Amit Thackeray: मनविसे पुनर्बांधणीसाठी मुसळधार पावसातही अमित ठाकरे कोकण दौऱ्यावर; तरुणांशी साधला मुक्त संवाद
अमित ठाकरे यांना भेटण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी तिन्ही तालुक्यांतील मोठ्या संख्येने मनसे पदाधिकारी तसंच महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे सैनिकांनी गर्दी केली होती.
सावंतवाडी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते (Maharashtra Navnirman Sena Leader), आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे (MNVS Amith Thackeray) यांचे मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियानासाठी मंगळवारी कोकणात मुसळधार पाऊस कोसळत असतानाच सिंधुदुर्गात सकाळी धडकले. सावंतवाडी (Savantwadi) येथील मँगो हॉटेल सभागृहात अमित ठाकरे यांनी मनविसेत नव्याने सक्रिय होऊ इच्छिणाऱ्या तरुणांशी मुक्त संवाद साधला. जिल्ह्यात मनविसे भक्कम कशी करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर तिथेच त्यांनी सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला येथील विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी, मनसेचे पदाधिकारी यांच्याशी प्रत्येक तालुक्याबाबत चर्चा केली आणि लवकरच संघटनात्मक पुनर्बांधणी करून जुन्या व नवीन पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन नवीन रचना करण्यात येईल असे स्पष्ट संकेत दिले.
अमित ठाकरे यांना भेटण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी तिन्ही तालुक्यांतील मोठ्या संख्येने मनसे पदाधिकारी तसंच महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे सैनिकांनी गर्दी केली होती.
महाविद्यालयात मनविसे कार्यकारिणी
चांगलं शिक्षण घेऊनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण तरुणींना गोव्यात नोकरीसाठी जावं लागतं, सिंधुदुर्गात पुरेशा रोजगार संधी उपलब्ध नाहीत असा मुद्दा काही तरुणांनी अमित ठाकरे यांच्याशी चर्चा करताना मांडला. तर, येत्या काही महिन्यांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात मनविसे कार्यकारिणी युनिट स्थापन करण्यात येईल, असा विश्वासही विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अमित ठाकरे यांना दिला. संवाद बैठकीच्या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना अमित ठाकरे यांनी सांगितले की राजकीय भाष्य करण्यास नकार दिला.
माझ्या थेट संपर्कात राहू शकता
सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ” मुंबईतील पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आमच्या संपर्कात नाहीत, त्यामुळे आम्हाला मार्गदर्शन मिळत नाही. राजसाहेब ठाकरे यांच्या कानावर जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी सांगता येत नाही ” अशी तक्रारही यावेळी करण्यात आली.
राजगड तुमच्यासाठी खुले
आता यापुढे तुम्ही माझ्या थेट संपर्कात राहू शकता. तुम्हाला गरज पडली तर कधीही माझी वेळ घेऊन राजगड मुख्यालयात येऊन मला भेटू शकता असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. सावंवाडीतील संवाद बैठकीच्या वेळी पक्षाचे सरचिटणीस श्री. परशुराम उपरकर, जिल्हाध्यक्ष धीरज परब, शहराध्यक्ष आशिष सुभेदार, तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांच्यासह मनसे तसंच मनविसेचे अनेक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.