावसामुळे उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचले आहे. यामुळे नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. स्थानिक व्यावसायीकांनाही याचा मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. तसेच बदलापूर शहरही जलमय झाल्याचे चित्र आहे. पाण्याचा विसर्ग होत नसल्याने अनेक भागांना तलावाचे स्वरूप आले आहे.
मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत तीन दिवसांपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. सध्या कल्याण भिवंडीत पावसाचा जोर वाढला आहे. साईबाबा नाका-रंजोली दरम्यान पाणी साचलं आहे. यामुळे महापालिकेच्या नालेसफाईच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
मुंबई उपनगरात मुसळधार पावसामुळे अंधेरी भुयारी मार्ग बंद करण्यात आला आहे. अंधेरी सबवेच्या आत पाणी भरल्यानंतर वाहतूक पोलिसांनी दोन्ही बाजूंनी बॅरिकेड्स लावले आहे. सध्या तो वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने डोंबिवली पूर्व रेल्वे स्टेशन परिसर जलमय झाला आहे. आता डोंबिवलीतील काही सखलभागात पाणी भरण्यास सुरवात झाली आहे. तसेच कल्याणमधील टिळक चौक परिसरात गुडघ्यावर पाणी साचले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. नागपूर, तुळजापूर महामार्ग बंद झाला आहे. दहीसावळी येथील नाल्यावर पूर आल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. महामार्गावर ट्रक अडकून सुद्धा पडला आहे.
जायकवाडी धरणाच्या वरच्या भागात जोरदार पावसाअभावी धरणात पाण्याची आवक मंदावली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत फक्त 50 दिवसात केवळ 66 दश लक्ष घन मीटर पाण्याची आवक जायकवाडी प्रकल्पात झाली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील कारेगाव यावली गावाला पुराचा वेढा पडला आहे. यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे वाघाडी नदीला पूर आला. नदीचे पाणी गावात शिरले असून अनेक घरे पाण्याखाली आली आहे.
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यात दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात अजून दमदार पाऊस नाही. यामुळे धरण क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
नालासोपारा, वसई, विरारमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. या भागात सलग चौथ्या दिवशी मुख्य रस्ते पाण्याखालीच आहेत. पूर्ण शहरात साचलेल्या पाण्याने नागरिकांची दयनीय अवस्था झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. धरण क्षेत्रासह शहर परिसरातही पहाटेपासून जोरदार पाऊस होत आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरु आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 36 फुटांवर पोहोचली आहे. पंचगंगेची इशारा पातळी 39 फुटांवर आहे. जिल्ह्यातील 68 बंधारे पाण्याखाली गेलेत. राधानगरी धरण 75 टक्के भरलं आहे. आज कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
कल्याण डोंबिवलीत सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे. सखल भागात आणि रस्त्यावर पाणी साचण्यास सुरवात झाली आहे. कल्याण टिळक चौक रस्त्यावर गुढघ्याभर पाणी भरलं आहे. वाहन चालकांना कसरत करत पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर मोठ्या प्रमाणात घरात पाणी भरण्याची शक्यता आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होतोय. कोयनानगर 113 मिमी पावसाची नोंद झाली आहे. नवजामध्ये 140 मिमी तर महाबळेश्वर 127 मिमी
पाऊसाची नोंद झाली आहे. कोयना धरणात 27,241cusecs पाण्याची आवक सुरु झाली आहे. धरणाचा पाणीसाठा आता 43.14 टीएमसी झाला आहे.
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठया अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 11 दरवाजे आज सकाळी 5 वाजता उघडले आहेत. अप्पर वर्धा धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणात पाण्याची आवक वाढली आहे. धरण क्षेत्रात 93 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अप्पर वर्धा धरण 73 टक्के भरलं आहे. त्यामुळे धरणाचे 11 दरवाजे उघडले आहेत. धरणातून 1335 घन मीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वर्धा नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांना चिंता लागली आहे. दीड महिन्यांत केवळ 62 टक्के खरीप पेरण्या झाल्या आहेत. ज्यांनी पेरण्या पूर्ण केल्या त्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. नाशिकमध्ये केवळ तुरळक स्वरूपात पाऊस सुरू आहे.
गोंदियात रोवणीला वेग आलाय. शेतकरी आता घरच्या सदस्यांसोबद आपल्या शेतात भात रोवणी करताना दिसत आहेत. एकाच वेळी रोवणीला सुरुवात सुरुवात झाल्याने मजुरांचा तुटवडा निर्माण झालाय. मागणी वाढल्याने मजुरीच्या मजुरी दरातही वाढ झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात आज हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट दिलाय. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या आष्टी येथील वैनगंगा नदी पुल पुराच्या पाण्याखाली गेला आहे. पाऊस सतत सुरू राहिल्यास हा मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील प्रमुख मार्ग बंद असताना आज अहेरी इथं अतिरिक्त जिल्हा न्यायालय इमारत उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीत येणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण 24 महामार्ग बंद करण्यात आले आहेत. सिरोंचा- आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग, गडचिरोली-चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग आणि आष्टी-गोडपिंपरी मार्गासह एकूण 24 मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील अनेक भागांचा जिल्हा मुख्यालयाशीही संपर्क तुटला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. आजही मुंबईत काही तासात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईकरांनो, कारण नसताना घराबाहेर पडू नका असं आवाहन केलं जात आहे.
कोल्हापुरात पुरामुळे गगनबावडा तालुक्यातील रस्ता वाहून गेला आहे. खोपडेवाडी इथल्या बंधाऱ्यावरील हा रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे येथील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. बंधाऱ्यावरील पाणी कमी झाल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीला भेट देणार आहेत. इर्शाळवाडीत दरड कोसळून 22 जणांचा मृत्यू झाला आहे. आज तिसऱ्या दिवशीही तिथे बचावकार्य सुरू आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या ठिकाणी येऊन पाहणी करणार आहेत.
मालाड पूर्वेकडील डोंगरवरून वाहणाऱ्या पाण्यात बेपत्ता झालेला तरुण 3 दिवसांनी काल सायंकाळी मालवणीजवळील मार्वे येथील नाल्यात सापडला. 19 जुलै रोजी मालाड पूर्वेकडील डोंगरवरून चंदन शाहू नावाचा तरुण त्याच्या मित्रांसोबत पावसात फिरायला गेला होता.
तिथे चंदनने त्याच्या मित्रांसोबत पार्टी केली आणि मग मद्यधुंद चंदनने डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्याचा आनंद लुटत होता. त्यावेळी तरुणाचा मित्रही त्याच्यासोबत होता आणि त्याचा हात धरून त्याला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. मात्र अचानक त्याचा हात सुटला आणि चंदन डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्यात वाहून गेला.
रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे ज्या इर्शाळवाडीत दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. तिथे आज तिसऱ्या दिवशीही बचावकार्य सुरू आहे. मात्र, पहाटेपासूनच गडावर जोरदार पावसाने हजेरी लावल्याने या ठिकाणी बचावकार्यात अडथळे येत आहेत. रेस्क्यू टीमला बचावकार्य करताना आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे.
राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पहाटेपासूनच मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यासह राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.