मनसैनिकांनी केलं ट्रोल, दिपाली सय्यद यांची राज ठाकरे यांना विनंती अशी की…
अभिनेत्री दिपाली शिंदे यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात केलेल्या लेखी तक्रारीमध्ये मनसेचे काही कार्यकर्ते आपल्या विरोधात घाणेरड्या कमेंट करत आहेत असा आरोप केला आहे.
मुंबई : 22 ऑगस्ट 2023 | मुंबई – गोवा महामार्गाचे काम गेल्या १३ वर्षांपासून रखडले आहे. एक दशकाहून अधिक काळ झाला तरी अजूनही सदर महामार्गाचे काम पूर्ण झाले नाही. या महामार्गासाठी अनेक आंदोलने करण्यात आली तरी या रस्त्याचे काम कासवगतीने सुरु आहे. नुकत्याच झालेल्या पावसात मुंबई – गोवा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई – गोवा महामार्गावरून राज्य सरकारवर टीका केली होती. तसेच, मनसैनिकांनी रस्त्यावर असणाऱ्या खड्ड्यांबाबत आंदोलन करावे असे आदेश दिले. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिक आक्रमक झाले. त्यावरून शिवसेना ( शिंदे गट ) नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी ट्वीट केलं. या ट्वीटमधून त्यांनी टोला लगावत मनसेला डिवचलं.
राज्यभरात जेवढे मनसेचे कार्यकर्ते आहेत तेवढेच रस्त्यावर खड्डे आहेत. दोन दिवसाचे काम आहे. जेलमध्ये महिना भर खाऊन देशाचे नुकसान कशाला करता? बाहेर स्टंटबाजी कशाला करता? युवा नेत्यांना घराबाहेर काढून कामाला लावा..’, असे ट्वीट दिपाली सय्यद यांनी केले होते.
दिपाली सय्यद यांच्या या ट्वीटनंतर मनसैनिकांनी सोशल माध्यमावर त्यांना ट्रोल केले होते. त्यामुळे अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे. आपल्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि घाणेरडे कमेंट्स करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी दिपाली सय्यद यांनी पोलिसांना केली आहे.
अभिनेत्री दिपाली शिंदे यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात केलेल्या लेखी तक्रारीमध्ये मनसेचे काही कार्यकर्ते आपल्या विरोधात घाणेरड्या कमेंट करत आहेत असा आरोप केला आहे.
अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी याबाबत राज ठाकरे यांनाही आवाहन केले आहे. मनसेचे काही कार्यकर्ते आपणास सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. आक्षेपार्ह कॉमेंट्स करत आहेत. त्यामुळे अशी आक्षेपार्ह कमेंट करणारे कार्यकर्ते यांच्याविरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कारवाई करावी अशी विनंती त्यांनी केली आहे.