मनसेचं इम्तियाज जलील यांना ओपन चॅलेंज, छत्रपती संभाजीनगर नावं पटलेले नसेल तर…मनसेचा इशारा काय ?
गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने राज्याच्या नामांतराला हिरवा कंदील दाखवत प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामध्ये औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले होते.
दत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून पूर्वीचे औरंगाबाद ( Aurangabad ) आणि नव्याने नामकरण झालेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ( Chhatrapati Sambhajinagar ) खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. एकीकडे एमआयएमचे पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर साखळी उपोषण करण्यास सुरुवात केली असून औरंगाबाद नावाचा बोर्डही लावण्यात आला आहे. त्यामुळे एकूणच छत्रपती संभाजीनगर येथील वातावरण अधिकच चिघळले आहे. त्यात मनसेने इम्तियाज जलील यांच्या विरोधातच आक्रमक भूमिका घेत राजीनाम्याची मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने राज्याच्या नामांतराला हिरवा कंदील दाखवत प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामध्ये उस्मानाबाद शहराचे नाव बदलून धाराशीव करण्यात आले असून औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले होते.
सुरुवातीपासूनच औरंगाबाद शहराचे नाव व्हावे यासाठी शिवसेना, मनसे या पक्षांचा प्रयत्न होता. तर सुरुवातीपासूनच एमआयएम पक्षाकडून कडाडून विरोध केला जात होता. औरंगाबाद हेच नाव राहू द्यावे अशी मागणी केली जात होती. त्यात आता नामांतर झाल्यानंतरही कडाडून विरोध केला जात आहे.
छत्रपती संभाजीनगरचे खासदार यामध्ये आक्रमक भूमिका घेत असून औरंगाबाद हेच नाव असावे यासाठी साखळी उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यावरून शहरात आज आंदोलन केले जात आहे. मात्र दुसरीकडे त्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी इम्तियाज जलील यांना इशारा दिला आहे. शहराच्या नावाला जो कोणी विरोध करील त्याला आम्ही त्याच्याच पध्दतीने उत्तर देऊ असा इशारा दिला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.
इम्तियाज जलील आता छत्रपती संभाजी नगरचे खासदार आहेत त्यांना जर हे पटलेलं नसेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही सुमित खांबेकर यांनी केली आहे. याशिवाय एमआयएमच्या आंदोलकांना यावेळी तुमच्या मुलांचे नावे औरंगजेब ठेवा असा टोला लगावला आहे.
सुमित खांबेकर यांनी मोर्चा काढणाऱ्यांनी सुद्धा त्यांना जर औरंगजेब इतकाच चांगला वाटत असेल तर त्यांनी स्वतःच्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवावे असा सल्ला दिला आहे. आता या शहराचे नाव छत्रपती संभाजी नगर झालेलं आहे. जो कोणी विरोध करीत त्याला आमचा विरोध राहील अशी भूमिका मनसे घेतली आहे.